देशातील वैज्ञानिक विचारांची व विज्ञाननिष्ठ मानसिकतेची पिछेहाट होत असल्याचे उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांचे वक्तव्य देशाला अंतर्मुख करणारे आणि त्याला आपल्या विज्ञानविषयक संशोधनांचा मुळातून विचार करायला लावणारे आहे. दिल्लीत नुकत्याच पार पडलेल्या इंडियन सायन्स काँग्रेससमोर त्यांनी हा अभिप्राय ऐकविला. तिला हजर असलेल्या बहुतेक वैज्ञानिक विचारवंतांनीही देशाला हेच बजावले आहे. गेल्या दोन वर्षात या काँग्रेससमोर जे प्रबंध चर्चेसाठी आणले गेले ते केवळ उथळच नाही तर हास्यास्पद होते असेही मत या काँग्रेसने व्यक्त केले आहे. कधी काळी भारतात आकाशातून उडणारी विमाने होती या भ्रमातून त्या विमानांचे तळ शोधण्याचा दावा करणारा एक प्रबंध तर या चर्चासत्राला हजर असलेल्या विदेशी प्रतिनिधींएवढाच भारतीय वैज्ञानिकांनाही त्यांची मान संकोचाने खाली घालायला लावणारा ठरला. कधी काळी माणसे हवेत उडत असत आणि काही क्षणात हिमालयापासून श्रीलंकेपर्यंत पोहचत असत अशा भाकड कथांवर आताची शाळकरी पोरेही विश्वास ठेवीत नाहीत. तरीही जुन्या व आंधळ््या श्रद्धांना वैज्ञानिकदृष्ट्या खऱ्या ठरविण्याचा अट्टहास आपले संशोधक म्हणविणारे पोथीबाज विद्वान करीत असतील तर तो आपल्याही चिंतेचा विषय व्हावा. देशातील ज्येष्ठ संशोधक व नोबेल पारितोषिकाचे विजेते व्यंकटरमण रामकृष्णन यांनी अशा संशोधनांचा आणि प्रबंधांचा उल्लेख ‘सर्कसबाजी’ असा करणे आणि त्यात विज्ञानाखेरीज बाकीचीच चर्चा अधिक चालते असे म्हणणे हा अशा संशोधनांची निरर्थकता सांगणाराच विशेष ठरावा. विज्ञानाच्या या अवस्थेच्या कारणांची चर्चा करताना उपराष्ट्रपती म्हणाले, आपल्या श्रद्धाविषयांना विज्ञानाच्या कसोटीवर पारखून घेण्याची क्षमता नसणे किंवा त्याबाबत एकूणच आंधळी श्रद्धा असणे यात या अवस्थेची मुळे दडली आहेत. ज्या देशाचे पंतप्रधान हत्तीचे शीर असलेल्या गणपतीचे वर्णन प्राचीन काळची प्लास्टिक सर्जरी असे करतात तेथे खऱ्या वैज्ञानिक संशोधनाला बळ तरी किती व कसे मिळणार ? वैज्ञानिक संशोधनावर देशाच्या उत्पन्नापैकी किमान दोन टक्के खर्च केला जावा हे अपेक्षित असताना तो अजून होत नाही. देशातील ६० टक्के शाळात विज्ञानाच्या प्रयोगशाळा नाहीत. देशातील प्रयोगशीलांना प्रोत्साहन नसल्याने मेक इन इंडिया हेही दूरचे स्वप्नच राहिले असते. सव्वा दशलक्ष भारतीयांपैकी केवळ १७ जणांनी आपल्या उत्पादनाला पेटंट मिळावा असे अर्ज सरकारकडे देऊ केले तर तसे अर्ज देणाऱ्या दक्षिण कोरियातील संशोधकांची संख्या चार टक्क्यांहून अधिक असल्याचे वास्तव या काँग्रेससमोर आले तेव्हा साऱ्यांनाच संकोचाने माना खाली घालाव्या लागल्या. वास्तव हे की वैज्ञानिक दृष्टीचा अंगिकार करण्याहून जुनाट श्रद्धांना चिकटून राहण्याच्या मानसिकतेने आपल्या पिढ्यांच्याच नव्हे तर पुढल्याही पिढ्यांच्या विकासाचा बळी देणे आता सुरू झाले आहे. ज्या शाळांमध्ये विज्ञानाच्या प्रयोगशाळा आहेत, त्या शाळातील किती विद्यार्थी व विद्यार्थिनी त्याकडे पुरेशा ओढीने जातात आणि तेथे त्यांना शिक्षण देणारी किती माणसे त्यांच्यावर विज्ञाननिष्ठेचा संस्कार घडवितात हेही पाहणे येथे महत्त्वाचे आहे. विज्ञान हा विषय कठीण व आपल्याला झेपणारा नाही असेच दडपण अनेक विद्यार्थ्यांच्या मनावर असते व ते जाणीवपूर्वक निर्माण केले जाते. परिणामी वैज्ञानिक विकास नाही आणि सभोवतीचा समाजही श्रद्धा व अंधश्रद्धा यांच्या मागे लागून स्वत:ला ‘सुरक्षित’ बनविण्याच्या भ्रमामागे लागतो. विज्ञान हा आजच्या जगाचा मंत्र आहे आणि संशोधन हे समाजाच्या प्रगतीचे साधन आहे. त्यांच्याविषयी भ्रम उभे करण्याचा प्रयत्न होत असला तर याहून वेगळे काही व्हायचेही नसते. गेल्या दीड नव्हे तर २५ वर्षांत भारताने जगाला दिलेली विज्ञान व तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातली देणगी केवढी? इथले मोटारींचे कारखानेही सामान्यत: स्वबळावर मोटारी न बनवता विदेशाहून आणलेल्या मालाची जोडजंतर करून त्या बाजारात आणतात. ज्ञानाची कुचेष्टा, विद्वत्तेचा अपमान, संशोधकांची उपेक्षा आणि या साऱ्यांबाबत सरकारमध्येच दिसणारी अनास्था या साऱ्या गोष्टी एकत्र आल्यानेच आपले विज्ञान परिषदांमध्ये व जगात असे हसे होते. दर वर्षी देशातील विद्यापीठे काही हजार संशोधकाना पी.एचडी. देऊन मोकळी होतात. यातल्या किती प्रबंधांची जगाने सोडा पण देशाने तरी दखल घेतली आहे? त्यातून अनिल काकोडकर किंवा अमर्त्य सेन यासारख्या श्रेष्ठ संशोधकांचा अपमान करून त्यांना संशोधन व सरकारपासून दूर ठेवण्याची व्यवस्था साधी पदवीही गाठीशी नसणारी सरकारातील माणसे वा स्त्रिया करीत असतील तर उपराष्ट्रपतींजवळ त्यांच्या आताच्या अभिप्रायावाचून सांगण्यासारखे काही उरतही नाही. श्रद्धा समाजाला स्थितीशील बनवतात तर विज्ञान त्याला पुढे नेते. या स्थितीत आपण आहोत तेथे थांबायचे की पुढचा प्रवास करायचा हाच महत्त्वाचा प्रश्न अशावेळी शिल्लक राहतो.
पुढचा प्रवास करायचा की नाही ?
By admin | Published: January 15, 2016 3:08 AM