- किरण अग्रवाल
विविध राजकीय पक्षांनी चालविलेली तयारी पाहता, आगामी लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. यात अकोल्यासाठी महाआघाडी अंतर्गतच्या शिवसेनेचा मित्रपक्ष ‘वंचित’ची भूमिका काय असेल याबरोबरच, बुलढाणा व वाशिमच्या जागा शिवसेना शिंदे गटासाठी कायम राखण्यात भाजप राजी असेल का, याचीच उत्सुकता मोठी आहे.
पश्चिम वऱ्हाडातील सर्वपक्षीय सक्रियता वाढीस लागली असून वरिष्ठ नेत्यांचे दौरेही वाढल्याचे पाहता संबंधित पक्ष ‘इलेक्शन मोड’वर आल्याचे स्पष्ट व्हावे; अर्थात प्रत्येकाचीच स्वानुकूल विजयाची गणिते असलीत तरी युती वा आघाडीअंतर्गत कोणती जागा कोणत्या पक्षाच्या वाट्यास जाते यावरच सारे अवलंबून असल्याने उमेदवारीपेक्षा जागावाटपाचीच उत्सुकता लागून राहणे स्वाभाविक ठरले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून राजकीयदृष्ट्या मोर्चेबांधणी सुरू झाली असून, यात अपेक्षेप्रमाणे भाजप आघाडीवर आहे. लोकसभेत स्वबळावर ‘शतप्रतिशत’ यश मिळविण्यासाठी या पक्षाचे ‘मिशन’ सुरू झाले असून त्याअंतर्गतच बुलढाणा जिल्ह्यात गेल्या नऊ महिन्यांत तीनदा केंद्रीय मंत्री बघेल येऊन गेले आहेत, तर अकोल्यात दोन दिवसांनी पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा येत आहेत. भाजपने दोन दिवसांपूर्वीच लोकसभा मतदारसंघनिहाय प्रमुखांच्या नेमणुकाही केल्या आहेत. काँग्रेसही कामास लागली असून, अलीकडे या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे या परिसरातील दौरे वाढले आहेत. पश्चिम वऱ्हाडातील व विशेषत: अकोला जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव पाहता, या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचादेखील संपर्क वाढला आहे. शिवसेनेचे दोन्ही गट व अन्यही पक्षांच्या चाचपण्या सुरू झाल्या आहेत. फक्त जागावाटपाचे चित्र स्पष्ट होण्याची प्रतीक्षा आहे आणि तोच सर्वांच्या दृष्टीने कळीचा मुद्दा आहे.
पश्चिम विदर्भात एकमात्र अकोल्याची जागा भाजपच्या हाती आहे, जी चार टर्मपासून या पक्षाने राखली आहे; परंतु सारे विरोधक एकवटले तर भाजपचा पराभव होऊ शकतो हे १९९८ व ९९ च्या निवडणुकीत बघावयास मिळालेले असल्याने कोणताही धोका राहू नये म्हणून थेट पक्षाध्यक्षच येथे येत आहेत. भाजपच्या या खबरदारीमागे विद्यमान खासदार संजय धोत्रे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे नवीन उमेदवाराच्या शोधाचा मुद्दा तर असावाच; शिवाय महाविकास आघाडीतील शिवसेना (ठाकरे) सोबत ‘वंचित बहुजन’ची नाळ जुळल्याची पार्श्वभूमीही असेल तर सांगता येऊ नये. महाआघाडीअंतर्गत अकोल्याच्या जागेवर काँग्रेसने आतापासूनच हक्क सांगायला सुरुवात केली असली आणि शिवसेनेसोबतच्या वंचितच्या मैत्रीला या महाआघाडीत स्थान काय? हेही निश्चित नसले तरी जागावाटपातील ‘वंचित’ फॅक्टर सर्वांसाठीच लक्षवेधी ठरल्याची ही लक्षणे म्हणता यावीत.
बुलढाणा लोकसभा मतदारसंघ हा तसा १९९० च्या दशकापर्यंत काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला; पण १९९८ चा अपवाद वगळता १९९६ व नंतर १९९९ पासून आजतागायत शिवसेनेने येथे वर्चस्व राखले आहे. २००९ मध्ये हा मतदारसंघ खुला झाला तेव्हापासून सलग तीन वेळा प्रतापराव जाधव यांनी विजयाची परंपरा कायम राखली आहे. आता ते शिवसेना (शिंदे) सोबत असल्याने व हा गट भाजपचा साथीदार असल्याने स्वाभाविकच जागावाटपात युतीअंतर्गत ही जागा शिंदे गटालाच मिळण्याची अपेक्षा आहे, तथापि या जिल्ह्यात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी लक्ष केंद्रित केले आहे. भाजपची संघटनात्मक मजबुती ही सहकारी पक्षांच्या उपयोगासाठीच असल्याचे त्यांनी स्वतः स्पष्ट केले असले तरी भाजपची ‘मन की बात’ काय, याबद्दल सांगता येऊ नये. आघाडीअंतर्गत काँग्रेसही येथील जागेवर दावा करीत आहे. राष्ट्रवादीने तीनदा येथे पराभव पाहिल्याने यंदा काँग्रेस जागावाटपाची भाकर फिरवू म्हणतेय; पण राष्ट्रवादीवर सारे अवलंबून आहे.
वाशिमची जागाही वर्तमान अवस्थेत शिवसेना शिंदे गटाकडे असल्याने व भावना गवळी यांची पाचवी टर्म असल्याने तेथे भाजप काय निर्णय घेतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे; कारण विद्यमानांना होऊ शकणारा अँटी इन्कमबन्सीचा धोका व यवतमाळ, वाशिमच्या प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा पाहता, भाजप येथून सर्वपरिचित स्थानिक चेहरा उतरवण्याची शक्यताही नाकारता येऊ नये. दुसरीकडे, आघाडीत वाशीममधून मातब्बर नाव अजून तरी चर्चेत नाही; त्यामुळे प्रथेप्रमाणे यवतमाळकरांच्या उमेदवारीवर काँग्रेसच ही जागा लढवील अशी चिन्हे आहेत. मात्र शिवसेना ठाकरे गटाकडूनही धडा शिकवण्याची भाषा होत असल्याने आघाडीत जागावाटपासाठी रस्सीखेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सारांशात, आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पश्चिम विदर्भातील अकोला, बुलढाणा व वाशिमच्या जागांचा प्राथमिक अंदाज घेता उमेदवाराच्या नावाऐवजी युती व महाआघाडीअंतर्गतच्या जागावाटपाकडेच इच्छुकांचे डोळे लागून राहणे स्वाभाविक ठरले आहे.