मोठ्या दर्शनी किंमतीचे चलन अचानक हद्दपार करण्याचा निर्णय आणि त्यामागील कारणांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेला उहापोह या दोहोंचे समर्थन करणारा देशातील एक मोठा वर्गदेखील आता अस्वस्थ होऊ लागला आहे. मोठ्या नोटा रद्द केल्या जाण्याने नगारिकाना त्रास होईल हे खरे, पण त्यांनी तो कमाल ५० दिवस सहन करावा आणि त्यानंतर मात्र सारे काही सुरळीत होईल असे आश्वासन खुद्द पंतप्रधानांनी दिले होते व त्यावर बव्हंशी लोकानी विश्वासदेखील ठेवला होता. पण आता ५० दिवसांची ही मुदत संपुष्टात येत असताना परिस्थिती पूर्वपदावर येण्याचे एकही लक्षण अद्याप दृष्टीस पडलेले नाही. ५० दिवस पूर्ण झाले आणि रातोरात सारे बदलले असे होऊ शकत नसल्याने स्थिती पूर्वपदाला येण्याची चुणूक दिसायला लागणे गरजेचे होते. परंतु तसे काहीही दिसत नसताना सध्या जनसामान्यांना ज्या अडचणींना तोंड देणे भाग पडत आहे, त्या अडचणी आणखी काही काळ तरी तशाच राहतील असे अनुमान खुद्द बँकींग क्षेत्रातील लोकच व्यक्त करु लागले आहेत. सरकारने नोटाबंदीचा निर्णय घोषित केला तेव्हां चलनात रद्द करण्यात आलेल्या नेमक्या किती नोटा अस्तित्वात होत्या याविषयी सरकार आणि रिझर्व्ह बँक या दोहोंच्या आकडडेवारीत बरीच तफावत असताना आपण नोटा रद्द केल्यानंतर त्यांची जागा घेऊ शकणाऱ्या किती नोटा बाजारात आणून ओताव्या लागतील व त्यांची छपाई करण्यास नेमका किती वेळ लागेल याचा जो हिशेब देशाचे माजी अर्थमंत्री पी.चिदंम्बरम यांच्यापाशी होता, तोही विद्यमान सरकारपाशी नव्हता हे मागेच स्पष्ट झाले आहे. परंतु आजदेखील परिस्थिती नेमकी केव्हां पूर्ववत होईल हे कोणीही सांगायला तयार नाही. परिणामी काहींच्या मते आणखी तीन महिने लागतील तर काहींनी थेट आजपासून वर्षानंतरचा वायदा केला आहे. पण यातील खरी गंभीर बाब आणखीन वेगळीच आहे. मोदींनी जाहीर केलेल्या ५० दिवसांच्या कालावधीत बचत खाते धारण करणाऱ्या नागरिकांना आठवड्याला कमाल २४ हजार रुपये मिळतील असे जाहीर करण्यात आले होते. पण तसे एकाही सरकारी बँकेने केले नाही. याचा अर्थ सरळ सरळ असाच होतो की आजचे नष्टचर्य आणि प्रतीक्षाकाळ आणखी लांबेल, किती काळ हे मात्र विचारायचे नाही.
प्रतीक्षा वाढणार
By admin | Published: December 27, 2016 4:23 AM