- यदु जोशी(सहयोगी संपादक,लोकमत)शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेशी संघर्ष टाळला, हे चांगलेच झाले. दोन्ही गट एकाच दिवशी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर गेले असते तर राडा झाला असता. आधी कोणी जायचे यावरूनही संघर्ष होऊ शकला असता. त्यातून कदाचित ठाकरेंना सहानुभूती मिळाली असती. शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा रोखण्याचा प्रयत्न, ऋतुजा लटके यांची उमेदवारी लटकविण्याची चाल यातून ठाकरेंना सहानुभूतीच मिळाली. त्यापासून धडा घेऊन ‘आदल्या दिवशी आम्ही, प्रत्यक्ष पुण्यतिथीला तुम्ही’ असा मार्ग शिंदे गटाने काढला असावा. केवळ हे एकच कारण नसावे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे योग्य नाही, असा विचारही शिंदे यांनी मुख्यमंत्री म्हणून केला असेल. दुसऱ्याची रेष कमी करण्यापेक्षा आपली मोठी करण्याचे प्रयत्न शिंदे गटाने वाढविले तर बरे होईल.
खरेतर त्यांच्यासमोर दुहेरी आव्हान आहे. उद्धव ठाकरेंच्या सेनेसमोर त्यांना स्वत:ला सिद्ध करायचे आहे आणि त्याचवेळी भाजपसारख्या तगड्या प्रतिस्पर्ध्यासोबत टिकायचे आहे. त्यासाठी बार्गेनिंग पॉवर वाढवावी लागेल. ती वाढत नसल्यानेच महामंडळांमध्ये ५० टक्के वाटा देण्याची त्यांची मागणी भाजप मान्य करत नसल्याचे चित्र आहे. ३० टक्क्यांवर समाधान माना असा भाजपचा दबाव आहे आणि त्यामुळेच महामंडळांचे आपसातील वाटप अडले असल्याची माहिती आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार अडण्यामागेही हेच महत्त्वाचे कारण आहे म्हणतात. शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेचे ४० आमदार त्यांच्यासोबत गेले. जिल्ह्याजिल्ह्यातील शिवसैनिक त्यांच्यासोबत बऱ्यापैकी जात आहेत पण ते टिकतील तेव्हाच जेव्हा ते ठाकरेंना सक्षम पर्याय ठरतील. भाजपशी जुळवून घेतानाच आपल्या अटी, शर्तींवर बाळासाहेब ठाम राहत असत. शिंदेंमध्येही तसे करण्याची क्षमता किती आहे यावर पुढचे बरेच काही अवलंबून असेल. सध्या तरी ठाकरेंशी भिडण्यातच शिंदे गटाची शक्ती खर्ची होत आहे. मित्राच्या लाठीने शत्रूला मारणे भाजपला का नको असेल? शिंदे गटातील बहुतेक मंत्र्यांना त्यांच्या मतदारसंघात वा जिल्ह्यात नेता म्हणून मान्यता असणे आणि भाजपच्या किमान अर्धा डझन मंत्र्यांची राज्याचे नेते म्हणून असलेली ओळख हा फरक आहेच. भाजपचे मंत्री भाजप कार्यकर्ते, नेत्यांना बळ देतात, शिंदेंचे मंत्री त्याबाबत कमी पडताना दिसतात. बाळासाहेबांचे स्मारक कोणाचे? बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्कजवळील महापौर बंगल्यात उभे होत आहे; पण त्याचे कर्ताधर्ता कोण याचा मोठा वाद नजीकच्या काळात उद्भवू शकतो. स्मारक सरकारच्या ताब्यात द्या, अशी मागणी भाजपचे आ. प्रसाद लाड यांनी केली आहेच. तूर्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादावर पडदा टाकला असला तरी भविष्यात स्मारकावर ताबा कोणाचा हा विषय ऐरणीवर येईलच. स्मारक उभारण्याचे काम एमएमआरडीए हे राज्य सरकारचे प्राधिकरण करत आहे; पण सरकारच्या विरोधात असलेले आदित्य ठाकरे हे स्मारक समितीचे अध्यक्ष आहेत. सरकार आणि उद्धव-आदित्य ठाकरे हे स्मारकाबाबत एकमेकांना विचारत नाहीत. स्वतंत्रपणे आढावे घेतात. शिवसेनेतील फूट बाळासाहेबांच्या स्मारकापर्यंत पोहोचली आहे. राजकारणातील कटूता दूर व्हायला हवी, असे बड्या नेत्यांना मनापासून वाटते का? निदान देवेंद्र फडणवीस, संजय राऊत तसे बोलले, एकनाथ शिंदे यांनी पुण्यतिथीच्या निमित्ताने येऊ पाहणारी कटूता वेळीच टाळली. हे चांगले संकेत आहेत; पण मध्येच विनयभंगासारखी प्रकरणे ही कटूता टाळण्याच्या हेतूबद्दल शंका उपस्थित करतात. संजय राऊत बऱ्यापैकी मवाळ झालेले दिसतात. मात्र, फक्त मोठ्या नेत्यांनी संयम बाळगून होणार नाही, त्यांच्यासोबतच्या शाऊटिंग ब्रिगेडलादेखील समज द्यावी लागेल. त्यांची चलती आहे तोवर कटूता कशी मिटणार? कर्मचारी भरतीच्या आड हे काय? राज्यात सरकारी कर्मचाऱ्यांची ७५ हजार पदे भरण्यात येणार आहेत. बेरोजगारीच्या वाढत्या दुष्टचक्रात हा मोठा दिलासा शिंदे-फडणवीस यांनी दिला आहे. मात्र, त्यासाठी प्रत्येक विभागाकडून कर्मचाऱ्यांचा आकृतीबंध मागविताना वेतनावरील खर्च २० ते ३० टक्के कमी होईल अशा पद्धतीनेच आकृतीबंध तयार करून पाठवा, असे निर्देश दिलेले होते. त्यामुळे पदभरतीच्या आड पदांची कपात कौशल्याने केली जात आहे. सरकारी कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या संघटना इशारेच देत असतात फक्त. कर्मचारी संघटना आक्रमक बनतात, तेव्हा अधिकाऱ्यांची संघटना सरकारशी जुळवून घेते, हा अनुभव आजचा नाही. सातव्या वेतन आयोगाच्या घसघशीत पगाराने कर्मचाऱ्यांचा लढा लंचटाईमपुरता मर्यादित केला आहे.
‘पगारात भागवा अभियाना’चा तर पार फज्जा उडाला आहे. एका महिला लाचखोर तहसीलदाराच्या घरात कोट्यवधी रुपयांचे घबाड सापडले. पनवेल, अलिबाग, ठाणे, ठाणे रेती गट, हवेली, भिवंडी, श्रीरामपूर अशा ठिकाणी एसडीओ, तहसीलदार होण्यासाठी अर्थपूर्ण स्पर्धा असते. विखे पाटील साहेब, हे माहिती आहे ना?
जाता जाता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कोणता कानमंत्र दिला आणि अभिनेता शाहरुख खान कोणत्या मोठ्या नेत्याला रात्री उशिरा बंगल्यावर जाऊन भेटला; याची बातमी कुठे दिसली नाही.