कपल चॅलेंज (#couple challenge) सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल आहे. हे चॅलेंज म्हणजे एक नवा ट्रेण्ड असला, तरुणाईला त्याची गंमत वाटत असली तरी, ते धोक्याचेही ठरू शकते. देशभरातील सायबर एक्सपटर््स आणि पोलिसांनी याबाबत सावधगिरीच्या सूचना दिल्या आहेत.काय आहे हे चॅलेंज?
#couple challenge हा हॅशटॅग वापरून फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटरसह सगळ्याच सोशल साइट्सवर सध्या जोडपे आपले फोटो, व्हिडिओ पोस्ट करू लागले आहेत. एकट्या इन्स्टाग्रामवर या हॅशटॅगद्वारे ४० हजारांहून अधिक व्हिडिओ पोस्ट करण्यात आले आहेत. काहींनी सेलिब्रिटींसोबत फोटो तयार करूनही टाकले आहेत तर काहींनी यावर मीम्स तयार केले आहेत.
या चॅलेंजचा धोका काय?कोणत्याही गोष्टीत गुन्हेगारी प्रवृत्ती शिरण्यास फारसा वेळ लागत नाही. तसेच या चॅलेंजचेही आहे. लोक गंमत म्हणून आपल्या जोडीदाराबरोबरचे फोटो पोस्ट करत आहेत. मात्र पोलिसांना यासंबंधी काही तक्रारीही मिळाल्या आहेत. यात सायबर गुन्हेगारही शिरले आहेत. अनेकजण एखाद्या फोटोला दुसऱ्याचा फोटो जोडून, आक्षेपार्ह गोष्टींसाठी याचा वापर करू लागल्याने आता नवीनच ताप झालाय. पुणे पोलिसांनीही थेट ट्विट करून यासंबंधी सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत. आपल्या पार्टनरसोबत फोटो पोस्ट करण्यापूर्वी विचार करा, असा सावधानतेचा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. काहींचे फोटो तर अश्लील वेबसाइट्सवरही दिसू लागल्याने उत्तर प्रदेश पोलिसांनी याबाबत तरुणाईला सजग करणेही सुरू केले आहे.