- किरण अग्रवाल
निवडणुकीचा जाहीर प्रचार संपायला अवघे चार दिवस शिल्लक आहेत, त्यामुळे प्रचाराचा जोर वाढला आहे खरा; पण मतदारांची त्या प्रचारातील सहभागीता यंदा घटलेली दिसत आहे. राजकीय आरोप-प्रत्यारोपांखेरीज विकासाच्या मुद्द्यावर फारसे बोलले जात नसल्याने असे झाले असावे.
पश्चिम वऱ्हाडातील लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकीकरिता सुरू असलेला प्रचार उत्तरार्धात आला असला तरी, मतदारांच्या कलाचा अंदाज बांधता येऊ नये अशी स्थिती आहे. प्रचाराच्या व त्यातीलही आरोप-प्रत्यारोपांच्या कलकलाटात मतदारांनी बाळगलेले मौन किंवा शांतता खूप काही सांगून जाणारे आहे. वारेच वाहत नसतील तर त्यांची दिशा कशी सांगता यावी, हा यातील खरा प्रश्न आहे.
अकोला, बुलढाणा व यवतमाळ-वाशिम या लोकसभा मतदारसंघांसाठी निवडणुकीच्या दुसऱ्या चरणात, म्हणजे २६ एप्रिल रोजी मतदान होणार असून, त्यासाठीचा जाहीर प्रचार संपायला आता अवघे चारच दिवस उरले आहेत. उत्तरार्धात प्रचार पोहोचल्याने राजकीय परिघातील वातावरण भलेही तापलेले दिसत आहे; पण मतदारांमध्ये मात्र शांतताच आहे. अर्थात, उमेदवारी अर्ज दाखल करताना घडविल्या गेलेल्या शक्तिप्रदर्शनाखेरीज व उमेदवार गावात आल्यावर त्यासोबत काढल्या जाणाऱ्या पदयात्रांखेरीज प्रचारात मतदारांचा म्हणून सहभाग अपवादानेच दिसून आला. एकतर तुरळक चौक सभावगळता स्टार प्रचारकांच्या मोठ्या जाहीर सभा यंदा अद्यापही न झाल्यानेही असे झाले असावे, आणि दुसरे म्हणजे; केवळ सोशल मीडियाच्या भरोशावर प्रचाराची यंत्रणा उभारली गेल्याने त्याला कंटाळलेल्या मतदारांनी अधिकतर उमेदवारांचे व राजकीय पक्षांचे ग्रुप थेट ‘ब्लॉक’च करून ठेवल्यानेही ते झाले असावे. त्यामुळे मतदारांची जी मानसिकता व उत्स्फूर्तता तयार व्हायला हवी होती, ती अद्यापही झाली नसल्याचे म्हणता यावे.
बरे, जो काही प्रचार होतो आहे त्यातही काय दिसून येते आहे, तर आरोप-प्रत्यारोपांचीच राळ उडते आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे ओढवलेले बळीराजाचे दुष्टचक्र थांबताना दिसत नाही, त्यामुळे त्यांच्या आत्महत्याही थांबलेल्या नाहीत. गेल्या तीन-चार दशकांपासून परिसरात शे-पाचशे तरुणांच्या हाताला काम देऊ शकणारा एकही मोठा उद्योग आलेला नाही. एखादा मोठा प्रकल्प मंजूर करवून घेतला गेला आणि त्यामुळे मतदारसंघाचे किंवा परिसराचे भाग्य बदलले असेही काही कुठे झालेले आढळत नाही. चला मोठ्या स्वप्नांचे जाऊ द्या, साधे रस्ता, वीज, पाण्याचे काय? आरोग्याची अवस्था तर अशी ‘सलाइन’वर आहे की, गेल्या कोरोनाच्या संकटात प्रत्येकच कुटुंबाला कुणी ना कुणी आप्तेष्ट गमावण्याची वेळ आली. अनेक घरातील कर्ते पुरुष निघून गेल्याने जगण्याचाच झगडा नशिबी आलेले लोक अजूनही त्या धक्क्यातून सावरू शकलेले नाहीत. पण अशा मुद्द्यांवर निवडणुकीत कुणीच काही बोलताना दिसत नाही. संकल्पांचे व वचनांचे जाहीरनामे हाती टेकवून हात जोडले जात आहेत केवळ. त्यामुळे उमेदवारांची वाजंत्री वाजत असली तरी मतदारांचे मौन दिसते आहे.
अर्थात, मतदार शांत आहे याचा अर्थ त्याला काही कळत नाहीये असे अजिबात नाही. त्याची धारणा आणि त्यातूनच त्याचे मतही नक्की झाले आहे. प्रश्न आहे तो काठावर असलेल्या मतदारांचा. त्यांच्या मनाची मशागत करून मताचे पीक काढायला मुद्द्याचे बोलले जात नाहीये व जाहीर प्रचार सभांचा धडाका अद्याप उडू शकलेला नाहीये. निश्चित वा ‘गॅरंटी’खेरीजच्या मतांची बेगमी करायची व मताधिक्य मिळवायचे तर त्यासाठी जाहीर गलबला व्हायला हवा. तो आता उरलेल्या चार दिवसात कसा होतो? कुणाच्या जाहीर सभा होतात आणि त्या परिणामकारक ठरतात हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
अकोल्यात गेल्यावेळी मतविभाजन न होता संजय धोत्रे यांना विजय लाभला होता, तर बुलढाण्यात मतविभाजनामुळेच प्रतापराव जाधव यशस्वी ठरले होते. यंदा दोन्ही ठिकाणी मोठे आव्हान व चुरस आहे. अकोल्यात भाजपचे अनुप धोत्रे व वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्यात काँग्रेसच्या अभय पाटील यांनी ‘खेला’ करून ठेवला आहे. बुलढाण्यात उद्धवसेनेचे नरेंद्र खेडेकर व शिंदेसेनेचे प्रतापराव जाधव या दोन सैनिकांमध्ये अपक्ष रविकांत तुपकर यांनी रंगत भरून दिली आहे. वाशिममध्ये मात्र उद्धवसेनेचे संजय देशमुख व शिंदेसेनेच्या राजश्री पाटील यांच्यात थेट सामना होताना दिसत आहे.
सारांशात, लोकसभा निवडणुकीचा प्रचार पोहोचला असला तरी अद्याप जाहीर सभांचा धडाका सुरू झालेला नसल्याने मतदारांच्या स्तरावर शांतताच आहे. ही शांतताच खूप काही सांगून जाणारी असून, निकालातूनच जनतेचा आवाज ऐकायला मिळेल असे म्हणूया. अर्थात त्या आवाजात आपलाही आवाज मिसळण्याकरिता मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सज्ज होऊया...