प्रिय तात्यासाहेब, ऊर्फ कुसुमाग्रज,जय मराठी.आपला जन्मदिवस महाराष्टाने मराठी भाषा डे म्हणून सेलिब्रेट केला. विधिमंडळात मात्र राज्यपालांचे स्पीच मराठीत का नाही म्हणून थोडा गोंधळ झाला. पण एनी वे, तो लगेच शांत झाला. पण सतत मराठी मराठी म्हणून बोलणारे, स्वत:ची नेमप्लेट मराठीत लावणारे शिवसेनेचे नेते दिवाकर रावते मात्र राज्यपालांचे स्पीच मराठीत का नाही म्हणून काहीच बोलले नाहीत बरंका... नाहीतर तुम्ही त्यांना मराठीवर प्रेम करणारे म्हणून फेव्हर कराल. पण तसं काही झालेलं नाही. तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगितलं.काल आमच्या बंटीच्या स्कूलमध्येसुद्धा मराठी डे सेलिब्रेट झाला. सगळ्यांना मराठी ड्रेस कोड होता, धोतर आणि टोपी. आमचा बंटी एकदम क्यूट दिसत होता. शिवाय तेथे वेगवेगळे स्टॉल पण लावले होते. तुम्हाला सांगतो तात्यासाहेब, सगळ्यात बेस्ट स्टॉल होता पिझ्झा आणि बर्गरचा. त्याशिवाय भेळ, पाणीपुरीवाला देखील जाम भारी होता बरंका. बंटीच्या स्कूलच्या बाहेरच युपीवाला शर्मा आहे, त्याचा स्टॉल होता. शिवाय चौरसियाची कुल्फी होती, आमच्या ओळखीच्या सिंगअंकलने भुट्टे भाजण्याची मशीनपण लावली होती. सिंगअंकल ना खूप मेहनती आहेत. सगळीकडून भुट्टे आणतात, मस्त भाजतात आणि वरती लेमन चिलीची पेस्ट लावून देतात. एकदम भारी लागतं... त्याशिवाय तिकडून शेट्टी अण्णाची इडली फ्रायपण होती. हां... जरा ओनियन आणि कॅप्सीकम जास्ती होतं त्यात, पण मस्त होती टेस्ट... तुम्ही कधी खाल्ली होती का हो इडली फ्राय... नसेल तर सांगा बरंका...आमच्या शेजारी डेंटिस्ट डॉक्टर राहतात. त्यांनी पण त्यांच्या हॉस्पिटलमध्ये मराठी डे म्हणून सगळ्या नर्सेस आणि रेसिडेन्टना दामूचा वडा पाव दिला होता खायला. मी पण गेलो होतो त्यांना भेटायला. तर त्यांची रिसेप्शनिस्ट म्हणाली, आज वडा पाव आहे, खाणार का? उद्या आलात तर चायनिज नुडल्स मिळतील...तात्यासाहेब, मी त्यांना म्हणालो, अहो बाई, मराठी भाषा डे आहे. तेव्हा मराठी पदार्थ खा... तर ती तोंड वेंगाडून म्हणाली, तुम्ही तरी मराठीत बोलता का सांगा बरं. मग म्हणाली, रेल्वे सिग्नलला काय म्हणतात माहितीयं का? मी म्हणालो, गमना गमक लोकदर्शक ताम्रपट्टिका असं म्हणतात. तर ती म्हणाली तुम्हालाच ठेवा ती पट्टी का काय ते. डॉक्टरला वैद्य म्हणता का तुम्ही, आणि पेपर, पेन, डायरी, फोन, मोबाईल, सीमकार्ड, नर्स, माऊस, पॅड, गॅस, लायटर, सिगारेट, चिकन, प्लेन, बस, कार, लोकल, ट्रेन यांना रोज काय म्हणता तुम्ही असंही वर तोंड करून म्हणू लागली ती... मला ना तात्यासाहेब, फार बॅड फिल झालं बघा... तरी मी तिला म्हणालो, अगं मराठीत खूप समृद्ध साहित्य आहे. जरा समिधा, विशाखा, रसयात्रा हे कुसुमाग्रजांचे साहित्य वाच... म्हणजे मराठी काय ते कळेल तुला. तर ती म्हणाली, अय्या, या कोणत्या डीश आहेत..? मला जरा रेसिपी सांगता का? काय काय साहित्य लागेल ते पण सांगा. मी नोट करते आणि आजच फूडहॉलमध्ये जाऊन बाय करते... तात्यासाहेब, असा झाला आमचा मराठी डे... तुम्हालाही नक्की आवडला असेल. तुम्ही आणखी बुक्स लिहा, आम्ही नक्की किंडलवर रिड करू...- अतुल कुलकर्णी ( atul.kulkarni@lokmat.com )
आम्ही मराठी डे सेलिब्रेट केला !
By अतुल कुलकर्णी | Published: February 28, 2018 12:08 AM