निवडणुकीच्या प्रचाराचे नगारे आज शांत होतील आणि बुधवारी महाराष्ट्र मतदान करील. लोकसभेच्या निवडणुकीसारखा याही निवडणुकीतील प्रचार एकतर्फी म्हणजे भाजपाच्या बाजूने अधिक झाला. एकट्या पंतप्रधानांनी कधी नव्हे ते २० हून अधिक सभा घेतल्या. शिवाय गृहमंत्री राजनाथ सिंग आले, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आल्या, अमित शाह ठाण मांडून होते आणि पक्षाचे स्थानिक पुढारीही प्रचाराच्या रणधुमाळीत आघाडीवर होते. त्या तुलनेने काँग्रेसचा प्रचार उशिरा म्हणजे राहुल व सोनिया गांधींच्या आगमनानंतर सुरू झाला व त्याने शिखर गाठण्याआधीच प्रचाराचा कालावधी संपत आला. राष्ट्रवादी काँग्रेस प्रचारात होती; पण शरद पवारांसारखा वजनदार नेता विदर्भ-मराठवाड्याकडे फारसा फिरकला नाही. उद्धव ठाकरे फिरले; पण त्यांच्याखेरीज सेनेचा दुसरा माणूस सभा घेताना कुठे दिसला नाही. राज ठाकरेही फिरले; पण त्यांनाही प्रचाराची फारशी धूळ उडवणे जमले नाही. माध्यमांवरील प्रचाराचे स्वरूपही लोकसभेतल्यासारखे एकतर्फी व भाजपानुकूल होते. लोकसभेचा संदर्भ वेगळा आणि विधानसभेचा वेगळा, असे कितीही सांगितले व समजले गेले तरी आपल्या राजकारणाला असलेले व्यक्तिकेंद्री वा पुढारीकेंद्री स्वरूप त्या वेगळेपणावर मात करतानाच अधिक दिसते. हा प्रचार प्रत्यक्ष मतदानात कसा परिवर्तित होतो, ते मतदानाच्या वेळीच दिसेल. कारण लोकसभेच्या वेळचा एकतर्फी जोम पुढाऱ्यांत व पक्षांत नव्हता, तसा एकेरी उत्साह मतदारांतही नव्हता. भाजपाने ५३ उमेदवार इतर पक्षांतून आयात केले आहेत. सेनेशी असलेला त्यांचा घरोबा ऐन उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुहूर्तावर तुटल्याने त्या पक्षावर रिकाम्या जागा भरण्याची वेळ आली. परिणामी काँग्रेस, राष्ट्रवादी, सेना आणि मनसे यांच्याही असंतुष्टांना सहभागी करून घेऊन त्यांना तिकिटे देणे त्या पक्षाला भाग पडले. स्वाभाविकच पक्षाच्या परंपरागत मतदारांत व स्थानिक कार्यकर्त्यांत नाराजी आली. शिवसेनेलाही उमेदवारांची अशीच आयात सर्वत्र करावी लागली. त्यातून सेनेची उमेदवारी निष्ठावंतांऐवजी आपल्या कलानुसार देण्यावर भर राहिल्याने सेनेचे अनेक जुने कार्यकर्ते कुठे अपक्ष, तर कुठे इतर पक्षांच्या चिन्हांवर उभे झालेले पाहावे लागले. काँग्रेसमध्येही तिकीट वाटपावरून मतदार व कार्यकर्त्यांत नाराजी दिसली. जुनेच नव्हे तर थेट मंत्रिपदावर असलेले उमेदवार डावलण्याची खेळी त्या पक्षाच्या पुढाऱ्यांनी केली. राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येच एकवाक्यता नव्हती. अजित पवारांना स्वत:ला मुख्यमंत्रिपद हवे आहे, तर भुजबळांना त्या जागी शरद पवारांनी यायला हवे, त्या पक्षाने ऐनवेळी उमेदवारी दिलेल्या अनेक उमेदवारांसोबत कार्यकर्ते सोडा; पण मतदारही फारसे उभे असल्याचे दिसले नाही. याच काळात पक्षांतरे फार झाली. काँग्रेसचे मेघे मुलांसह भाजपात गेले आणि रणजित देशमुखांनी स्वत: पक्षत्याग करून आपल्या एका मुलाला भाजपाचे तर दुसऱ्याचे राष्ट्रवादीचे तिकीट मिळविले. तात्पर्य, सर्वत्र गोंधळ आणि सार्वत्रिक नाराजी असे निवडणूकपूर्व चित्र महाराष्ट्रात दिसले. एकटे मोदी आणि अमित शाह सोडले तर दुसऱ्या कोणात उत्साह नव्हता, त्यामुळे प्रचारातही फारशी रंगत आली नाही. मायावती एक-दोनदाच राज्यात आल्या. राज ठाकऱ्यांना उद्धव ठाकऱ्यांशी हातमिळवणी करण्याचे फार उशिरा सुचले. भाजपात नेतृत्वाची स्पर्धा अखेरपर्यंत राहिली आणि राष्ट्रवादीला त्याचा सूर शेवटपर्यंत गवसला नाही. भाजपाने पूर्ण बहुमताची भाषा केली; पण त्याही पक्षाच्या मनात उत्तर प्रदेश, राजस्थान व बिहारमधील पोटनिवडणुकांचे भेडसावणारे निकाल अखेरपर्यंत डाचत राहिले. पक्ष असे लढले, उमेदवार तसे फिरले मात्र मतदारराजा अखेरपर्यंत बोलताना दिसला नाही. लोकसभेसारखाच तो याही वेळी भाजपाकडे वळेल, अशी त्या पक्षाला आशा आहे. तर निवडणुकीचा निकाल एकतर्फी असणार नाही व येणारे सरकार कोणत्या ना कोणत्या आघाडीचे असेल, असा विश्वास भाजपेतरांना वाटत आहे. सारांश, पुढारी अंदाज बांधण्यात रममाण तर मतदार निर्णय घेण्याच्या मानसिकतेत, अशी सध्याची स्थिती आहे. बुधवारी होणाऱ्या मतदानाची मोजणी रविवारी होईल तेव्हा राज्याचे खरे राजकीय चित्र अधिकृतपणे साऱ्यांसमोर येईल, तोवर सारेच पक्ष व पुढारी जीव मुठीत धरून तर मतदार व महाराष्ट्र आपल्या भवितव्यावर डोळे लावून बसलेला दिसणार आहे. या निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी तुटली आणि सेना-भाजपा हे पक्षही युतीतून वेगळे झाले. परिणामी ही लढत चौरंगी होईल आणि अशा लढतीचा महाराष्ट्राला याअगोदर फारसा अनुभव आलाही नाही. सबब, आता निवडणूक निकालावर लक्ष ठेवायचे एवढेच..!
आता प्रतीक्षा मतदानाची
By admin | Published: October 13, 2014 3:36 AM