- विजय दर्डा (चेअरमन, एडिटोरियल बोर्ड, लोकमत समूह)
जे चित्रपट देशभक्तीने परिपूर्ण आहेत, जे तरुणांना आणि आपल्या सर्वांना प्रेरणा देतात, ते मी नक्कीच पाहतो. अलीकडेच मी ‘शेरशहा’ हा सिनेमा पहिला आणि कारगिल युद्धाच्या कटु आठवणीत हरवून गेलो. आपले ५२८ सैनिक त्या युद्धात हुतात्मा झाले होते. हा प्रश्न माझ्या मनात कायम असतो, की जो कोणी युद्धात मरतो तो कोणाचा तरी मुलगा, भाऊ, नवरा असतो. युद्धे लादली जातात. म्हणूनच मला युद्धाचा तिरस्कार आहे. कारगिल युद्धात अदम्य साहस, शौर्य दाखवणाऱ्या भारतीय वीरांच्या कहाण्या अगणित आहेत. पण विक्रम बत्राची कहाणी मात्र त्यात चमकणारी! वेगळी.
विक्रम बत्रा हा हिमाचल प्रदेशातील पालनपूर या छोट्या; पण सुंदर शहरातला होनहार तरुण. सिनेमा पाहताना मनात आले, हिमाचलसारखा शांत प्रदेशाच्या कुशीतून असे शूर योद्धे जन्माला यावेत, याचे रहस्य काय असेल? कारगिलच्या युद्धात हिमाचलातल्या ५२ वीरांनी प्राणार्पण केले. त्यात दोन परमवीरचक्र विजेते होते. कॅप्टन विक्रम बत्रा यांना मरणोत्तर आणि हवालदार संजय कुमार यांना परमवीरचक्र दिले गेले. विक्रम बत्राचे वडील जी. एल. बत्रा आणि आई कमल कांता दोघेही शिक्षक होते. विक्रम आणि त्याच्या भावाला मातापित्यांनी लव-कुश अशी नावे दिली होती. तसे म्हटले, तर या कुटुंबाचा सैन्याशी दुरूनही काही संबंध नव्हता. लव मात्र शाळेत एनसीसीमध्ये जात होता. बालपणीच सैन्यात जाण्याचे त्याच्या मनाने घेतले आणि तिरंगा त्याला बोलावू लागला. ‘जन गण मन’चे जादुई स्वर जणू त्याच्यावर स्वार झाले. शेवटी तो सेनादलात सामील झाला.
कमांडो प्रशिक्षण घेतलेल्या या वीराने कारगिलच्या युद्धात हंप तथा राकी नाब जिंकून आपले पहिले शौर्य दाखविले. तो सेकंड लेफ्टनंटचा कॅप्टन झाला. त्यानंतर कारगिलमध्ये ५१४० नामक शिखर जिंकून त्याने पुन्हा अशक्य ते शक्य करून दाखविले. विक्रमची तुकडी अशा मार्गाने शिखरावर पोहोचली, की शत्रूला पत्ताही लागला नाही. युद्धात इतक्या आणीबाणीच्या वेळी सर्वांत पुढे राहून पथकाचे नेतृत्व करणे ही विक्रमची खासियत होती. २० जून १९९९च्या पहाटे ३ वाजून ३० मिनिटांनी ५१४० हे शिखर त्यांनी गाठले आणि रेडिओवरून ‘ये दिल मांगे मोअर’ हा संदेश दिला. ती विजयाची घोषणा होती ! सारा देश विक्रम बत्रा यांचा दिवाना झाला होता. या विशेष चढाईसाठी कर्नल योगेश कुमार जोशी यांनी विक्रमला ‘शेरशाह’ असे सांकेतिक नाव दिले होते.विक्रम बत्रा यांच्या शौर्याचे किस्से गाजत होते. हा शेरदिल तरुण काहीही करू शकतो, असे मानले जाऊ लागले.
कारगिलचे घमासान सुरूच होते. अत्यंत चिंचोळ्या ४८७५ या शिखरावर चाल करून शत्रूला हुसकण्याची जबाबदारी विक्रम आणि त्याच्या तुकडीवर टाकण्यात आली. दोन्ही बाजूला दरी होती. वर जायचा एकमेव रस्ता शत्रूच्या ताब्यात होता. विक्रमने ध्येय साध्य करण्यासाठी अशी काही वाट निवडली, की ते शत्रूच्या डोक्यातही येणे शक्य नव्हते. शिखरावर पोहोचताच समोरासमोर झालेल्या लढाईत विक्रमने पाच शत्रू सैनिक यमसदनी धाडले. शरीराची गोळ्या लागून चाळणी झालेली असतानाही विक्रमने प्राण पणाला लावून ग्रेनेड फेकला आणि दुश्मनांंना संपविले. भारताने हे शिखर सर केले खरे; पण आपण ‘शेरशाह’ गमावला.
‘एक तर बर्फाळ शिखरावर तिरंगा फडकावून येईन किंवा तिरंग्यात लपेटून येईन’, असे विक्रम यांनी पालनपूरहून निघताना आपल्या मित्राजवळ म्हटले होते. १३ जम्मू-काश्मीर रायफल्समध्येच नव्हे तर सैन्याच्या प्रत्येक तुकडीत विक्रम यांचे हे वाक्य अभिमानाने सांगितले जाते. खरे तर ही तिरंग्याचीच ताकद आहे जी एखाद्या माणसाला देशासाठी सर्वोच्च बलिदान देण्याची प्रेरणा देते, शत्रूच्या नाकीनव आणण्याचे बळ देते ! भारतमातेला जगभर एक देश म्हणून ओळख मिळते ती या ताकदीच्याच भरवशावर.
एक प्रसंग आठवतो. राज्यसभा सदस्य म्हणून संसदेच्या सभागृहात प्रवेश करीत असताना माझ्या छातीवर तिरंग्याची लेपन पीन होती. ‘ही लावून आपण आत जाऊ शकत नाही, त्यासाठी परवानगी नाही’, असे सांगून मला अडवले गेले. पण अथक संघर्ष करून मी अखेर तो प्रवेश मिळवलाच. छातीवर तिरंगा लावणे, हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे हे संसदेने मान्य केले. - याच तिरंग्यासाठी सामान्य माणूस एक मिनिट थांबणे दूर राहिले, पोहोचूही शकणार नाही अशा दुर्गम ठिकाणी आपले सैनिक ठिय्या देऊन राहतात, तिथेही तिरंगा त्याच्यासोबतीला असतो. मला वाटते, या शूरवीरांच्या कहाण्या सांगणारे चित्रपट सतत निघाले पाहिजेत. त्यातून तरुणांना प्रेरणा मिळेल. दुर्दैवाने, आज तरुणांना प्रेरणा मिळवण्याच्या कमी संधी आहेत. अभ्यास असो, क्रीडा किंवा व्यवसाय, सर्वत्र प्रेरणेचा अभाव आहे. समाज, सरकारकडून लोकांना प्रेरणा मिळत राहिली पाहिजे. लोकांनी चुकीच्या गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे. कोणतीही भेसळ करण्यापूर्वी विचार करा की हे पाप आहे. जर एखादा तरुण एखाद्या शैक्षणिक संस्थेत जात असेल, तर शिक्षकाने असा आदर्श ठेवला पाहिजे की विद्यार्थ्याला प्रेरणा मिळेल, खेळाडूंना वाटेल की इथे कोणताही भेदभाव नाही. राजकारण्यांनी सार्वजनिक सेवेसाठी समर्पित असले पाहिजे.
विक्रम बत्रा हुतात्मा झाल्यावर डिम्पल चिमा या त्यांच्या मैत्रिणीने अन्य कुणाशीही विवाह करायला नकार देत एकटे राहणे पसंत केले. या तरुण मुलीच्या जिद्दीला मी नमन करतो. प्राणांची बाजी लावून तिरंग्याचा मान राखणारे सर्व हुतात्मे, सैनिकांना माझे नमन. त्यांनी तिरंग्याची, भारतमातेची प्रतिष्ठा राखली. म्हणूनच तर आपण गर्वाने म्हणतो, ‘सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा.’ जय हिंद.. वंदे मातरम!