- संदीप प्रधान(डोंबिवली शहर घाणेरडे आहे, अशी टिप्पणी केंद्रीयमंत्री नितीनभाऊ गडकरी यांनी केली आणि...)तुम्हाला पुणेकर, नागपूरकर वगैरे व्हायचे असेल तर कोणकोणते अंगभूत गुण (खरे तर दुर्गुण) अंगी बाणवायला हवे त्याचे मार्गदर्शन पु.ल. देशपांडे यांनी करून ठेवलय. पुलंच्या शब्दात सांगायचे तर ‘ज्याप्रमाणे गांधी जगभर फिरला पण कोकणात काही गेला नाही. कारण त्यास ठाऊक होते की, त्याच्या कमरेच्या पंचाचे आणि उपवासाचे तेथे कुणालाही अप्रूप नाही.’ त्याप्रमाणं पुलंनी पुणेकर, नागपूरकर वगैरे होण्याकरिता आपला बोरु झिजवला. पण ‘तुम्हाला डोंबिवलीकर व्हायचेय का?’ असा सवाल करण्याची या ‘सारस्वत सम्राटा’ची छाती झाली नाही. कारण त्यांस ठाऊक होते की, डोंबिवलीत पाळण्यात टॅहॅ करणाऱ्या बाळांचीही कवी संमेलने होतात. माध्यमिक शाळेतील गुडघाभर मुलाचा निबंध देखील ‘निबंधमाला’कार विष्णुशास्त्री चिपळूणकरांच्या उजव्या हाताची पाचही बोटं आश्चर्यानं पडजिभेस भिडतील असा लालित्यपूर्ण आणि बिनतोड युक्तिवादानं ओतप्रोत भरलेला असतो. विष्णुशास्त्र्यांची ही अवस्था तर प्रतिभावंतांच्या सांस्कृतिक नगरीबद्दल इतरांनी काही बोलणे म्हणजे उंटाच्या फुल्याफुल्यांचा मुका घेण्यासारखे नाही का? असो. तर तुम्हाला डोंबिवलीकर व्हायचे असेल तर सर्वप्रथम गाडीचे पायदान व फलाट यांच्यामधील अंतराचा अचूक अंदाज घेऊन कुठल्याही लोकलमध्ये पहिली उडी ठोकता आली पाहिजे. रेल्वेमधील आसनव्यवस्थेचा प्राधान्यक्रम हा खिडकीपासून सुरू न होता चवथ्या सीटपासून सुरू होते, असे अन्य तीन प्रवाशांच्या मनावर ठसवून चवथ्या सीटवर ऐसपैस बसणे हा डोंबिवलीकराचा जन्मसिद्ध हक्क आहे हे बसताक्षणी जोरदार हिसडा देऊन ठसवण्याचा टिळकांसारखा (चंद्रशेखर नव्हे) बाणेदारपणा अंगी असायला हवा. गर्दीच्या गाडीत समोरील प्रवासी कितीही केविलवाणा होऊन आशाळभूतपणानं सीट मोकळी होण्याची वाट पाहत असला तरी निम्म्या फलाटात लोकल शिरल्याखेरीज वर ठेवलेल्या बॅगला हात घालू नये. समजा एखाद्या प्रवाशाने जागा देण्याची विनंती केली तर ‘आता काय तुम्हाला मांडीवर बसवू का?’ असे एकदाच जोरात खेकसून बोलावे. मुंगीच्या पावलाने चालणे याचा शब्दश: अनुभव घेत स्टेशनमधून बाहेर पडल्यावर वेगवेगळ््या दिशांना तोंड करून उभ्या असलेल्या ‘मुजोर’ शब्दाला ओशाळे ठरवतील अशा रिक्षावाल्यांशी कडाक्याचे भांडण करण्याचा मनाचा हिय्या करा. समजा एखादा रिक्षावाला यायला तयार झाला तर लागलीच रिक्षात सफाईने अंग झोकून देण्याची किमया तुम्हाला जमायलाच हवी. घरात नळ आहे पण पाणी नाही, रस्त्यावर दिवे आहेत पण बत्ती गुल आहे, वाहने जातायत पण त्याला रस्ता म्हणावा की खड्डे हा संभ्रम आहे, अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत चेहºयावर ‘अच्छे दिन’चे भाव ठेवण्याची योगवृत्ती डोंबिवलीकर झाल्यावर आपोआप तुमच्या अंगी कुंडलीनी जागृत होते तशी होऊ लागेल. रविवारी सुटीच्या दिवशी ‘हरपालदेव राजाच्या काळातील नाणी व डोंबिवलीतील अर्थव्यवस्था’ अशा विषयावरील व्याख्यान एकदाही पापणी न मिटता ऐकून पुन्हा गाडीचे पायदान व फलाटामधील अंतराचा विचार न करण्याची सिद्धी प्राप्त करतो तोच खरा डोंबिवलीकर...
डोंबिवलीकर व्हायचंय...?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:57 AM