‘आम्ही नरेंद्र मोदींच्या सरकारात सामील होणार नाही आणि आमचा राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्षही भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीत सहभागी होणार नाही’ असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिले आहे. त्यांच्या पाठोपाठ शरद पवारांच्या कन्या व खासदार सुप्रिया सुळे यांनीही त्या स्पष्टीकरणाचे पुनर्वचन केले आहे. स्वत: पवार मात्र त्याविषयी मौन धारण करून आहेत. सामान्य माणसांना पडणारा प्रश्न या स्पष्टीकरणाचा नाही. तो आहे, अशी स्पष्टीकरणे त्या पक्षाला वारंवार का द्यावी लागतात? या घटकेला आपण नेमके कुठे आहोत आणि काय आहोत, हे जनतेला सांगावे लागावे असे या पक्षाच्या नेत्यांना आणि प्रवक्त्यांना का वाटत असावे? वास्तव हे की सध्या ते कुठेही असले तरी राजकारणातली समीकरणे त्यामुळे फारशी बदलण्याची शक्यता नाही. नरेंद्र मोदींच्या पाठीशी संपूर्ण बहुमत आहे आणि पवार सोबत असले काय आणि विरोधात असले काय, त्याची त्यांना पर्वाही नाही. महाराष्ट्रातल्या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारलाही त्यांच्यामुळे कोणता धोका नाही. त्यांच्या सरकारात सामील झालेल्या शिवसेना या पक्षाचे पुढारी ‘भाजप हा आमचा पहिल्या क्रमांकाचा शत्रू आहे व पुढली निवडणूक आम्हाला त्याच पक्षाशी लढायची आहे’ असे कितीही सांगत असले तरी ती निवडणूक येतपर्यंत सेना सरकार सोडायला तयार नाही हे उघड आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी राज्यातील पुढारी (तसाही तो प्रादेशिकच पक्ष आहे) जेवढी टीका काँग्रेसवर करतात तेवढी ते भाजपवर व सेनेवर करीत नाहीत. सख्खे भाऊ सख्खे वैरी होतात असे म्हणतात त्याचा प्रत्यय आणून देणारे हे उदाहरण आहे. झालेच तर ते कुणाच्या बाजूने आणि कोणाच्या विरोधात आहेत हेही त्यांच्या राजकीय वाटचालीतून सध्या दिसत नाही. शरद पवार मोदींना भेटतात आणि सोनिया गांधींच्याही भेटीला जातात. त्या भेटींचा उद्देशही बहुदा ‘आम्ही आहोत बरं का’एवढे दाखविण्याखेरीज फारसा वेगळा दिसत नाही. ज्या पुढाºयांचा राजकारणातला भाव उतरला असतो ते आपले अस्तित्व सांगायला नुसत्याच स्वत:च्या वाढदिवसाच्या जाहिराती देतात तसेच काहीसे हे आहे. शरद पवार हे कधी काळी स्वत:ला समाजवादी म्हणायचे. समाजवादी काँग्रेस या नावाचा पक्षच त्यांनी तेव्हा काढला होता. झालेच तर ते स्वत:ला सेक्युलरही म्हणवून घेतात. सेक्युलर काँग्रेस याही नावाचा पक्ष त्यांनी याआधी काढला आहे. मात्र पक्षाचे नाव समाजवादी असो वा सेक्युलर तो खºया अर्थाने शरद पक्षच असायचा. आजही त्या पक्षाचे स्वरूप त्याहून जराही बदलले नाही. एक गोष्ट मात्र खरी, शरद पवारांना सत्तेवाचून फार काळ दूर राहण्याचा सराव नाही आणि त्यांची तशी तयारीही फारशी नसते. त्यांच्या पक्षातले काही वरिष्ठ सहकारी तर सत्तेबाबत एवढे उतावीळ की त्यांना जवळ राखायला सत्तेतली पदेच पवारांना त्यांना द्यावी लागतात. ४० वर्षांहून अधिक काळ ज्या नेत्याला सारा महाराष्ट्र आपल्या मुठीत ठेवता आला त्याची व त्याच्या पक्षाची ही अवस्था दयनीय म्हणावी अशीच आहे. ती तशी व्हायला त्याचे नेतृत्वच खºया अर्थाने जबाबदार आहे. कोणत्याही महत्त्वाच्या प्रश्नावर नेमकी व स्पष्ट भूमिका न घेणे आणि इतर पक्षांसह आपल्या अनुयायांना व जनतेलाही स्वत:ला गृहित धरू न देणे याची काळजी जो नेता अखंडपणे वाहतो त्याला विचारात घेणे वा त्याच्यावर विश्वास ठेवणे हे जनतेनेही यथाकाळ सोडून दिले असते. २०१९ च्या निवडणुकीत त्यांचा पक्ष नेमका कोणासोबत असेल हे खुद्द त्यांच्याखेरीज त्यातल्या कोणालाही आज सांगता येईल अशी स्थिती नाही आणि स्वत: पवारही वेळेवरची गणिते मांडूनच आपला पक्ष न्यायचा तेथे नेतील अशीच साºयांची त्यांच्याविषयीची धारणा आहे. राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू वा मित्र नसतो, असे चर्चिल म्हणायचे. त्या क्षेत्रात स्वहितच (देशहित) अधिक महत्त्वाचे असते, असेही ते सांगत. ऐन निवडणुकीच्या वेळी आपले हित कोठे आहे याचा अंदाज घेतल्याखेरीज पवार त्यांची भूमिका कोणाला कळू देणार नाहीत हे याचमुळे समजणारे आहे. आपण ज्याला नेता मानतो त्याचे पुढचे पाऊल कोणते असेल आणि तो आपल्याला कोणत्या मार्गाने नेईल हे अनुयायांना न कळणे हा पुढाºयावरील त्यांच्या अंधश्रद्धेचाच खरेतर भाग असतो. मात्र नेत्याला सोडले तर आपणही कुठे असणार नाही याची भीती त्यांना त्याच्यासोबत ठेवत असते. देशात प्रादेशिक पुढारी कमी नाहीत. राष्ट्रीय पातळीवरही अनेकांची नावे आता स्थिर आहेत. त्यापैकी बहुतेक साºयांविषयीच (अलीकडचा नितीशकुमारांचा धक्का वगळता) काही गृहिते स्पष्टपणे सांगता येतात. राजकारणाची दिशा व त्याच्या पुढल्या वळणाचे अंदाजही त्याच बळावर देश आणि समाज बांधत असतो. पवार या साºयालाच अपवाद ठरावे असे नेते आहेत. महाराष्ट्र त्यांना गृहित धरत नाही. त्यांचा पक्षही त्यांच्या पुढल्या पावलाविषयीचा विश्वास बाळगत नाही. राष्ट्रीय पातळीवरचे पक्ष व आघाड्याही अलीकडे त्यांना वगळून विचार करताना दिसत आहेत. समाजवादी, सेक्युलर आणि जनतेचे नेते अशी दीर्घकाळ प्रतिमा असणाºया नेत्याच्या वाट्याला ही स्थिती येणे आणि ती यायला ते स्वत: कारणीभूत असणे हा त्यांच्याविषयी आस्था असणाºया साºयांनाच व्यथित करणारा भाग आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांची ही स्पष्टीकरणे कशासाठी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2017 3:41 AM