पाऊस चांगला झाला म्हणून आम्ही उसाचे उत्पादन जास्त घेतले आणि राज्याला साखर उत्पादनात देशात आघाडीवर नेले. त्यात सोलापूरचा वाटा मोठा आहे. उसासाठी ठिबकचा वापर केला तर तिप्पट क्षेत्र ओलिताखाली येईल. सरकारने ठिबक अनुदान देऊन उस उत्पादकांना पाणीबचतीसाठी प्रोत्साहित केले पाहिजे.गतवर्षी झालेल्या पुरेशा पावसामुळे यंदा देशाच्या साखरेच्या उत्पादनात चक्क ४५ टक्के वाढ दिसत असून, देशातील साखरेचे उत्पादन सुमारे २९५ लाख टनापर्यंत जाईल, असा अंदाज आहे. यंदा साखर उत्पादनात महाराष्टÑाने उत्तर प्रदेशालाही मागे टाकून देशात अव्वल स्थान मिळवले आहे. तर राज्यात सोलापूर जिल्ह्याने साखर उत्पादनात राज्यात आघाडी घेतली आहे. एकट्या सोलापूर जिल्ह्यात १७ लाख मे. टन साखरेचे उत्पादन झाले आहे. देशातील ५२३ साखर कारखान्यांपैकी सर्वात जास्त १८७ साखर कारखाने महाराष्टÑात चालू होते, तर उत्तर प्रदेशातील केवळ ११९ साखर कारखाने चालू होते. अद्यापही महाराष्टÑातील १५० साखर कारखाने चालूू आहेत. मुबलक उत्पादन झाले तर साखरेचे काय करायचे ही चिंता सरकारबरोबरच साखर उत्पादकांनाही पडणे साहजिक आहे. साखर महागल्याने महागाईविरुद्ध बोलणाऱ्यांना ‘साखर खाल्ली नाही तर मरत नाही’, या एका दिग्गज नेत्याच्या सडेतोड शेरेबाजीची आजही आठवण येते. साखर उत्पादनात वाढ होणार असल्याने साखर अतिरिक्त होणार आणि साखर स्वस्त होणार, असे अंदाज येऊ लागले असले तरी साखर स्वस्त झाली तर शेतकरी आणि उत्पादकांना मोडीत काढल्यासारखे होणार आहे. साखरेचा भाव स्थिर ठेवून उर्वरित साखर निर्यात केल्यास साखरेचे दर उत्पादक आणि उपभोक्ता यांना परवडणार आहेत. देशाची गरज पाहता यंदा आपल्याकडे ३० लाख टन साखर शिल्लक राहणार आहे. त्यामुळे उर्वरित साखर निर्यात करून साखरेचे दर नियंत्रित ठेवता येणे शक्य आहे. केवळ मुबलक पाऊस झाला, धरणे भरली म्हणून आपण साखर उत्पादनात यंदा अग्रेसर राहू शकलो. पण कधी दुष्काळ आला तर आपण आपली साखर उत्पादनातील मिरासदारी कायम ठेवूू काय? असा प्रश्न स्वत:ला आजच विचारला पाहिजे. धरणातील उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन केले तर याच पाण्यात आणखी किती शेती ओलिताखाली येऊ शकते, याचा विचार केला पाहिजे. साखर कारखानदारी ही प्रचंड रोजगार निर्मिती करणारी इंडस्ट्री आहे. आपण किती साखर उत्पादन करू शकतो आणि महाराष्टÑातील किती लोकांना रोजगार देऊ शकतो याचा अंदाज येतो. साखर कारखानदारीचा संबंध थेट शेतकºयांशी येतो. वाढते साखर कारखाने थेट व शेतीपूरक रोजगार निर्मिती करत असले तरी उसासाठी मुबलक पाणी लागते हे विसरून चालत नाही. महाराष्टÑात २०० च्यावर साखर कारखाने आहेत. यंदा मात्र १८७ कारखान्यांनी गाळप सुरू केले. पण उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर केला तर तिप्पट क्षेत्र ओलिताखाली येऊ शकते. म्हणजे उसासाठी ठिबक सिंचनाचा वापर केला तर उसाच्या क्षेत्रात तिप्पट वाढ होऊ शकते. आणि देशाच्या साखर उत्पादनातील एक मोठे राज्य म्हणून महाराष्टÑाला कायम मान मिळू शकतो. याशिवाय रोजगार निर्मितीमध्येही प्रचंड वाढ होऊ शकते. आजच्या घडीला ठिबक संच वापरून ऊस शेती केली तर मोठ्या अर्थकारणाला वाव आहे. एक तर ठिबकमुळे मजुरांची व मजुरीची बचत होते. शिवाय पाण्यातून द्रव्य खते देता येतात, आणि पाण्याचे योग्य संतुलन होते. खर्चातही बचत होते. शेतीसाठी ठिबक संच देण्याचे सरकारचे धोरण आहे. पण ते ऊस उत्पादकांना प्राधान्याने दिले तर अधिक लाभदायी अणि परिणामकारक होणार आहे. पाणी बचतीला आणि रोजगार निर्मितीला मोठी चालना मिळणार आहे.- बाळासाहेब बोचरे
आम्ही सोलापुरी साखरेच्या पट्ट्यातील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2018 4:19 AM