पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सत्ताग्रहणाच्या दिवसापासूनच स्वच्छतेवर भर देणे सुरू केले असले तरी, त्यांच्या मनातील स्वच्छ भारत काही प्रत्यक्षात साकार होताना दिसत नाही. भारत सरकारचे ग्राहक व्यवहार सचिव जे. पी. मीणा यांनी जी खंत व्यक्त केली, ती एक प्रकारे मोदींच्या स्वच्छ भारत अभियानाचे अपयश अधोरेखित करणारीच म्हणावी लागेल. शहरे स्वच्छ राखणे ही केवळ स्वच्छता कर्मचाऱ्यांचीच जबाबदारी नव्हे, तर १.२ अब्ज ग्राहकांनीही आपली जबाबदारी ओळखायला हवी, असे मीणा म्हणाले. त्यांचा रोख होता तो कोणत्याही शहरात इतस्तत: पडून असलेल्या फास्ट फूड पॅकेट्सकडे ! मीणा जे बोलले ते अगदी खरे आहे. संपूर्ण जगात आम्हा भारतीयांना घाणेरडे लोक म्हणून ओळखले जाते. ही प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केवळ मोदी सरकारनेच नव्हे, तर आधीच्या सरकारांनीही आपापल्या परीने केला; मात्र दुर्दैवाने एकविसाव्या शतकात प्रवेश केल्यानंतरही आपली प्रतिमा बदललेली नाही, हे दुर्दैवी असले तरी वास्तव आहे. आमच्या अस्वच्छ गावांचा, शहरांचा संबंध अनेकदा गरिबीशी जोडला जातो. त्याचप्रमाणे आमच्या वाईट सवयींचा संबंधही शिक्षणाच्या अभावाशी जोडला जातो. थोडा अंतर्मुख होऊन विचार केल्यास हे संबंध कसे बादरायण आहेत, हे सहज लक्षात येते. जगात असे अनेक देश आहेत, जे भारतापेक्षाही गरीब आहेत; मात्र स्वच्छतेच्या संदर्भात ते भारताच्या किती तरी पुढे आहेत. फार लांब कशाला, आमच्या अगदी निकट असलेला श्रीलंका हेच त्याचे उत्तम उदाहरण आहे. राहता राहिला प्रश्न वाईट सवयींचा संबंध शिक्षणाच्या अभावाशी जोडण्याचा, तर असा काहीही संबंध नसतो, हे नुकतेच तेजस या नव्या आधुनिक रेल्वेगाडीने प्रवास केलेल्या आमच्या बांधवांनी सप्रमाण सिद्ध केले आहेच ! महागडे भाडे असलेल्या या गाडीने प्रवास करणारे लोक निश्चितच अशिक्षित नव्हते. या सुशिक्षित प्रवाशांनी मनोरंजनासाठीच्या एलईडी स्क्रीनची चोरी करण्याचा प्रयत्न केला, ते जमले नाही तेव्हा त्या स्क्रीनची तोडफोड केली आणि वातानुकूलित असलेल्या गाडीत घाणीचे आणि दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण केले ! आमच्या देशातील अनेक ‘पॉश’ म्हणविल्या जाणाऱ्या सुखवस्तू वसाहतींमध्ये झकपकपणा केवळ बंगल्यांच्या किंवा सोसायट्यांच्या आवारांच्या आतच दिसतो. बाहेर रस्त्यांच्या किनारी किंवा सर्व्हिस गल्ल्यांमध्ये मात्र कचऱ्याचे ढीग दिसतातच! मीणा यांनी म्हटल्याप्रमाणे फास्ट फूड पॅकेट्सचा कचरा वाढतच चालला आहे आणि त्यामध्ये मोठा वाटा सुशिक्षित मध्यमवर्गीय व सुखवस्तू कुटुंबाचाच असतो. थोडक्यात, स्वच्छतेच्या अभावाचा गरिबी किंवा शैक्षणिक अहर्तेशी काहीही संबंध नसून, मानसिकतेशीच आहे. आपली वस्ती, आपले गाव किंवा शहर, आपल्या सार्वजनिक मालमत्ता या आपल्या घराप्रमाणेच स्वच्छ राखण्याची जबाबदारी आपलीच आहे, ही मानसिकता जोवर रुजत नाही, तोवर स्वच्छतेचे स्वप्न साकारणे नाही !
आम्ही घाणेरडे !
By admin | Published: June 06, 2017 4:25 AM