-साधना शंकर
‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या आपल्याकडच्या गाजलेल्या चित्रपटावर आधारित संगीतिका ‘कम, फॉल इन लव्ह’ या नावाने २०२२ साली ब्रॉडवेवर सादर झाली. चित्रपटांची नाटके होतात, पुस्तके निघतात आणि उलटेही होते; हे असे खूप आधीपासून चालत आले आहे; परंतु, मनोरंजनाच्या क्षेत्रात इतर प्लॅटफॉर्म्स आणि तंत्रज्ञान येत गेल्याने जगभर चित्रपटांपुढे आव्हान उभे राहिले असताना चित्रपटाचे रूपांतर नाटकात होणे हे टिकून राहण्याच्या दृष्टीने उचललेले महत्त्वाचे पाऊल ठरावे. अगदी कोविडच्या आधीसुद्धा चित्रपटगृहामध्ये येणाऱ्या प्रेक्षकांची संख्या कमी झाली होती आणि त्यानंतर थोडी सुधारणा झाली असली तरीही जगभरातल्या बॉक्स ऑफिसचा कानोसा घेता कोविडच्या आधी जेवढा गल्ला जमत असे त्याच्या २० टक्के कमी गल्ला २०२३ साली जमला, असे आढळून आले.
जगभरच चित्रपटगृहातली उपस्थिती घटत चालली असताना चित्रपटनिर्माते आणि स्टुडिओ चाहत्यांना पुन्हा पडद्याकडे खेचून आणण्यासाठी वेगवेगळ्या युक्त्या लढवत आहेत. चित्रपटात त्यांचे स्वारस्य टिकून राहावे, यासाठी निकराचे प्रयत्न सुरू आहेत. जगात आता डिजिटल/व्हर्च्युअलचा बोलबाला झाला असून लोक त्यात गुंतत आहेत. पडद्याविषयीचे स्वारस्य जिवंत राखण्यासाठी जिवंत नाट्यानुभव देणे ही नवी कल्पना पुढे आली आहे. हॉलीवूड आधीपासूनच चित्रपटगृहाबाहेरचे कार्यक्रम आयोजित करून चित्रपटांची जादू टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नात आहे. थीम पार्कच्या माध्यमातून चित्रपटांची विक्री होते त्यातूनही या माध्यमाला बळकटी मिळते. डिस्नेलॅण्ड आणि युनिव्हर्सल स्टुडिओच्या थीम पार्कचा विचार करा.
आज या स्टुडिओच्या अवांतर उद्योगांमुळे त्यांच्या मिळकतीत घसघशीत भर पडली आहे. चित्रपटाचे प्रत्यक्ष प्रदर्शन किंवा ओव्हर द काउंटर ते दाखवण्यातून मिळणारे उत्पन्न मात्र कमी झाले आहे. ‘स्ट्रेंजर थिंग्स’चा ताजा कथाभाग नेटफ्लिक्स लंडनच्या वेस्ट एंडमध्ये रंगमंचित करत आहे यात आश्चर्य नाही. लॉस एंजलिसमध्ये ‘स्क्विड गेम’चा अनुभव प्रेक्षकांना देण्यात येत आहे. कथेवर आधारित सहा प्रकारच्या खेळात प्रेक्षकांना सहभागी होता येते. अर्थातच या प्रत्यक्ष अनुभवासाठी चांगलेच पैसे मोजावे लागतात. मात्र, माध्यमाविषयी निष्ठा राखणे, स्वारस्य वाढवणे यासाठी या प्रयोगाचा उपयोग नक्कीच होतो. हॉलीवूड स्टुडिओच्या मालकीचे थीम पार्क्स जगभर उघडत आहेत.
वॉर्नर ब्रदर्सनी २०१८ साली अबुधाबीत जगातील सर्वांत मोठा इनडोअर थीम पार्क उघडला. डिस्ने आपल्या थीम पार्कची संख्या दुप्पट करण्याच्या विचारात असून त्यांच्या लोकप्रिय सिनेमांचे रंगमंचीय रूप तेथे सादर करण्यात येईल. ‘फ्रोजन’ याआधीच रंगमंचावर आला आहे. चित्रपटांविषयी जिवंत आणि भान हरपायला लावणारा नवनवा अनुभव समोर येत आहे. हॅरी पॉटरभोवती गुंफलेला परस्परसंवादी कला अनुभव ‘व्हिजन ऑफ मॅजिक’ या नावाने वार्नर ब्रदर्सनी सुरू केला आहे. सिनेमा, त्यांची कथानके आणि पात्राबद्दलची जादू लोकांच्या मनात जिवंत राहावी, यासाठी हे असे प्रत्यक्ष, जिवंत सादरीकरण उपयोगी पडत आहे. शेवटी काय तर, जास्तीत जास्त उत्कंठावर्धक कथा, स्वारस्यपूर्ण आणि अविस्मरणीय अशी पात्रे चित्रपटाच्या पडद्यावर निर्माण होत गेली तर त्यांच्याभोवती रंगमंचावरून सादर होणारा ‘नाट्यानुभव’ गुंफणेही वाढत जाईल.