प्रमोद मुनघाटे
डायनीयल एब्राम हा अमेरिकन गणितज्ञ म्हणतो, एखाद्या भाषिक समूहातील व्यक्तीला तो समाज व्यवसाय देऊ शकत नसेल तर ती व्यक्ती तो भाषिक समाज सोडून देण्याचा प्रयत्न करते. सध्या जगात सुमारे सहा हजार भाषा अस्तित्वात आहेत आणि एब्रामच्या गणिती सूत्रानुसार एकविसाव्या शतकाच्या अखेरीस संपूर्ण जगात सुमारे ३०० भाषाच जिवंत राहतील. सुमारे ६० अशा भाषा आहेत की त्या भाषेतील अखेरची व्यक्ती जिवंत आहे. जगातील अनेक भाषा आज मरणासन्न आहेत.
भारत हे बहुभाषिक राष्ट्र आहे. मराठी ही जगातील दहाव्या क्रमांकाची भाषा आहे. मराठीसारख्या शेकडो प्रादेशिक भाषा आणि आदिवासींच्या भाषा नष्ट झाल्या तर काय फरक पडतो? जागतिकीकरणाने १९९२ ते २००० हे दशकच मानवी इतिहासात भाषिक क्रांतीचे ठरले. त्यातून इंग्रजी ही जागतिक भाषा जगाला मिळाली, जगातील अर्ध्याअधिक भाषा मृत्युपंथावर आहेत हे प्रथमच जगाला, अभ्यासकांना कळले; आणि या दशकात इंटरनेट हे नवे संज्ञापनमाध्यम जगाला मिळाले. लिहिणे व बोलणे एवढेच माहीत असलेल्या माणसाच्या हाती इंटरनेट, ई-मेल व चॅटरूम या गोष्टी आल्या. त्यामुळे मानवी नातेसंबंधात व देशांच्या आंतरराष्ट्रीय संबंधात आमूलाग्र बदल झाले.
इंग्रजी ही जागतिक भाषा होण्याची करणे कोणती?- डॉ. क्रिस्टल यांच्या मते इंग्रजी भाषेची ताकद चार प्रकारची आहे. एक, ब्रिटिश साम्राज्यामुळे मिळालेली राजकीय ताकद; दुसरी ज्ञानाची ताकद. (जगातील ऐंशी टक्के वैज्ञानिक शोधांची भाषा इंग्रजी असते) तिसरी आर्थिक ताकद (जगातील बहुसंख्य बँकिंग संस्थांचा व्यवहार इंग्रजीत चालतो) आणि चौथी सांस्कृतिक ताकद! विसाव्या शतकातील सर्व नव्या सांस्कृतिक बाबी इंग्रजी भाषिक देशांत सुरू झाल्या. नभोवाणी, चित्रवाणी, चित्रपट, जाहिरात, वृत्तसंस्था, विमान प्रवासाचे नियंत्रण, इंटरनेट. जगातील पंचाऐंशी टक्के चित्रपटांची भाषा इंग्रजी असते. भाषांच्या अस्ताबाबत केवळ भाषाशास्रज्ञच नव्हे तर जीवशास्रज्ञही चिंताग्रस्त आहेत. कारण प्रत्येक भाषा ही एक प्रकारे स्वतंत्र ज्ञानशाखा असते. जेव्हा एखादी भाषा मृत होते, तेव्हा जगाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोनच आपण गमावून बसतो.
भारतातील भाषांचे सर्वप्रथम सर्वेक्षण जॉर्ज अब्राहम ग्रीअर्सन यांनी दीडशे वर्षांपूर्वी केले होते. त्यानुसार १७९ भाषा आणि ५४४ बोलींची नोंद होती. स्वातंत्र्यानंतर जनगणना सुरू झाली. जनगणनेत प्रत्येक व्यक्तीच्या मातृभाषेची नोंद होते. सन १९६१च्या जनगणनेत भारतातील मातृभाषांची संख्या १६५२ होती. यापैकी ३०० मातृभाषा आदिवासींच्या होत्या. दहा हजारपेक्षा अधिक लोकसंख्येच्या आधारावर भाषांचा विचार केल्यामुळे फक्त १०८ भाषांनाच मातृभाषेचा दर्जा देण्यात आला. आणि उर्वरित सर्व भाषांना १०९ व्या क्रमांकात ढकलून दिले गेले, ज्यात बहुसंख्य आदिवासी बोली आहेत. या बोलींना आपण लोकभाषा म्हणू. जनगणनेनुसार भारतातील लोकभाषांना कोणताही दर्जा नाही. भाषा काही हवेत निर्माण होत नाहीत. लोकांच्या सामाजिक व्यवहाराची जिवंत संस्था म्हणजे भाषा होय. त्या लोकांच्या सुखदुःखाची, प्राचीन परंपरांची, त्यांच्या वंशपरंपरागत ज्ञानाची अभिव्यक्ती त्यांच्या भाषेतूनच लोक करीत असतात. त्यांच्या भाषेचे अस्तित्व नाकारणे म्हणजे एकप्रकारे त्यांचेच अस्तित्व नाकारणे होय.
१९९१च्या जनगणनेनुसार गोंडी भाषा बोलणाऱ्यांची संख्या सुमारे वीस लाख आहे. माडिया भाषा एक लाख लोक बोलतात. कोरकू आणि मुंडा भाषा बोलणारे साडेचार लाख आदिवासी आहेत. मुंडारी, संथाली, पावरा, कुई, तुलू, मणीपुरी, त्रिपुरी आणि सावरा या आदिवासी बोली एक लाख ते आठ लाख संख्येच्या दरम्यान आहेत. - या भाषांना लिपी नाही म्हणून त्या अधिकृत नाही का? हा त्या त्या भाषिक समूहाचे लोकशाहीचे हक्क नाकारण्याचा मुद्दा आहे. कोणत्याही भाषेचे जिवंतपण त्या भाषेच्या पोटभाषांच्या व्यवहारात असते. भारतीय समाजात आजही अशा असंख्य पोटभाषा तग धरून आहेत आणि गेल्या तीन हजार वर्षात अखंडितपणे भारतीय संस्कृतीचा प्रवाह वाहता ठेवण्याचे महान कार्य या भाषांनी केले आहे. आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मातृभाषाच हवी.