सर्च संस्थेचे संस्थापक डॉ. अभय व डॉ. राणी बंग आणि एमकेसीएलचे विवेक सावंत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या 'निर्माण' उपक्रमात गडचिरोलीला होणारी युवांची शैक्षणिक शिबिरे आणि त्यानंतरचा सातत्याने होणारा पाठपुरावा, हा एक अतिशय सघन उपक्रम आहे. वेळेच्या आणि संसाधनांच्या मर्यादा लक्षात घेऊन 'निर्माण' दरवर्षी एक निवडप्रक्रिया राबवते आणि भारतभरातून साधारण दीडशे युवांना निर्माण उपक्रमात काम करण्यासाठी निवडले जाते.
जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत होणारी ही निवडप्रक्रिया तीन टप्यांमध्ये असते. पहिल्या टप्यात अर्ज करताना विचारले जाणारे प्रश्न हे युवांना स्वतःच्या जीवनाबद्दल अंतर्मुख व्हायला तसेच बाह्य सामाजिक परिस्थितीविषयी विचार करायला भाग पाडणारे असतात. हे प्रश्न दरवर्षी काही प्रमाणात बदलत असतात. त्यामुळे त्यातली उत्सुकता व नावीन्य टिकून राहते.
यावर्षी त्यात विचारलेला एक प्रश्न असा होता 'भारतात समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता असावी का? तुमचे मत थोडक्यात स्पष्ट करा.' त्या प्रश्नाच्या उत्तरातून आम्हाला जे सापडले ते इथे शेअर करत आहोत. काय म्हणतात युवा?१८ ते २९ वयोगटातील एकूण ५२८ युवांनी या प्रश्नाला उत्तर दिले. त्यात ४४% पुरुष, ५५% स्त्रिया होत्या आणि एकजण 'इतर' या वर्गात मोडत होता. शैक्षणिकदृष्ट्या बघितले असता, ४८% जण हे वैद्यकीय पार्श्वभूमीचे, तर ५२% है अवैद्यकीय पार्श्वभूमीचे (उदा. आर्ट्स, कॉमर्स, सायन्स, इंजिनिअरिंग, इ.) होते.
या उत्तराचे विश्लेषण केले असता, आम्हाला असे आढळले की, ७५.७% युवांनी भारतात समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता असावी याला "हो" असे उत्तर दिले होते. केवळ ७.४% युवांनी "नाही" असे उत्तर दिले होते, तर १६.९% युवांनी त्यांच्या उत्तरांत नेमकी कुठलीही एक भूमिका स्पष्ट केली नव्हती.
एवढ्या मोठ्या प्रमाणात युवा समलैंगिक विवाहाबद्दल खुलेपणे विचार करतात, हा आमच्यासाठी सुखद आश्चर्याचा अनुभव होता. जेव्हा आम्ही या प्रतिसादाचे खोलवर गुणात्मक विश्लेषण केले तेव्हा समलिंगी विवाहाच्या समर्थनार्थ खालील प्रमुख कारणे मांडलेली दिसली.
१. नातेसंबंध आणि लग्नामध्ये निवडीचे स्वातंत्र्य, २. विवाहाचा अधिकार, ३. जोडप्यांना आणि अनाथ वा सोडलेल्या मुलांसाठी कुटुंब, ४. मालमत्तेच्या वारसा हक्कामध्ये सुलभता, ५. संधीची आणि मानवी हक्कांची समानता, ६. ही एक वैज्ञानिक स्पष्टीकरणासह समजता येणारी नैसर्गिक घटना आहे, ७. समलिंगी जोडप्यांचे भावनिक आरोग्य जपता येणे, ८. सामाजिक स्वीकृती आणि संरक्षण, स्टिग्मा आणि भेदभाव कमी करणे, ९. तो/ती स्वत: LGBTQ समुदायाशी संबंधित आहे किंवा त्याचा/तिचा LGBTQ समुदायातील कोणी मित्र आहे, १०. इतर देशांनी हे मान्य केले आहे, त्यामुळे भारतानेही त्याचे पालन केले पाहिजे.
विशेष म्हणजे प्यू रिसर्च सेंटरने, ऑक्टोबर २०२२ मध्ये अमेरिकेतील प्रौढांसाठी केलेल्या सर्वेक्षणातदेखील असे आढळून आले होते की, १८-२९ वर्षे वयोगटातील ७५% नागरिकांना समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्यात यावी असे वाटते. म्हणजे या विषयाबाबतीत संशोधन भारतीय आणि अमेरिकन तरुणांमध्ये एकसमान वेव्हलेंग्थ आहे तर! ग्लोबल जगामध्ये अजून काय अपेक्षित असेल? १८ ते २९ वयोगटातील तरुण है भारतीय लोकसंख्येच्या २२% आहेत. 'निर्माण'ने केलेला हा अभ्यास सर्वव्यापी नसला तरी भारतातील सुशिक्षित व विचारी तरुणांच्या एका गटाच्या मनात समलिंगी विवाहाबाबत काय समज आहे, याची झलक तो नक्कीच दाखवतो. प्रतिसाद देणाऱ्या ७५.७% तरुणांनी समलिंगी विवाहांना समर्थन दिले आणि ते कायदेशीर होण्याच्या बाजूने होते. बदलत्या भारताचा हा युवा आवाज राजकारणी ऐकत आहेत का? समलिंगी विवाहांबाबत कायदा बनवताना ते तो विचारात घेतील का?
अमृत बंग ('निर्माण' युवा उपक्रमाचे प्रमुख आणि 'सर्च' या सामाजिक संस्थेचे सहसंचालक) सहाय्य आदिती amrutabang@gmail.com
संशोधन सहाय्य- आदिती पिदुरकर व साईराम गजेले (निर्माण, सर्च, गडचिरोली)