राजा माने -
‘दुष्काळी जिल्हा’ ह्या आपल्या भाळी असलेल्या शिक्क्याला कायमचे पुसून टाकण्याची धडपड सध्या सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे. स्वप्नरंजन आणि हवेतल्या गणितात हरवून न जाता इथला सर्वसामान्य शेतकरी येईल त्या परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जाऊन राज्यापुढे वेगळा सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्याचा प्रयत्न करताना दिसतो. साखर कारखानदारी अडचणीत असताना इथल्या ३२ साखर कारखान्यांनी साखर उत्पादनात देशात अव्वल क्रमांक पटकावला. माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या विठ्ठलराव शिंदे साखर कारखान्याने ऊस गाळपात आणि साखर उत्पादनात राज्यात पहिला क्रमांक मिळविला. पाणीप्रश्न आणि अनियमित पावसाने वैतागलेल्या मंगळवेढ्यासारख्या दुष्काळी तालुक्यात अंकुश पडवळेसारखे जिद्दी शेतकरी सामूहिक शेततळी आणि नेटशेड शेती यशस्वी करताना दिसतात. नव्या जमान्याची भाषा बोलणारी विषमुक्त अथवा सेंद्रिय शेती असो, ठिबक सिंचन पद्धती असो वा नव्या तंत्रज्ञानावर विश्वास ठेवणारी शेती असो जिल्ह्यातील शेतकरी त्याचा स्वीकार करून पुढे जात असताना दिसतो.दुष्काळग्रस्तीचा शाप कायमचा पुसून टाकणे ही सोपी गोष्ट निश्चितच नाही. त्यासाठी संघर्ष आणि कृती यांचा मेळ फक्त शेतकऱ्यांनी घालून जमणार नाही. त्यासाठी प्रशासन, सहकार क्षेत्र आणि स्वत: शेतकरी यांनीच समन्वयाची भूमिका घ्यावी लागणार आहे. त्याच भूमिकेत सध्या जिल्हा दिसतो. राजकारणाच्या पलीकडे जाऊन शेती आणि विकास यांचा विचार करण्याची प्रक्रियाही जिल्ह्यात गतिमान होताना दिसते. ती अधिक गतिमान करण्याचे काम अधिकारी किती खुबीने करू शकतात याचा अनुभव सध्या येतो आहे. देशात सर्वांत मोठा दहा हजार कोटी रुपयांचा जिल्ह्याचा पतपुरवठा आराखडा तयार करणारे जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे आराखड्याबरहुकूम कामाला लागल्याचे दिसते. ११ लाख हेक्टर शेतीचे क्षेत्र असलेल्या जिल्ह्यात दोन लाख हेक्टर क्षेत्रात ऊस पीक घेतले जाते. १२३ टीएमसी पाणी क्षमता असलेले उजनी धरण असूनही सिंचन क्षेत्राची व्याप्ती वाढत नाही. जिल्ह्यातील ४३ लाख लोकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणाऱ्या उजनी धरणावरचे ओझे ठिबक सिंचनाशिवाय हलके होणार नाही. त्याचसाठी मुंढे यांनी ऊस पिकासाठी ठिबक सिंचन सक्तीचे केले आहे. जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषद प्रशासन यांनी मनावर घेतले तर जिल्ह्यातील शेतीचे सोने होऊ शकते, याचे भान जिल्हाधिकाऱ्यांबरोबरच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश काकाणी यांनी ठेवल्याचे दिसते. त्यामुळे कृषी क्षेत्रातील योजना थेट शिवारापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न दिसतो. जे जिल्ह्यात चांगले चालले आहे ते आत्महत्त्याग्रस्त विदर्भातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न त्याचाच एक भाग ठरावा. परंपरेने दुष्काळग्रस्त असलेल्या सोलापूर जिल्ह्यात कृषी आणि दुग्ध विकासासाठी कसे प्रयत्न चालले आहेत हे विदर्भातील शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष अनुभवावे यासाठी सुरेश काकाणी व सोलापूरचे विक्रीकर सहआयुक्त पुरुषोत्तम गावंडे यांनी एक चांगला उपक्रम आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने राबविला. विदर्भातील ५० शेतकऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यात कल्याणी दूध प्रकल्प, भंडारकवठे येथील सिद्धानंद कोटगुंडे यांनी नेटशेड शेतीच्या माध्यमातून घेतलेले ढोबळी मिरचीचे उत्पन्न तसेच मंगळवेढा तालुक्यातील खुपसंगी येथे क्रांती फार्मर्स क्लबच्या माध्यमातून चाललेले सामूहिक शेततळ्यासारखे उपक्रम त्या शेतकऱ्यांना दाखविण्यात आले. काकाणी-गावंडे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रफिक नाईकवाडी व जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी मदन मुकणे यांच्या मदतीने विदर्भातील शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देणारा उपक्रमदेखील दुष्काळग्रस्तीचा शाप पुसताना इतरांनाही सोबत घेऊन चालण्याचा संदेश देणारे एक पाऊलच ठरावे.