- विनायक पात्रुडकर (कार्यकारी संपादक)साऱ्या महाराष्ट्राला निवडणूक निकालानंतर एकच प्रश्न पडलाय. नवा मुख्यमंत्री कोण? मराठी जनतेने त्याचा कौल देऊन जबाबदारी पार पाडली आहे. निकालानंतरचा कौल स्वीकारून जबाबदारी घेण्यास राजकीय पक्ष मात्र तयार नाहीत. निवडणूकपूर्व युती करून भाजप-शिवसेना पक्षाने ‘आमचं ठरलंय’, अशी गर्जनाच केली होती. युतीला मिळालेल्या कौलाबद्दल बरेच काही लिहूनही झाले आहे. बहुतांश मराठी मतदारांनी या निकालाबद्दल समाधानही व्यक्त केले. विरोधकांना संपविण्याची भाषा मराठी जनांना पसंत पडली नाही. त्यामुळे युतीच्या बाजूने मर्यादित कौल देत सत्तेत राहा; पण मस्तीत नको, असा संदेशही दिला. सत्तेचा दर्प अहंकार कमी करून जबाबदारीने महाराष्ट्र पुढे नेण्याचा सन्मार्गी संदेशही या निकालातून स्पष्ट दिसतो. इतका स्पष्ट संदेश देऊनही विशेषत: भाजप-शिवसेना या पक्षनेत्यांनी जो तमाशा आणि पोरखेळ सुुरू ठेवलाय त्यामुळे महाराष्ट्राची राजकीय प्रतिमा नक्कीच ढासळली गेली आहे.निकाल लागून तब्बल दहा दिवस झाले; पण सरकार स्थापन होण्याचे चिन्ह दिसत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निकाल स्वीकारत आपण प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका बजावू, असे जाहीर केले. काँग्रेसने नेहमीप्रमाणे दिल्ली दरबारी निष्ठा ठेवत, भूमिका अधांतरी ठेवली. अर्थात अपेक्षेपेक्षा यश अधिक मिळाल्याने काँग्रेसनेते प्रचंड समाधानी आहेत. प्रश्न आहे तो शिवसेनेचा. कधी आक्रमक तर कधी नरमाईची भूमिका घेत शिवसेनेकडून ताणाताणी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात नेमके काय गुप्तगू झाले होते, याचे कोडे साºया महाराष्ट्राला पडले आहे. कोणती मंत्रिपदे सेनेला हवी होती, उपमुख्यमंत्री पदाबाबत नेमके काय ठरले होते. कोणती मंत्रिपदे भाजप सोडायला तयार नाही. नेमक्या कोणत्या खात्यावर दोघांचाही डोळा आहे. अशी प्रश्नांची सरबत्ती गप्पांच्या फडात रंग भरत आहे. सत्तेचे हे समीकरण नेमके कोणाच्या अहंकारात अडकले आहे.महाराष्ट्राच्या प्रतिमेपेक्षा यांचा अहंकार जास्त आहे का? मराठी माणसांना मतदान करण्यात फारसा ‘इंटरेस्ट’ नसतो; पण सत्तेचे गणित फारसे जुळत नसेल तेव्हा त्यांच्यातील ‘इंटरेस्ट’ जागा होतो. एरवी मतदानाच्या दिवशी सुट्टीचे नियोजन करणारा मराठी माणूस राजकारणाच्या किस्स्यांमध्ये मात्र पुरता रमून जातो. ओल्या दिवाळीच्या आनंदानंतर सत्तेचा सारीपाटावर जे फटाकडे फटत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय दिवाळी सुरूच असल्याचे चित्र देशभर पसरले आहे. याला अटकाव कोण आणि कधी घालणार? हाही प्रश्नच आहे; पण यानिमित्ताने भाजप-सेनेचे नेते अडेलतट्टू आहेत, असे चित्र निर्माण झाले. युती आणि आघाडीला जो कौल मिळाला आहे, तो सर्वश्रूत आहे. सरकार स्थापन करून तुमची अंतर्गत भांडणे सोडवत बसा, असाही सूर उमटतो आहेच; परंतु सरकार स्थापन करण्यापेक्षा या पक्षनेत्यांना मानपानातच जास्त रस असल्याचे दिसते.नक्की यांना महाराष्ट्राचा विकास करायचा आहे की, पक्षाची पुढची सोय करायची आहे? असाही नैतिक मुद्दा चर्चिला जातो आहे. त्यामुळे सेना-भाजप नेत्यांनी आता स्वत: पुढे येऊन त्यांच्यात नेमके काय ठरले होते, हे जाहीरपणे सांगायला हवे. तरच या राजकीय नेत्यांवर भरवसा ठेवता येईल. सत्तेसाठी जो उंदरा-मांजराचा खेळ सुरू आहे त्याचाही उबग आला आहे. स्वत:ला वाघ-सिंह म्हणून घेणाºया या पक्षनेत्यांनी निधड्या छातीने सामोरे यावे आणि सत्तावाट्याचा हिशोब सांगावा, तरच महाराष्ट्रात सध्या सुरू असलेल्या अटकळींना अटकाव बसेल, त्यातच साऱ्यांचे सौख्य आहे.
शिवसेना-भाजपा महायुतीचं नक्की काय ठरलंय?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2019 8:10 PM