-हेरंब कुलकर्णी, शैक्षणिक क्षेत्रातले कार्यकर्तेअमळनेर येथील साहित्य संमेलनाला गर्दी झाली नाही आणि पुस्तक विक्री खूप कमी झाली. १९९६ साली अहमदनगर येथे झालेल्या साहित्य संमेलनात एक कोटी रुपयांची पुस्तके विकली गेली होती. आजच्या हिशोबाने ती रक्कम किमान ५ कोटी होईल. ३० वर्षांपूर्वीचा तो महाराष्ट्र आणि आजचा महाराष्ट्र यातील पडलेले अंतर यानिमित्ताने विचारात घ्यायला हवे. वेगाने होणाऱ्या या बदलाचा अर्थ कसा लावायचा? साहित्य संमेलने, ग्रंथ व्यवहार, साहित्यिक कार्यक्रम याला प्रतिसाद कमी होतो आहे, याचे विश्लेषण कसे करायचे?
साहित्य व्यवहाराला कमी प्रतिसाद मिळण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण वाचन कमी झाले आहे. पूर्वी साहित्य संमेलन अलोट गर्दीची होती, ग्रंथ प्रदर्शने बहरत होती, साहित्यिक कार्यक्रम, व्याख्यानमाला खूप गाजत याचे कारण समाजात वाचणारा वर्ग मोठ्या संख्येने होता. त्यांना लेखकांबद्दल उत्सुकता असे. लोक लेखक कवींना पत्र लिहीत. आलेली उत्तरे ठेवा म्हणून संग्रही ठेवत. आज वाचनाचे प्रमाण कमी झाल्याने या सर्व व्यवहारांना ओहोटी लागली आहे. हेही खरे, की ध्येयवादाने जगण्याची, आपले जीवन बदलण्याची-समाजाभिमुख करण्याची ऊर्मी मंदावली आहे. पैसा हातात आला तरी आनंदी जगण्याच्या कल्पनेत वाचन फारसे नाही. मोबाइलने तरुणांचे सोडाच; अगदी जाणत्या ज्येष्ठांचेही वाचन कमी केले आहे. २४ तासांच्या वृत्तवाहिन्या, मनोरंजन वाहिन्या आणि आतातर ओटीटीवरल्या अव्याहत मनोरंजन-उपलब्धतेने रिकामा वेळ व्यापला आहे. विचार विश्वाचा वाहक असलेल्या शिक्षक प्राध्यापक वर्गातही अपवाद वगळता सखोल वाचनाचा एकूण आनंदच दिसतो. त्यावाचून नोकरीत काही अडत नाही. शाळा, कॉलेज आणि सार्वजनिक ग्रंथालयात शिक्षक-प्राध्यापकांची पुस्तक देवघेव जरूर बघावी. गावात शहरात जी व्याख्याने होतात त्यात या वर्गाचा नियोजनात सहभाग सोडाच; श्रोता म्हणूनही सहभाग नगण्य असतो. या अशा शिक्षक-प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी कशी लावावी?
समाजातील शिकलेला वर्ग ललित साहित्य-वैचारिक पुस्तके फार वाचत नाही. काही पुस्तकांच्या आवृत्त्या खूप निघतात तरी ते प्रातिनिधिक चित्र नाही. एकूण ग्रंथ विक्री सुशिक्षित महाराष्ट्राच्या लोकसंख्येच्या तुलनेत तपासून पाहिली, तर ते गुणोत्तर निराशाजनकच दिसते. बदलत्या वाचकाच्या बदलत्या गरजा, अपेक्षा आणि त्यांना पुरे न पडणारे लेखक-प्रकाशक हाही एक महत्त्वाचा मुद्दा ! त्याहीबद्दल चर्चा आणि उपाययोजना व्हायला हवी.
साहित्य संमेलने, ग्रंथ प्रदर्शने याला गती मिळायची असेल तर वाचन संस्कृतीवर काम करायला हवे. न जमणारी गर्दी हे वाचनाविषयी अनास्था असलेल्या मोठ्या हिमनगाचे केवळ एक टोक आहे. तरुण मुलांमधला एक गट हल्ली वाचनाकडे वळताना दिसतो, हे आशादायक चित्रही येथे नोंदवायला हवे. ही मुले मुद्रित पुस्तकांबरोबरच ई-बुक ऑडिओ बुक वाचतात आणि त्यांच्या साहित्यिक/वैचारिक चर्चांचे कट्टे साहित्य संमेलनात नव्हे, तर सोशल मीडियावर फुलतात हेही खरे. हे असे नवे पर्याय तयार होताना दिसतात जरूर; पण त्याचे सार्वत्रिकीकरण अजून होत नाही.
प्रयत्न केले तर वाचनाची सवय रुजवता येऊ शकते. मी नगरला सीताराम सारडा विद्यालयात मुख्याध्यापक आहे. शिक्षकांनी रोज वाचन करावे व सकाळी शाळेत आल्यावर सही करताना किती पाने वाचली हे मला सांगावे, असे ठरवले. सुरुवातीला गोडी लागेपर्यंत वेळ लागला; पण गेल्या सहा महिन्यात प्रत्येक शिक्षकाची किमान पंधरा पुस्तके वाचून झाली आहेत. शाळेत पुस्तक भिशी सुरू केली आहे. त्या भिशीत दर महिन्याला ३ शिक्षक ३५०० रुपयांची पुस्तके खरेदी करतात. समाजात वाचन संस्कृती वाढली तर आणि तरच साहित्य व्यवहार बहरेल. साहित्य संमेलनाची गर्दी वाढेल, पुस्तक विक्री वाढेल... अन्यथा मनोरंजनाच्या स्वस्त लाटांचे पाणी पार नाकातोंडात जाईल आणि साहित्य संमेलनेसुद्धा काही वर्षांनी छोट्या सभागृहांमध्ये घ्यावी लागतील.