न्यायासनावर बसलेल्या माणसांनी व्यक्त केलेल्या मतांना लोकशाहीत ‘न्यायदान’ असे म्हणतात. त्यामुळे या रामशास्त्र्यांनी, ‘‘भीती वाटत असेल तर डॉक्टरी व्यवसाय सोडा’’ असे म्हणणे डॉक्टरांना खचवणारे व गुंडांना बळ देणारे ठरते.
डॉक्टरांवर होत असलेल्या हल्ल्यांच्यावेळी समाज म्हणून आपण मूकदर्शक राहू शकत नाही.त्यांच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभे राहायलाच हवे. पण, त्याचवेळी अलीकडच्या काळात डॉक्टरांवर असे हल्ले वारंवार का होतात, या प्रश्नाचा शोध डॉक्टरांनी अंतर्मुख होऊन घेणे तेवढेच गरजेचेही आहे. डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्या अपप्रवृत्तींना वचक बसेल, अशा तरतुदी सरकारने कायद्यात तातडीने करायला हव्यात. डॉक्टरांच्या संपाबाबत न्यायालयाने व्यक्त केलेले मत वैद्यकीय क्षेत्रातील प्रामाणिक व्यक्तींवर अन्याय करणारे आहे, ही गोष्टही सुजाण म्हणवून घेणाऱ्या जागरूक नागरिकांनी न्यायसंस्थेला स्पष्टपणे सांगण्याचीही हीच वेळ आहे. न्यायासनावर बसलेली माणसे विवेकशील असतात. त्यांनी व्यक्त केलेल्या मतांना लोकशाहीत ‘न्यायदान’ असे म्हणतात. त्यामुळे या रामशास्त्र्यांनी, ‘‘भीती वाटत असेल तर डॉक्टरी व्यवसाय सोडा’’ असे म्हणणे डॉक्टरांना खचवणारे व गुंडांना बळ देणारे ठरते. म्हणूनच ते अनाठायी आणि न्यायदानातही न बसणारे आहे. उद्या खरोखरच या देशातील सर्वच डॉक्टरांनी काही दिवसांसाठी ही सेवा बंद केली तर त्याची जबाबदारी आपण स्वीकारणार का, असा प्रश्न या रामशास्त्र्यांना कुणीतरी विचारायला हवा.डॉक्टरांवर वाढत असलेल्या हल्ल्यांना वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तीही कारणीभूत आहे. काही लुटारू डॉक्टरांनी या पवित्र क्षेत्राला बदनाम केले आहे. या डॉक्टरांच्या पिळवणुकीच्या कहाण्या आपण नेहमी ऐकत आणि वाचत असतो. कसायाबद्दलही सहानुभूती वाटावी एवढे ते अमानुष वागतात, हा अनेकांचा अनुभवही आहे. पण या बदमाशांची शिक्षा या क्षेत्रात बहुसंख्येने असलेल्या प्रामाणिक डॉक्टरांना देणे योग्य नाही. विशेषत: शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांच्या बाबतीत अशा घटना जास्त घडतात. डॉक्टर-कर्मचाऱ्यांच्या जागा रिक्त, सोयी-सुविधा नाही, अशा विपरीत परिस्थितीत प्रचंड तणावात डॉक्टरांना तिथे काम करावे लागते. रुग्णालयात आलेल्या प्रत्येक रुग्णाला डॉक्टरांनी प्रथम आपल्यालाच तपासले पाहिजे, असे वाटते आणि इथेच या भांडणाला सुरुवात होते. नातेवाईक रुग्णाला खासगी रुग्णालयात घेऊन जातात तेव्हा तो मरणासन्न अवस्थेत असतो. आपल्याकडे आलेला पेशंट मरावा, असे कुठल्याही डॉक्टरला वाटत नाही. तो रुग्णाला वाचविण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न करतो. त्यात त्याला यशही मिळते. ‘रुग्णाचे प्राण वाचले’ हेच त्याचे खरे समाधान असते. पण, त्याला वाचवू शकला नाही तर नातेवाइकांच्या रोषाला तो बळी पडतो. एरवी ‘‘माझा परिचित, कार्यकर्ता तुमच्याकडे अॅडमिट आहे. काळजी घ्या, कमी पैसे घ्या’’ असे डॉक्टरला अधिकाराने सांगणारे नेते, पत्रकार, मान्यवर हल्ल्याच्यावेळी मात्र गायब होतात, कुणीही मदतीला धावून येत नाही. डॉक्टरांवरील हल्ल्यांना वैद्यकीय क्षेत्रातील लुटारू, सरकार जसे कारणीभूत आहे. तशीच माध्यमेही दोषी आहेत. या घटनांचे बरेचदा एकांगी वृत्तांकन होते आणि त्यातूनच संबंधित डॉक्टर काहीच दोष नसताना समाजाच्या दृष्टीने खलनायक ठरतो. अलीकडच्या घटनांनी प्रामाणिक डॉक्टर अस्वस्थ आहेत. अत्यवस्थ रुग्णावर उपचार करताना, ‘जर तो वाचला नाही तर आपल्या जिवाचे बरे-वाईट तर होणार नाही ना? या भीतीने त्यांना ग्रासले आहे. समाज म्हणून आपले ते अपयश आहे. परमेश्वराचे रूप म्हणावे असे सेवाभावी डॉक्टर समाजात अजूनही आहेत. पण, गल्लाभरू डॉक्टरांच्या गर्दीत या प्रामाणिक डॉक्टरांचा सेवाभाव समाजासमोर कधीच येत नाही. तो प्रकर्षाने समोर आला पाहिजे. त्यामुळे अशा घटनांना पायबंद बसेल. अत्याधुनिक वैद्यकीय उपचारपद्धती विकसित झाली नसतानाच्या काळात एखादा रुग्ण दगावल्यानंतरही रुग्णाचे नातेवाईक डॉक्टरला दोष देत नव्हते. ‘‘प्राण वाचविण्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न केले’’ ही कृतज्ञता त्यांच्यात राहायची. अलीकडच्या काळात डॉक्टर आणि रुग्णांचे नाते दुरावले आहे. वर्तमानातील घटना त्या श्रद्धेला तडा देणाऱ्या आहेत. ही श्रद्धास्थाने उद्ध्वस्त होणे कुणाच्याही हिताचे नाही. संप ही क्षणभंगूर प्रतिक्रिया आहे. ते अंतिम साध्य नाही, याचेही भान डॉक्टरांनी ठेवायला हवे. ‘डॉक्टर हा देव आहे, दानव नाही’ या मूल्याच्या तळाशीच अनेक प्रश्नांची उत्तरे डॉक्टरांना आणि समाजालाही सापडणारी आहेत.- गजानन जानभोर