- सविता देव हरकरेसर्वोच्च राष्ट्रभक्ती कुठली? राष्ट्रभक्त कुणाला म्हणायचे? देशभक्तीची नेमकी परिमाणे काय? हे अलीकडच्या काळात भारतवंशात चर्चिले जाणारे सर्वाधिक महत्त्वाचे विषय. देशभक्तीच्या या मोजमापांमध्ये आम्ही एवढं रमलोय की देशातील इतर कळीच्या मुद्यांची उकल करण्याची सवडच नाही. मग तो वाढत्या बेरोजगारीचा प्रश्न असो वा आरोग्याचा. श्रीमंत-गरिबातील वाढत्या दरीचा अथवा भ्रष्टाचाराचा. आज भ्रष्टाचाराच्या वाळवीने सारा देश पोखरला जातोय, नाही पोखरला गेलाय पण त्याचे कुणाला काय? या भ्रष्टाचाराने सर्वसामान्यांना तर आपल्या मगरमीठीत एवढे घट्ट सामावून घेतलेय की त्यातून कधी सुटका होईल की नाही याबाबत साशंकता वाटावी. भारताने भ्रष्टाचारात आशियातील देशांनाही मागे टाकले असल्याचे वृत्त त्याचीच साक्ष देते. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल या संस्थेने केलेल्या अहवालाच्या आधारे जो निष्कर्ष काढण्यात आला आहे त्यानुसार आपल्या देशात भ्रष्टाचाराचे प्रमाण ६९ टक्के आहे. शाळा प्रवेश, रुग्णालये, ओळखपत्रे, पोलीस आणि इतर सुविधांसाठी सरेआम लाच घेतली जाते. आरोग्यसेवा हीच ईश्वरसेवा मानणाऱ्या या देशात आरोग्य सेवेतही एवढ्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार फोफावतो यातून काय समजायचे.भारतवंशात भ्रष्टाचाराचा इतिहास तसा जुनाच. फूट पाडा अन शासन करा हे धोरण गुलामगिरीच्या काळात इंग्रजांनी या देशात राबविले होते. त्या काळात बड्याबड्या राजेमहाराजांनीही सत्ता व संपत्तीच्या मोहापायी इंग्रजांना साथ देत भ्रष्टाचाराला खतपाणी घातले. हळूहळू भ्रष्टाचाराच्या या वृक्षाने एवढे अक्राळविक्राळ रूप धारण केले की त्यातून स्वत:ची सुटका करून घेणे येथील नागरिकांना अशक्य वाटू लागले. कालांतराने तो एक संस्कारच झाला. परंतु केंद्रात मोदी सरकार विराजमान झाले तेव्हा मात्र भ्रष्टाचाराने त्रस्त झालेल्या देशवासीयांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. त्याचे कारण असे की या सरकारने सत्तेत येताच लोकांना भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न दाखविले होते. त्यासाठी मग काही धाडसी निर्णयही घेतले. भ्रष्टाचारातून मुक्ती मिळेल म्हणून लोकांनीही प्रचंड त्रास सहन करून त्यांना साथ दिली. पण पदरी काय पडले? पुन्हा तोच भ्रष्टाचार! ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ ही मोदीगर्जनाही हवेतच विरली. लोकपालचे काय झाले ते कळलेच नाही. अर्थात भ्रष्टाचार निर्मूलन हे काही केवळ कायद्याने शक्य नाही. केवळ पैशानं सुख विकत घेता येतं असं मानणारे आणि त्याच्या लोभापायी भ्रष्टाचाराच्या चक्रव्यूहात अडकणाऱ्या व अडकविणाऱ्या लोकांनाही आपली मानसिकता बदलवावी लागणार आहे.
भ्रष्टाचाराच्या वाढत्या संक्रमणात देश कुठाय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 3:30 PM