-संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक
देशात श्रीमंत व गरीब यांच्यातील दरी झपाट्याने वाढत असून, त्यामुळे अर्थव्यवस्थेपुढे तसेच समाजापुढे काही आव्हाने उभी आहेत. मात्र, ठाणे जिल्ह्यातील पाणीटंचाईने ही दरी वेगळ्या अर्थाने पुसून टाकली आहे. शहापूर-आसनगाव किंवा मुरबाड यासारख्या परिसरातील छोट्या गावांमध्ये टंचाईमुळे महिला, मुली यांना किमान पाच किलोमीटर पायपीट करून डोक्यावरून पाण्याचे हंडे वाहावे लागत आहेत तर ठाण्यातील घोडबंदर रोडवर एक कोटी रुपये खर्च करून टू बीएचके खरेदी केलेल्या उच्च मध्यमवर्गीयांच्या सोसायट्यांना दरमहा टँकरपोटी किमान सहा लाख रुपये मोजावे लागत आहेत. ठाणेकरांचेपाणीमुंबईकरांनी सव्वाशे-दीडशे वर्षांपूर्वी पळवले तेव्हापासून टंचाईचे शुक्लकाष्ठ ठाणेकरांच्या मागे लागले.
ब्रिटिशांनी मुंबई शहर हे समुद्रालगत असल्याने बंदर म्हणून विकसित केले. मात्र, या मुंबई शहरात स्वत:ची तहान भागविण्याची क्षमता नाही. ठाणे व नाशिक जिल्ह्यांतून गुरूत्वाकर्षणाने पाणी मुंबईकडे आणून मुंबईकरांची तहान भागविण्याचा मार्ग सव्वाशे वर्षांपूर्वी स्वीकारला गेला. त्यावेळी भविष्यात ठाणे, नाशिक ही मोठी शहरे विकसित होतील, असा विचारही मनाला शिवला नसेल. त्यामुळे शहापूर, आसनगावच्या आदिवासी पाड्यांच्या तोंडचे पाणी काढून मुंबईतील मलबार हिल, कफ परेडमधील धनिक ढोसत आहेत. मुंबईत जेव्हा पाण्याचा अर्धा प्याला पिऊन मुंबईकर पाणी टाकून उठतो तेव्हा त्याच्या मनाला ही भावना शिवत नाही की, जेथून हे पाणी आले तेथील एक लहान मुलगी शाळेत जायचे टाळून आईच्या मदतीसाठी अशा घोटभर पाण्यासाठी उन्हात कळशी घेऊन पायाला चटके बसत असताना वणवण फिरत असेल.
शहापूर, आसनगाव येथील डोंगराळ भागात अनेक गावे आहेत. येथे सुरू केलेल्या नळ योजना ४० वर्षे जुन्या आहेत. अनेक भागात नळांना पाणी येत नाही. उंचावर पाणी नेण्यासाठी लागणाऱ्या विजेचे बिल कुणी भरायचे, पाणीपट्टी कुणी भरायची? असे असंख्य प्रश्न आहेत. येथील खर्डी, बिरवाडी पाणी योजनांची परिस्थिती अत्यंत खराब असल्याने हंडे, कळशा घेऊन पाण्यासाठी वणवण भटकणे अपरिहार्य आहे. येथील साजिवली व सावरशेत ही दोन गावे ७०० ते ८०० लोकवस्तीची. नदीच्या अगदी जवळ असूनही तेथे आतापर्यंत नळ योजना नाही. नदीपात्रात महिला, मुली पाणी भरायला जातात आणि पावसाळ्यात प्रवाहात वाहून दरवर्षी दुर्घटना घडते.
येथील गावांत मोबाइल टॉवर आहेत, स्मार्टफोन मिळतात, राष्ट्रीयीकृत बँका आहेत, मर्सिडीज मोटारी गावात येतात; पण घरात नळ नाही. असले तरी त्यांना पाणी येत नाही. आसनगाव, कसारा वगैरे भागात मोठ्या संख्येने रिसॉर्ट उभे राहिलेत. येथे मुंबई, ठाण्यातील लब्धप्रतिष्ठित मौजमजेकरिता येतात. त्या रिसॉर्टला बेकायदा बोअरवेल किंवा अन्य मार्गाने पाणीपुरवठा होतो. मात्र, गाव-पाडे तहानलेले आहेत. मुरबाडमध्येही तीच परिस्थिती आहे. येथील १२५ ग्रामपंचायतींनी तब्बल १८९ पाणी योजना राबविल्या. कंत्राटदारांना पैसे दिले. मात्र, टँकर सुरू आणि बायका-पोरींच्या डोक्यावरील हंडे-कळशा काही उतरत नाहीत.
घोडबंदर रोड हा ठाण्यातील सुशिक्षित, लब्धप्रतिष्ठितांचा परिसर. येथे मुंबईतील अनेक नामांकित बिल्डर्सनी टॉवर उभारलेत. येथे किमान ६५ ते ७० लाखांना वन बीएचके फ्लॅट मिळतो. या परिसरात कायम पाणीटंचाई आहे. सोसायटीला महिन्याकाठी पाच ते सहा लाख रुपये टँकरवर खर्च करावे लागतात.