महाविकास आघाडीच्या नशिबात काय वाढून ठेवले आहे?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2022 10:31 AM2022-07-01T10:31:40+5:302022-07-01T10:32:48+5:30
काँग्रेस मविआतून बाहेर पडली तर राष्ट्रवादी शिवसेनेसोबत राहणार नाही. काँग्रेस या जुन्या मैत्रिणीच्या गळ्यात हात टाकणे राष्ट्रवादीलाही अपरिहार्य होईल !
आपापल्या भागात प्रभाव असलेल्या सरदारांचा एकत्रित तंबू म्हणजे राष्ट्रवादी. शरद पवार हे त्या तंबूतले रिंगमास्टर. कालपर्यंत राज्याच्या राजकारणाचा रिमोट कंट्रोल हातात असलेले पवार यांना फडणवीसांनी राजकीय खेळी करून अवघ्या आठ दिवसांतच काहीसे अप्रासंगिक केले आहे. आता पवारांना नवीन भूमिका शोधावी लागेल. शिंदे यांच्या बंडानंतर मातोश्रीवरून फडणवीसांना समेटासाठी फोन गेल्याच्या बातम्या आल्या, पण राष्ट्रवादीकडूनही सत्तास्थापनेसाठीची ऑफर फडणवीसांना दिली गेली, अशीही चर्चा आहे. रात्री-बेरात्री काही नेते फडणवीसांना त्यासाठी भेटलेदेखील म्हणतात. फडणवीसांच्या सागर बंगल्यात गेल्या एक महिन्यात कोण कोण गेले हे शोधले तर धक्कादायक माहिती मिळेल. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होऊ दे, असे साकडे देवीला घातले जात असताना घरातले उपमुख्यमंत्रिपदही निघून गेले आहे.
आता विरोधी पक्षनेतेपद मिळेल. ते अजित पवार किंवा जयंत पाटलांना मिळू शकते. तसा क्लेम अजितदादांचा जास्त आहे, पण त्यांच्या पक्षात फक्त त्यांचीच मर्जी कुठे चालते? उद्धव ठाकरे लक्ष देत नव्हते, आमदारांना भेटतही नव्हते या शिवसेना आमदारांच्या तक्रारी होत्याच, पण त्यांचा त्याहूनही जास्त रोष हा राष्ट्रवादीकडून दाबले जात असल्याबद्दलचा होता. त्यामुळे शिवसेनेत झालेल्या बंडातील एक खलनायक राष्ट्रवादीदेखील आहे. सरकार आणण्याचे श्रेय त्यांचे; तसेच अपश्रेयाच्या धन्यांपैकीदेखील ते एक.
आता महाविकास आघाडी कदाचित टिकणार नाही. आपण स्वबळावरच पुढे जाऊ, असा दबाव काँग्रेस पक्षातून नेतृत्वावर येईल. काँग्रेसमहाविकास आघाडीतून बाहेर पडली तर पुढे राष्ट्रवादीही शिवसेनेसोबत राहणार नाही. काँग्रेस नावाच्या जुन्या मैत्रिणीच्या गळ्यात हात टाकल्याशिवाय राष्ट्रवादीलाही पर्याय नसेल.