>> श्रीमंत माने
बहुचर्चित नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जीं विरूद्ध शुभेंदू अधिकारी अशी विधानसभेची लढाई होऊ घातलीय. संपूर्ण देशाचे त्या निकालाकडे असेलच. पण, शुभेंदू अधिकारी म्हणजे प्रस्थापितांना आव्हान देणारे कोणी नवखे नाहीत. नंदीग्राम, तामलूक, कंठी वगैरेचा समावेश असलेल्या पूर्व मिदनापूरमध्ये अधिकारी घराणेच प्रस्थापित आहे. त्यामुळे ममतादीदींसाठी ही लढाई दिसते तितकी सोपी नाही...
तृणमूलच्या सर्वेसर्वा, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काल स्वत:ची उमेदवारी नंदीग्राममधून जाहीर केली. भारतीय जनता पक्षाने अपेक्षेनुसार शनिवारी दीदींचेच आधीचे जवळचे सहकारी, मंत्रिपदाचा राजीनामा देऊन तृणमूलबाहेर पडलेले, भाजपमध्ये प्रवेश केलेले शुभेंदू अधिकारी यांची उमेदवारी जाहीर केली. परिणामी, नंदीग्राम हा कोलकत्याच्या नैऋत्येचा पूर्व मिदनापूर जिल्ह्यातील मतदारसंघ देशभर चर्चेत आला आहे. हुगळी नदी जिथे बंगालच्या उपसागराला मिळते तो हा टापू. १३ वर्षांपूर्वी, २००७ मध्ये उद्योगासाठी भूसंपादनामुळे उफाळलेल्या हिंसाचारामुळे नंदीग्राम देशाला माहिती झाले होते. आधी असे मानले जात होते, की बंडखोरांना अद्दल घडविण्यासाठी ममतादीदी नंदीग्रामच्या रणांगणात उतरतीलच, शिवाय आधीचा कोलकता शहरातला भवानीपूर हा मतदारसंघही हाताशी ठेवतील. दोन्ही जागांवर निवडणूक लढतील. पण, जाणकारांचा हा अंदाज धाडसी दीदींनी खोटा ठरविला. भवानीपूरमधून इतरांना संधी देऊन नंदीग्राम या एकाच मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली. ही थेट, चली तो चांद पे, शैलीची राजकीय भूमिका असल्याने तिची चर्चा होईलच. शिवाय, अनेकांना काळजीही वाटेल. कारण, राज्याच्या मुख्यमंत्रीच आपले प्रतिनिधित्व करणार असल्याच्या भावनेतून त्यांना भरपूर मतदान होईल, हे खरे. भाजपला तिथे गमावण्यासारखे काहीच नाही. शुभेंदू अधिकारी जायंट किलर ठरले तर त्याचे श्रेय नरेंद्र मोदींचा विकास व अमित शहांच्या चाणक्यनीतीला मिळेल. अपयशी झाले तर मात्र तो त्यांचा व्यक्तिगत पराभव असेल.
दोन खासदार, मंत्री, नगराध्यक्षांचे घराणे
नंदीग्रामची लढाई ममतादीदींसाठी अजिबात सोपी नाही. भारतीय जनता पक्ष देशभर घराणेशाहीच्या विरोधात बोलत असतो. पण, नंदीग्रामच्या राजकीय तपशील पाहिले तर पक्षाची उक्ती व कृती यात किती तफावत आहे हे स्पष्ट होईल. नंदीग्रामला रसायन कंपनीला देण्यात आलेल्या जमिनींच्या विरोधात उभ्या राहिलेल्या आंदोलनात, २००७ साली शुभेंदू अधिकारी यांनी तृणमूलच्या फळीचे नेतृत्त्व केले, एवढीच त्यांची सध्या देशाला माहिती असलेली ओळख. प्रत्यक्षात त्या आधीपासून अधिकारी घराणे राजकारणात आहे. नंदीग्राम विधानसभा मतदारसंघाशिवाय तामलूक व कंठी हे दोन लोकसभा मतदारसंघ या घराण्याच्या ताब्यात आहेत. डॉ. मनमोहन सिंग सरकारमध्ये ग्रामविकास खात्याचे राज्यमंत्री राहिलेले कंठी लोकसभा मतदारसंघाचे २००९ पासूनचे तृणमूल काँग्रेसचे खासदार शिशीर कुमार अधिकारी हे शुभेंदू अधिकारी यांचे पिताश्री. शुभेंदू यांचे बंधू व शिशीर अधिकारी यांचे दुसरे चिरंजीव तामलूक लोकसभा मतदारसंघाचे खासदार आहेत तर सौमेंदू हे तिसरे चिरंजीव कंठीचे नगराध्यक्ष आहेत. ८० वर्षांचे शिशीर कुमार अधिकारी १९८२ मध्ये पहिल्यांदा आमदार होण्याआधी तब्बल पंचवीस वर्षे कंठीचे नगराध्यक्ष होते. डाव्या पक्षांचा प्रचंड प्रभाव असल्यामुळे काँग्रेसशी जुळलेल्या अधिकारी घराण्याला नंतरची काही वर्षे त्यांना राजकीय यश मिळाले नाही. परंतु, तृणमूल काँग्रेस प्रबळ बनताच २००६ पासून पुन्हा त्यांचे नशीब फुलले. आमदारकी, खासदारकी, मंत्रिपदांची रास जूण अंगणात लागली.
शुभेंदू अधिकारी यांच्या बंडानंतर खा. शिशीर कुमार चौधरी यांना महत्वाच्या पदावरून तृणमूल काँग्रेसने दूर केले. बंध सौमेंदू यांनाही कंठी नगरपालिकेतील पद सोडावे लागले. त्यामुळेच आता ममता बॅनर्जी यांना नंदीग्रामची लढाई सोपी नसेल, असा इशारा शिशीर कुमार अधिकारी यांनी दिला आहे.
दोन वेळा खासदार, राजीनामा व आमदारकी, मंत्रिपद
वडिलांनंतर, भावाच्या आधी शुभेंदू अधिकारी हेदेखील खासदार होते. २००७ मधील जमिनींसाठी रक्तरंजित संघर्ष, गोळीबारात मरण पावलेले १४ शेतकरी, आक्रमक ममता बॅनर्जीं या बळावर ते २००९ व २०१४ असे दोनवेळा तामलूक मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. २०१६ मध्ये दुसऱ्यांदा तृणमूल काँग्रेसेच सरकार प. बंगालमध्ये सत्तेवर आल्यानंतर शुभेंदू अधिकारी यांनी खासदारकीचा राजीनामा दिला व ते आमदार व सोबतच परिवहन व पर्यावरण खात्याचे मंत्री बनले. बंधू दिव्येंदू पोटनिवडणुकीत त्यांच्या जागी लोकसभेवर निवडून गेले. त्याआधी १९८० पासून हा लोकसभा मतदारसंघ मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा बालेकिल्ला होता.
(लेखक लोकमत नागपूर आवृत्तीचे कार्यकारी संपादक आहेत)