डॉ. शैलेंद्र देवळाणकर जगाला जे जे शी जिनपिंग दाखविण्याचा प्रयत्न करीत होते. त्याहून वास्तव हे विपरीत आहे. एकविसावे शतक हे आशिया खंडाचे असून, या शतकात संपूर्ण वैश्विक राजकारण चीनभोवती केंद्रित असणार आहे. अमेरिका व पश्चिम युरोपियन राष्ट्रे आंतरराष्ट्रीय राजकारणात लयाला जात आहेत, असे म्हणणाऱ्या शी जिनपिंग यांना अलीकडेच तिसऱ्या टर्मसाठी राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडण्यात आले. या निवड समारंभावेळी जिनपिंग यांनी २०५० पर्यंत अमेरिकेला मागे टाकून चीनला पहिल्या क्रमांकाची जागतिक आर्थिक महासत्ता बनविण्याचे उद्दिष्ट मांडले होते. चीनला महासत्ता बनण्यापासून आता कोणीही रोखू शकत नाही, असे एक आभासी चित्र निर्माण करण्यात आले होते. परंतु, या स्वप्नांना गालबोट लागणारी परिस्थिती चीनमध्ये निर्माण झाली आहे.
काय घडतंय नेमकं चीनमध्ये?शहरी भागांमधून सरकारविरोधी निदर्शने करणारे हजारो आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. हे आंदोलन चिनी सरकारने ‘झिरो कोविड पॉलिसी’अंतर्गत जनतेवर लादलेल्या निर्बंधांच्या विरोधासाठी आहे. चीनमध्ये दररोज ४० हजार नवे कोरोनाबाधित आढळून येत आहेत. संपूर्ण जगाने कोरोना महामारीवर मात केल्यासारखी स्थिती असताना या विषाणू संसर्गाचा उगम जेथून झाला तो चीन पुन्हा एकदा कोरोनाच्या मगरमिठीत अडकतो आहे. कोरोनाचा आमच्या औद्योगिक विकासावर कोणताही परिणाम झालेला नाही, असे गुलाबी चित्र जगासमोर मांडणाऱ्या चीनच्या दाव्याला या आंदोलनाने छेद दिला आहे. चीनने या आंदोलकांविरुद्ध दडपशाही सुरू केली असून, त्यामध्ये १० आंदोलकांचा मृत्यू झाला आहे. शांघायमधून सुरू झालेल्या या आंदोलनाचे लोण आता बीजिंगपर्यंत जाऊन पोहोचले आहे. कोरोनाचा उगम ज्या वुहान शहरामध्ये झाला तेथेही आंदोलक रस्त्यावर उतरले आहेत. वरवर हे आंदोलन कोरोनाच्या निर्बंधांविरुद्धचे वाटत असले तरी त्यामागचा मुख्य रोख चीनमधील कम्युनिस्ट पक्षाच्या एकाधिकारशाही राजवटीविरुद्ध आणि शी जिनपिंग यांच्या हुकूमशाहीविरुद्ध आहे. त्यातून जिनपिंग यांच्या साम्राज्याला तडे जाण्याची शक्यता स्पष्टपणे प्रतिबिंबित होते.
१९८९ नंतर पुन्हा असंतोषचीनमध्ये १९८९ नंतर अशा प्रकारची परिस्थिती पहिल्यांदाच पाहावयास मिळत आहे. १९८९ मध्ये चीनमध्ये ऐतिहासिक आंदोलन झाले होते. हे आंदोलन प्रामुख्याने विद्यार्थ्यांचे होते. पण, चिनी सैन्याने बीजिंगमधील तियानानमेन स्क्वेअरच्या चौकात गोळीबार करीत ते पूर्णतः लष्करी बळावर दडपले होते. या दडपशाहीत ३ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले. अभ्यासकांच्या मते, सध्या सुरू असलेल्या आंदोलनाच्या मुळाशी जिनपिंग यांच्या अनियंत्रित हुकूमशाहीविरोधात राग आहे. या आंदोलनामध्ये आणि १९८९ च्या आंदोलनामध्ये गुणात्मक फरक आहे. उत्स्फूर्तपणाने झालेले ते आंदोलन हे बीजिंग शहरापुरते मर्यादित होते आणि मुख्य म्हणजे त्याला कोणाचेही नेतृत्व नव्हते. आताच्या आंदोलनाची व्याप्ती मोठी आहे. १९८९ मध्ये सोशल मीडिया प्रचलित नव्हता. पण, आता सोशल मीडियाच्या माध्यमातून संबंध चीनमध्ये या आंदोलनाचा प्रसार होत आहे.
ही धोक्याची घंटाचीनच्या शिनशियांग प्रांतातील उईघूर मुसलमानांवर गेल्या काही वर्षांपासून चिनी शासनाकडून कमालीची अमानवी दडपशाही सुरू आहे. याविरोधात उठणारे त्याचे सूर दडपले जात आहेत. सध्याच्या आंदोलनादरम्यान, चिनी जनता उईघूर प्रांतातील मुसलमानांच्या सोबत असून, अल्पसंख्याकांविषयी सद्भावना आणि सहानुभूती व्यक्त केली जात आहे. ही बाब चीनसाठी अत्यंत धोक्याची आहे. एकंदरीतच, शी जिनपिंग यांचा पुढील प्रवास हा सुखनैव, अडथळे विरहित असणार नाही, ही बाब या आंदोलनाने पूर्णपणे स्पष्ट केली आहे.
चीनचा दावा फसवाचीनने कोरोनावरील तीन लसी विकसित केल्या होत्या. यापैकी सायनोव्हॅक्स लसीची निर्यातही केली, पण या लसीच्या परिणामकारतेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. कारण ८० ते ९० टक्के लोकसंख्येचे लसीकरण पूर्ण होऊनही तेथे कोरोनाचा प्रसार होत आहे. याचा अर्थ चीनने विकसित केलेल्या लसी बोगस आहेत. फायझरसारख्या कंपन्यांनी विकसित केलेल्या लसींची परिणामकारकता ८० टक्क्यांपर्यंत होती; तर भारताने विकसित केलेल्या कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन लसींची परिणामकारकता ८० ते ८५ टक्के होती. या लसींच्या साहाय्यानेच भारताने कोरोनावर पूर्णतः मात केली.
आंदोलनाचे लोण पसरतेय....आंदोलनाचे लोण तैवान आणि तिबेटमध्ये, हाँगकाँगमध्ये पसरण्याची शक्यता आहे. गेल्या तीन महिन्यांपासून तिबेटची राजधानी ल्हासा येथे चीनने पूर्णपणे लॉकडाऊन घोषित केले आहे. तेथील जनतेतही याबद्दल प्रचंड असंतोष आहे.
असंतोष अमेरिकेच्या पथ्यावर....तैवानच्या मुद्द्यावरून चीन आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष अद्यापही कायम आहे. अमेरिकेने तैवान आणि हाँगकाँगला उघड समर्थन दिलेले आहे. त्यामुळे आताच्या आंदोलनाची संधी अमेरिका दवडणार नाही.
भारताने दिली चपराक‘ग्लोबल टाइम्स’ या चीनच्या सरकारी माध्यमाने भारतात शेकडो लोकांचा कोविडवरील उपचार न मिळाल्यामुळे बळी जात असल्याचा अपप्रचार केला होता, पण कोरोनावर मात करून भारताने संपूर्ण जगापुढेच एक आदर्श घालून दिला. भारतीय लसींची परिणामकारकताही स्पष्ट झाली आहे.
(लेखक परराष्ट्र धोरण विश्लेषक आहेत)
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"