- सचिन जवळकोटे
गेल्या शंभर वर्षांत कधी झाला नसेल असा अवसानघातकी पाऊस जिल्ह्यावर धबाधबा कोसळला. चक्रीवादळाचं नाव घेत पुरता जिल्हा या पावसानं धुऊन काढला. ध्यानीमनी नसताना शेकडो वाड्या-वस्त्या पाण्याखाली गेल्या. जीवाभावाची मुकी जनावरं डोळ्यादेखत तडफडून मेली. आता पूर ओसरल्यानंतर पुढाऱ्यांचे पाहणी दौरे सुरू होतील. पंचनाम्याची कागदंही रंगविली जातील. पिढ्यान्पिढ्या दुष्काळाशी लढणारा सोलापूरचा हा भूमीपुत्र याही संकटातून हळूहळू सावरेल; मात्र सहानुभूतीच्या नावाखाली या सहनशीलतेचा अंत पाहू नका...कारण भलेही आपण सोशिक आहोत, पण लाचार नाही. ‘चक्रीवादळाचे हैदराबादमध्ये आठ बळी’ ही ब्रेकिंग न्यूज वाचत-बघत सोलापूरकर रात्री झोपून गेले; मात्र त्यांना कुठं ठावूक होतं की, हेच वादळ उद्या सकाळपर्यंत आपल्या अंगणात घोंगावणारंय. पहाटे पावसाला सुरुवात झाली. ‘रिपरिप’ करत आलेला हा पाऊस नंतर ‘बदाऽऽ बदाऽऽ’ कोसळू लागला. भरदुपारी बारा वाजता अंधारून आलं. काळ्या ढगांची झुंडच जमिनीकडं झेपावली. त्यानंतरची रात्र वाड्या-वस्त्यांसाठी काळरात्र ठरली. होत्याचं नव्हतं झालं. नदीकाठची गावं पाण्यात बुडाली. ओढ्याकाठच्या गावांमध्येही मंदिराच्या पायऱ्यांपर्यंत पूर आला. दिसेल त्या शिवारात तळंच तळं दिसू लागलं.सर्वत्र आकांत माजला. हाती लागेल ती वस्तू घेऊन लोक वस्त्यांमधून बाहेर पळू लागले. गावाकडं जाणाऱ्या रस्त्यानंही नाल्याचं रूप घेतलेलं. त्यामुळे अनेकांची रात्रउघड्यावर भिजण्यातच गेली. खाली काळी दलदल, वरही काळं आकाश. एखाद्या हिंस्त्र राक्षसासारखं अंगावर हिंस्त्रपणे तुटून पडणारं. यंदा खरिपात नाही तर नाही किमान रब्बीत तरी कमवावं, हे स्वप्न घेऊन पेरणीला उतरलेल्या ‘भाऊ’चं तिफण शेतातल्या तळ्यात रुतलं. ‘कर्णा’च्या रथासारखं. कारखान्याचा भोंगा वाजला की, आपला ऊस दिमाखात वाजत-गाजत जाईल, याचा हिशोब करत लेकीच्या लग्नाची तयारी करणाऱ्या ‘दादा’चा ऊसही साचलेल्या पाण्यात चिपाड होऊन पडला, पाऽऽर मेल्यागत. गेली दोन वर्षे थकलेलं कर्ज यंदा थोडंतरी फेडू, या आशेनं ‘अण्णा’नं फुलविलेली केळीची बाग पुरती भुईसपाट झाली. फळबागांचीही वाट लागली. आयुष्यभर जीवापाड जपलेली कैक मुकी जनावरं पाण्यात बुडून तडफडताना पाहून ‘अप्पा’च्या डोळ्यातलं पाणीही पावसाच्या सरींसोबत वाहून गेलं. ...आता पूर ओसरला. रडून रडून थकलेले डोळेही कोरडे पडले. पाण्यानं भरलेली शेती मात्र तशीच चिखलात फसली. पुरानं या जमिनीचं पुरतं वाटोळं केलं. हातातली पिकं गेली. पुढच्या रब्बीसाठीही नापीक बनली. कर्ज काढून पेरणी करणारे पुरते कर्जबाजारी बनले. घरं गेली, वस्ती गेली, शेती उद्ध्वस्त झाली. इतकी भयाण अवस्था आजपावेतो कधीच नाही झाली. कदाचित याचं गांभीर्य लक्षात आलं म्हणूनच ‘अजितदादा’ ध्यानीमनी नसताना ‘बारामती’ची वाट सोडून पंढरपूरकडं वळाले. गेल्या सात महिन्यांपासून ‘मातोश्री’ मुक्कामी असणारे ‘ऑनलाईन सीएम’ही सोलापुरी बांधावर येताहेत. सरकारलं जागं करण्यासाठी ‘देवेंद्रपंत’ही गावोगावी पोहोचताहेत.बाकीचे नेतेही शिवारात जाताहेत. फोटोंचे फ्लॅश चमकताहेत. टीव्हीवर मुलाखती झळकताहेत. ‘त्वरित पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाला दिलेत’ असे टिपिकल राजकीय डायलॉग्स् कॅमेऱ्यासमोर फेकलं जाताहेत. ‘महसूल’ची मंडळीही फायली हातात धरून त्यांच्या पुढं-पुढं करताना दिसताहेत; मात्र या साऱ्या गोष्टींची लोकांना चांगलीच सवय झालीय. यापूर्वीही असे अनेक पंचनामे केले गेले. कागदं रंगविली गेली, फोटो छापून नेतेही मोकळे झाले; मात्र प्रत्यक्षात नंतर पुढं काय झालं, हे सारं धक्कादायकच. दौऱ्याचा गाजावाजाच खूप झाला, हाती काय पडलं ?
अवैध वाळू माफियांचे ट्रक्स् रात्रीच्या अंधारात जेवढ्या सहजपणे जाऊ दिले जातात, तेवढी चपळता तलाठ्यांनी पंचनाम्यातही आता दाखवायला हवी. एखादी मोठी पत्ती सरकविल्यानंतर जेवढ्या गतीनं सात-बाऱ्यावर नावं चढतात, तेवढ्या वेगानं नुकसानीचे आकडे तयार व्हायला हवेत. संपूर्ण ऊस बिलं अदा करण्यासाठी जसं साखरसम्राट वर्षानुवर्षे वाट पाहायला लावतात, तसा वेळकाढूपणा नुकसानभरपाई देण्यात होऊ नये. किरकोळ चुका दाखवून बँकवाले जसं कर्ज प्रकरण मंजूर करण्यास टाळाटाळ करतात, तसं छोट्या-छोट्या नियमांवर बोट ठेवून उगाच एकाही लाभार्थ्याला मदतीपासून वंचित ठेवायला नको.
रमजान मंदिरात... रामदेव मशिदीत !
हैदराबादहून निघालेलं ‘चक्रीवादळ’ सोलापूरला येता-येता सुदैवाने खाली सरकलं. कर्नाटकातल्या कलबुर्गीजवळून ते पुढं सरकलं. याचा सर्वाधिक फटका अक्कलकोट, दक्षिण सोलापूर अन् मंगळवेढा तालुक्यातील सीमेवरच्या शेकडो गावांना बसला. गाव सोडून दुसरीकडं स्थलांतरित होण्याची वेळ हजारो पूरग्रस्तांवर आली. काहीजणांची तात्पुरती सोय झेडपी शाळेत, तर काहीजणांची मंदिर-मशिदीत केली गेली. मंदिरात ‘रमजान’ला सहारा मिळाला, तर ‘रामदेव’ला मशिदीत निवारा. निसर्गासमोर सारे एकच असतात, हे या वादळाने पुन्हा एकदा सिद्ध केलं.
(लेखक 'लोकमत सोलापूर'चे निवासी संपादक आहेत.)