अनेक दशके वादग्रस्त राहिलेला आणि जनमानस ढवळून काढलेला राममंदिर - बाबरी मशीद मुद्दा न्यायालयीन निर्णयाने मिटतो तोच देशात ‘मथुरा, काशी बाकी हैं’चा नारा निनादू लागला. जोडीला तुमचा लाऊडस्पीकर तर आमची हनुमान चालीसा, ज्ञानव्यापी मशीद की शिवलिंग आदी धार्मिक कट्टरतावादाची चढती कमान दिसू लागली. काल-परवापर्यंत या कलहामागे आंतरधर्मीय अस्मितांची किनार होती. पण, आज धार्मिक अस्मितांची प्रतीके भक्कम करण्याचा हा खेळ इतका विकोपाला गेला आहे की हनुमान जन्मस्थळावरून हिंदू धर्मपीठांतच वाद सुरू झाला आहे.
वाल्मीकी रामायणाच्या आधारे जगद्गुरू शंकराचार्यांनी मान्यता दिल्यानुसार हनुमानाचे जन्मस्थळ कर्नाटकातील किष्किंधा असल्याचा दावा किष्किंधा ट्रस्टने केला. याला नाशिकजवळच्या अंजनेरीचे ग्रामस्थ आणि इतर आखाड्यातील साधू - संत - महंतांनी आक्षेप घेतला. त्यामुळे अंजनेरी हनुमान जन्मस्थळाचा वाद चिघळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. या वादावर तोडगा काढण्यासाठी आयोजित कथित धर्मसभेत जमलेल्या संत - महंतांतील पुढारी हमरीतुमरी - हातघाईवर आल्याचे सर्वांनी पाहिले. हे कमी म्हणून की काय हनुमान जन्मस्थळावरून बोलाविलेली चर्चा भरकटून ती ‘काॅंग्रेसवाले - भाजपवाले’ या राजकीय पातळीवर पोहोचली.
भारतात धर्म आणि राजकारण हातात हात घालून चालत असतात, याची प्रचिती यानिमित्ताने पुन्हा एकदा आली. पण, धर्ममार्तंडांआडून राजकारण करणाऱ्यांना शेवटी धर्ममार्तंडच अडचणीत आणत असतात हे वास्तवदेखील लक्षात घेणे गरजेचे आहे. एका बाजूला जगाला मन:शांतीचे उपदेशामृत पाजत अध्यात्माची महती गायची आणि स्वतः मात्र अशांतीचा मार्ग अवलंबायचा! यावरून या तथाकथित धर्मगुरूंना आपलाच ‘डोलारा’ सांभाळता येत नाही, हेच अधोरेखित होते. या सर्व घडामोडी, दावे - प्रतिदावे, धर्मपीठांवरील वर्चस्वाच्या लढाईचे वर्णन देव झाले उदंड आणि भक्तांना चढला भक्तीचा गंड, देव देव्हाऱ्यात आणि भक्त उन्मादात, असेच करावे लागेल.
श्रद्धाळू भक्त मनातल्या आस्थेपायी देवस्थानात येतो, काही काळ थांबतो, मनोभावे प्रार्थना करतो, यथाशक्ती देणगी देतो आणि सुखा-समाधानाच्या आशेने घरी परततो. मात्र, त्यांच्या या स्वाभाविक आणि आस्थेच्या छोट्या कृतीतून देवस्थान नावाचा भला थोरला डोलारा उभा राहिला. दुसरीकडे देवतांबरोबरच धार्मिक गुरू - बाबा - आचार्य यांचीही संख्या व प्रस्थ झपाट्याने वाढून बलाढ्य आणि धनाढ्य धार्मिक संस्थाने निर्माण झाली. खेदाची बाब म्हणजे या धार्मिक संस्थानांना जनाधार आणि राजाश्रयदेखील मिळत आहे. नेतृत्वाने जनतेला वळण लावणे गरजेचे आहे. पण, आज नेतृत्वच जनतेच्या वळणाने जाण्यात धन्यता मानत आहे.
आज देशापुढे अगणित समस्या आहेत. त्या नजरेआड करून धर्मज्वर जागता ठेवण्यात आपण वेळ दडवतो आहोत. सामाजिक विज्ञानाचा एक सिद्धान्त आहे की, जसजसा एखादा समाज शैक्षणिक आणि आर्थिक पातळीवर प्रगत होत जातो तसतशी तेथील जनता आधुनिक विचारांची होत जाते. पण, आपला समाज या विज्ञानाला अपवाद ठरतो आहे. देवाच्या नावानं भांडणारी धर्मपीठे, संघटना जनतेचे जीवन सुसह्य करण्यासाठी काय करीत असतात? म्हणूनच कदाचित एका द्रष्ट्या विचारवंताने असा रोखठोक सवाल उपस्थित केला होता की, ‘कुठे असतात ही धर्मपीठे? आणि एरवी हे धर्मगुरू काय करीत असतात?’ - आज हा प्रश्न कधी नव्हे इतका महत्त्वाचा ठरतो आहे! - बाळकृष्ण शिंदे, पुणे