वेलकम, राहुल गांधी! ‘सब का साथ, सब का विकास’ संकल्पना केवळ राजकीय लाभासाठी होती

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 05:41 AM2022-11-09T05:41:52+5:302022-11-09T05:42:20+5:30

राजकीय सत्ता, आर्थिक विकासाची घोडदौड, लोककल्याणकारी योजना आदींपासून वंचित राहिलेला मोठा वर्ग आज राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला प्रतिसाद देतो आहे, असे दिसते आहे.

Welcome Rahul Gandhi bharat jodo yatra in maharashtra congress gets great response | वेलकम, राहुल गांधी! ‘सब का साथ, सब का विकास’ संकल्पना केवळ राजकीय लाभासाठी होती

वेलकम, राहुल गांधी! ‘सब का साथ, सब का विकास’ संकल्पना केवळ राजकीय लाभासाठी होती

googlenewsNext

खंडप्राय भारतात उत्तरेच्या दिल्लीच्या तख्तावरून राज्यकर्ते राज्य करायचे. ज्या राज्यकर्त्याकडे  अधिकाधिक भूभाग, तो राजा अधिक प्रभावी मानला जात असे. यासाठी हे राजे मग दिल्लीचे तख्त सोडून दक्षिणेवर स्वारी करायला बाहेर पडत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे दिल्लीचे तख्त मिळविण्यासाठी, दक्षिणेकडून उत्तरेवर स्वार होण्यासाठी पायी निघाले आहेत. गेले साठ दिवस दक्षिणेच्या प्रांतातून भ्रमण करीत सोमवारी त्यांनी महाराष्ट्र - तेलंगणा सीमेवरील नांदेड जिल्ह्यातील देगलूर शहरात प्रवेश केला, तेव्हा महाराष्ट्रातील काँग्रेसप्रेमी कार्यकर्ते आणि जनतेने त्यांचे जोरदार स्वागत करताना ‘वेलकम, राहुल गांधी’ असा नारा दिला.

लोकशाही राज्यव्यवस्थेत अंकित प्रदेशावरून राज्यकर्त्यांचा प्रभाव मोजला जात नाही. लोकमताचा प्रभाव, लोकांचे मत महत्त्वाचे असते. ज्या नेत्याकडे किंबहुना राजकीय पक्षाकडे लोकांच्या मतांचा, बहुमताचा कौल असेल, तो नेता किंवा राजकीय पक्ष जगातील सर्वांत मोठे लोकशाही राष्ट्र चालविण्यास पात्र ठरतो. भारतीय लोकशाही व्यवस्थेत २०१४ मध्ये लोकमताने एक मोठे वळण घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला प्रथमच बहुमत दिले. तेव्हापासून काँग्रेस पक्ष आपल्या राजकीय विचारशक्तीची लढाई लढतो आहे. भाजपने  नव्या राष्ट्रवादाची भूमिका मांडली असली तरी ती सर्वसमावेशक नक्कीच नाही. बहुमताच्या जोरावर बहुसंख्याकवादाला यश आले असले तरी, ‘सब का साथ, सब का विकास’ ही संकल्पना केवळ राजकीय लाभासाठी होती, हे आता स्पष्ट झाले आहे. परिणामी, राजकीय सत्ता, आर्थिक विकासाची घोडदौड, लोककल्याणकारी योजना आदींपासून वंचित राहिलेला मोठा वर्ग आज राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेला प्रतिसाद देतो आहे, असे दिसते आहे.

राहुल गांधी यांच्या यात्रेचे नियोजन करणाऱ्यांनी ही यात्रा केवळ मोठमाेठ्या शहरांतून न जाता ग्रामीण आणि निमशहरी भागांतूनच कशी जाईल, याची दक्षता घेतली आहे. महाराष्ट्रातही मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक किंवा औरंगाबाद, कोल्हापूर वगळूनच ती पुढे मध्य प्रदेशात जाणार आहे. ज्यांचा आवाज आज कोणी ऐकत नाही, अशा उपेक्षित समाजातील माणसांशी संवाद करीत ही यात्रा जाणार आहे. लोकांचा या यात्रेला प्रतिसाद मिळतो आहे. श्रीनगर येथे या यात्रेचा समारोप होईल. तसे पाहिले तर भारतीय राजकारणाच्या इतिहासात अनेक यात्रा- पदयात्रांची नोंद आहे.

स्वातंत्र्योत्तर काळातही माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी यात्रा काढली होती. भाजप आणि हिंदुत्ववादी संघटनांनी रामरथ यात्रा काढली होती. व्यापक भारतीय समाजाच्या सर्व समस्यांना स्पर्श करणारी चंद्रशेखर यांच्या यात्रेनंतरची ‘भारत जोडो’ ही पहिली यात्रा आहे. देशात भाजपची भरभक्कम सत्ता असल्याचा दावा केला जात असताना राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी उचललेले हे पाऊल धाडसाचे आहे. भारताने विविध आघाड्यांवर उत्तम प्रगती केलेली असली तरी नव्या रचनेतून अनेक समस्याही तयार झाल्या आहेत.  विशेषत: शेती, शेतकऱ्यांच्या समस्या आणि ग्रामीण विकासाचे प्रश्न गंभीर होत आहेत. शिक्षण, आरोग्य, हवामान, पर्यावरण आदी प्रश्नांची गुंतागुंत वाढते आहे. त्यात सापडलेल्या बहुसंख्याकांचे राजकारण कोणी करू पाहत नाही. याउलट धार्मिक, जातीय भावनांचा आधार घेणारे राजकारण प्रभावी झाले आहे. त्यास ठाम विरोध करणारी स्पष्ट भूमिका राहुल गांधी मांडताना दिसतात. भारताला अशाच भूमिकेतून स्वत:च्या समस्यांकडे पाहणे गरजेचे आहे. त्यासाठी लढणारा राजकीय विरोधी पक्ष उभा राहिला पाहिजे.

सद्य:स्थितीत राष्ट्रीय पातळीवर सत्तारूढ भाजप आणि विरोधक काँग्रेस या दोनच पर्यायांचा विचार आहे. अनेक प्रादेशिक पक्ष त्या- त्या प्रांतांत प्रभावी असले तरी ते राष्ट्रीय पर्याय ठरत नाहीत. काँग्रेसने जरूर त्यांची मदत घेतली पाहिजे, त्याचवेळी देशव्यापी भारत जोडो यात्रेतून स्वत:ची राजकीय ताकदही उभी केली पाहिजे. राहुल गांधी यांनी याच उद्देशाने आयोजित केलेल्या पदयात्रेतून नवा आशेचा किरण दिसतो आहे. म्हणून तर भाजप आणि त्यांचे समविचारी राजकीय पक्ष त्यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत.  महाराष्ट्रात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी या यात्रेत सहभागाचा निर्णय घेऊन सकारात्मक विरोधी आघाडी भक्कम करण्याच्या बाजूने भूमिका घेतलेली दिसते. अशा पार्श्वभूमीवर या यात्रेचे महाराष्ट्रात पहिले पाऊल पडताच ‘वेलकम, राहुल गांधी!’ ही सामान्य जनतेची घोषणा आश्वासक आहे.

Web Title: Welcome Rahul Gandhi bharat jodo yatra in maharashtra congress gets great response

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.