शहरं
Join us  
Trending Stories
1
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
2
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
3
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
4
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
5
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
6
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
7
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
8
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
9
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
10
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
11
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
12
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
13
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
14
‘कोस्टल’वरून ४० लाख वाहनांची वर्दळ; वाहतूक नियोजनाला आणखी गती मिळाली
15
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल
16
आकाश कोसळले तरी चालेल, न्याय दिला गेलाच पाहिजे!
17
एकत्र लढतील, दिसतील; पण एकत्र राहतील?
18
निवडणुका अनेक, देश एक!
19
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
20
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय

सुल्ली डील्स आणि बुलीबाई ॲपमागे कसले षडयंत्र आहे?

By shrimant maney | Published: January 05, 2022 7:31 AM

अल्पसंख्याक समाजातील महिलांना लक्ष्य बनविणारे शेवटी कोण असणार? धार्मिक सौहार्द बिघडवून दंगली पेटविण्यासाठीच हे विष ओतले जात आहे.

- श्रीमंत माने,  कार्यकारी संपादक, लोकमत, नागपूरदेशवासीयांच्या नव्या वर्षाची सुरुवात मोबाईल ॲपवर मुस्लिम समाजातल्या सामाजिक कार्यकर्त्या, पत्रकार अशा स्पष्टवक्त्या, अन्याय-अत्याचार व चुकीच्या गोष्टींविरोधात आवाज उठविणाऱ्या महिलांच्या सामूहिक चारित्र्यहननाच्या किळसवाण्या प्रकाराने झाली. या महिलांचे सोशल मीडियावरचे फोटो उचलून ते ॲपवर टाकायचे अन् त्यांचा लिलाव मांडायचा, सौदा करण्यासाठी आवाहन करायचे, असा हा विकृत प्रकार. जवळपास नव्वद महिलांच्या छायाचित्रांचा असा घृणास्पद वापर झाला. शिवसेनेच्या राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी, तसेच इतरांनी केंद्रीय माहिती तंत्रज्ञानमंत्री अश्विनी वैष्णव तसेच पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर चक्रे फिरू लागली. हैदराबादच्या ६७ वर्षीय ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या खलिदा परवीन यांनी हरिद्वार येथे धर्मसंसद भरवून मुस्लिमांच्या कतलीचे आवाहन करणाऱ्या यती नरसिंहानंद सरस्वतींवर अलीकडेच जाहीर टीका केली होती. लगेच त्यांचे छायाचित्र मोबाईल ॲप्लिकेशनवर आले. तेव्हा त्यांनी पोलिसात तक्रार केली. हे दुसऱ्यांदा घडते आहे. गेल्या जुलै महिन्यात सुल्ली डील्स नावाच्या ॲपच्या माध्यमातून असेच घडले होते. त्याची दिल्लीत पोलिसांकडे तसेच महिला आयोगाकडे तक्रार झाली. पण, काहीही कारवाई झाली नाही. आता बुलीबाई ॲपबद्दल मुंबई पोलिसांचा सायबर क्राईम सेल प्रकरणाच्या मुळाशी जात असल्याचे पाहून महिला आयोगाने दिल्ली पोलिसांना समन्स बजावून अब्रू झाकण्याचा प्रयत्न चालविला आहे.

इंटरनेट होस्टिंग व सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटमधील गिटहब नावाच्या ओपन सोर्स प्लॅटफॉर्मचा वापर करून हे बुलीबाई ॲप तयार केले गेले आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर मुंबई पोलिसांनी सोमवारी बंगळुरूमधून एका अभियंत्याला, त्यानंतर उत्तराखंडमधून एका महिलेला अटक केली आहे. खरे तर ज्या पद्धतीने अल्पसंख्याक समाजातील महिलांना लक्ष्य बनविण्यात आले, ते पाहता, ते कोण असतील यासाठी फार डोके चालविण्याची गरज नव्हती. देशातील धार्मिक सौहार्द बिघडविण्यासाठी, धर्मा-धर्मांत भांडणे लावण्यासाठी, दंगली पेटविण्यासाठी जे विषारी वातावरण तयार केले जात आहे, त्याचाच हा परिणाम आहे. अन्यथा, उज्ज्वल करिअरची स्वप्ने बाळगणाऱ्या एखाद्या एकवीस वर्षांच्या तरुण अभियंत्याच्या मनात इतका द्वेष कसा काय असू शकतो किंवा एक महिला इतर धर्मातील महिलांबद्दल इतका विकृत विचार कसा काय करू शकते? हा सगळा अवतीभोवतीच्या प्रचंड विखारी वातावरणाचा परिणाम आहे. असा विखार, द्वेष महिलांना लक्ष्य बनवितो. यादवी व दंगलीत पहिले बळी महिला, मुले, वृद्ध अशा दुबळ्यांचेच जातात. दंगली पेटविणाऱ्यांच्या केसाला धक्का लागत नाही. 

या ॲप प्रकरणात तर महिलांचा असा चव्हाट्यावर बाजार मांडण्याच्या पलीकडे एखाद्या षडयंत्राचा वास येतो आहे. अगदी उघडपणे शीख व मुस्लिम समुदायांमध्ये वितुष्ट तयार करण्याचे, दंगली भडकविण्याचे प्रयत्न यात दिसतात. त्या ॲपचा बायोच बुलीबाई खालसा शीख फोर्स या नावाने होता, तर मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीने तीन दिवसांपूर्वी खालसा व्होटर असे खोटे नाव लावून घेतले होते. कृषी कायद्यांच्या मुद्द्यावर केंद्र सरकारला माघार घ्यावी लागली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागून कायदे मागे घेत असल्याचे जाहीर केले. पंजाब विधानसभेची निवडणूक तोंडावर आहे. वर्षभर चाललेल्या शेतकरी आंदोलनात शीख समुदायाने त्याचे अस्तित्वच पणाला लावले होते. याचवेळी गुरू तेगबहादूर यांच्यापासून अनेक शीख गुरूंनी औरंगजेब व मुघलांशी कशी युद्धे लढली, याची आठवण सत्ताधाऱ्यांकडून उत्तर प्रदेश व इतर ठिकाणच्या प्रचारात वारंवार करून दिली जात आहे. या पृष्ठभूमीवर शीख विरुद्ध मुस्लिम असा वाद पेटविण्याचा प्रयत्न या बुलीबाई ॲपच्या माध्यमातून केला जात होता का, हे तपासण्याची गरज आहे. तसे असेल तर हा वर वर दिसतो तसा केवळ महिलांच्या अपमानाचा मुद्दा राहात नाही. तेव्हा, मुंबई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास चारदोघांच्या अटकेपुरता मर्यादित न ठेवता देशाची एकता व अखंडतेला नख लावणाऱ्या संभाव्य षडयंत्राच्या मुळाशी जाण्याची गरज आहे.