Bharat Jodo Yatra: भारताचा ‘स्वधर्म’ काय आहे?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2022 12:51 PM2022-09-21T12:51:01+5:302022-09-21T12:51:48+5:30

Bharat Jodo Yatra: भारताच्या स्वधर्मावर विधर्माकडून होत असलेला घातक हल्ला रोखण्याचा एक सामुदायिक प्रयत्न म्हणजे ‘भारत जोडो’ यात्रा!

What is India's 'Swadharma'? | Bharat Jodo Yatra: भारताचा ‘स्वधर्म’ काय आहे?

Bharat Jodo Yatra: भारताचा ‘स्वधर्म’ काय आहे?

Next

- योगेंद्र यादव
(अध्यक्ष, स्वराज इंडिया)

भारताच्या स्वधर्मावर विधर्माकडून होत असलेला घातक हल्ला रोखण्याचा एक सामुदायिक प्रयत्न म्हणजे ‘भारत जोडो’ यात्रा. 
- या यात्रेचे औचित्य काय? असा प्रश्न वारंवार विचारला जात असताना माझे हे संक्षिप्त उत्तर होते. या सूत्रवाक्याने पुष्कळशा लोकांचे समाधान होणार नाही हे उघडच असले तरी या उत्तरातून आणखी प्रश्नही उभे राहतात.

भारताचा स्वधर्म काय आहे? एखाद्या व्यक्तीचा किंवा जातीचा स्वधर्म याबद्दल ऐकले आहे, एखाद्या देशाचाही स्वधर्म असू शकतो. काही देशात इस्लाम किंवा ख्रिश्चन धर्माला अधिकृत मान्यता आहे. त्या धर्तीवर काही लोक भारतात हिंदू राष्ट्राचा  विचार मांडतात. भारताच्या स्वधर्माचा विचार या दिशेने तर इशारा करत नाही? भारताच्या स्वधर्माची व्याख्या कोण करील? 

 धर्म याचा अर्थ येथे रूढ अर्थाने आपण हिंदू, मुस्लीम किंवा ख्रिश्चन म्हणतो तसा धर्म नाही. त्याला पंथच म्हणावे लागेल. इथे धर्म म्हणजे जो धारण करण्यायोग्य आहे. जो नैतिक आहे. धर्माची ही व्याख्या ब्राह्मणवादी असण्याची गरज नाही. अर्थातच भगवद्गीतेत उल्लेखलेल्या स्वधर्माचा अर्थ चार वर्णांची जातीवादी व्यवस्था बळकट करणारा असा घेता येईल; परंतु प्रारंभापासूनच धर्माच्या व्याख्येमध्ये एक आणि आम जनतेच्या आकलनातील दुसरी, अशा  दोन विचारधारा दिसतात. ब्राह्मणवादी प्रवाहाने धर्माला कोणती तरी एक जात, समुदाय किंवा परिस्थितीशी जोडलेय; परंतु आम जनतेच्या मनातील विचारांनी धर्माला एक सामान्य नैतिक मानव धर्माची व्याख्या मिळवून दिली. 

स्वधर्मात दोन तत्त्वांचा संगम आहे. स्व आणि धर्म. स्वार्थात स्व आहे; पण धर्म नाही. स्वधर्माचे एक तत्त्व धारकाकडे बोट दाखवते तर दुसरे धारणयोग्य दिशा दर्शविते. स्वधर्म केवळ स्वभाव नाही. सामान्य वृत्ती नाही. तो बहुमताचा कल नाही. 

स्वभाव चांगला असू शकतो किंवा वाईट. सामान्य वृत्ती साधारणतः पतनाकडे घेऊन जाते. बहुमताचा कल दमनकारी किंवा अन्यायपूर्ण असू शकतो; परंतु स्वधर्म कधीही अनुचित असू शकत नाही. त्याबरोबरच स्वधर्म हे शाश्वत नैतिक मूल्यही नाही. स्वधर्माची अवधारणा समजून घेण्यासाठी परधर्म, अधर्म आणि विधर्माचा अर्थही समजून घ्यावा लागेल. अधर्म समजून घेणे कठीण नाही. धर्माच्या अनुरूप जो नाही तो अधर्म. जर धर्म सदाचार निर्माण करत असेल तर अधर्म कदाचाराच्या मुळाशी आहे; जो धर्मापासून दूर जायला लावतो किंवा अध:पतनाचे कारण ठरतो. सर्वसाधारणपणे अधर्म पाखंडाचे रूप घेतो. अधर्म धर्मावर प्रश्न उपस्थित करत नाही हेही लक्षात घेतले पाहिजे. सांगायला धर्माचा सन्मान करतो; परंतु व्यवहारात मात्र उपेक्षा करतो. सर्व मानवी समाजात ही एक सामान्य प्रवृत्ती आढळते. सकाळी मंदिरात जायचे आणि दिवसभर पापे करत फिरायचे किंवा वाणीने अहिंसेचा उदोउदो करायचा आणि कर्मातून मात्र हिंसा करत राहायचे,  ही याची उदाहरणे आहेत.

अशा धर्माची उपेक्षा आणि त्याला नाकारणे हे आमचे कर्तव्य आहे. परधर्म यापेक्षा बिलकूल वेगळा आहे. परधर्म म्हणजे कोण्या दुसऱ्याचा धर्म! तो धारणायोग्य आहे;  पण माझा काळ, ठिकाण आणि स्थिती याला तो अनुरूप नाही. तो धर्माच्या रूपात असल्यामुळे आकर्षक आहे. त्याचा लोभ वाटतो. तो पथ विचलित करतो म्हणून तो भयावह आहे. दुसऱ्याच्या स्वधर्माची नक्कल किंवा गुलामीतून नेहमीच परधर्माचे आकर्षण उत्पन्न होते. दुसऱ्याने तयार केलेल्या रस्त्यावरून जाण्याचे आश्वासन आणि संरक्षणाचा आभास आपल्याला परधर्माकडे ओढतो. 

आधुनिकतेच्या नावाने पश्चिमी भाषा, वेशभूषा, भोजन आणि लटक्या झटक्यांची नक्कल करण्याची प्रवृत्ती हे परधर्माच्या आकर्षणाचे एक उदाहरण! आपले बुद्धिजीवी सतत युरोपमधील विचारप्रवाह आणि वादप्रवादांचे अंधानुकरण करतात ते दुसरे उदाहरण. परधर्माचा आदर ठेवून त्याच्यापासून दूर राहणे हेच श्रेयस्कर आहे; असे भगवद्गीता आपल्याला सांगते.

विधार्माचा धोका अधर्म किंवा परधर्मापेक्षा वेगळा आहे. विधर्म धर्माचा विरोध करतो. विधर्म केवळ धर्माच्या अनुरूप असत नाही तर धर्माच्या विरुद्ध जाऊन धर्माचे खंडन करण्याचे काम करतो. हे अत्यंत धोकादायक विचलन आहे. कारण ते स्वधर्माला धर्म मानत नाही. त्याला तोडण्याचा प्रयत्न सतत करत राहते. जेव्हा वैदिक धर्माचा सामना जैन आणि बौद्ध धार्मिक परंपरांशी झाला तेव्हा त्याच्या दृष्टीने तो विधर्माचा हल्ला होता. विधर्माचा प्रतिकार करणे अनिवार्य होय.

धर्माची व्याख्या करताना विनोबा भावे यांनी म्हटले होते, ‘स्वधर्माबद्दल प्रेम, परधर्माबद्दल आदर आणि अधर्माबद्दल उपेक्षा मिळून धर्म होतो.’ यात थोडी दुरुस्ती करून असे म्हणता येऊ शकेल की ‘धर्माच्या पालनाचा अर्थ म्हणजे, सर्व धर्मांबद्दल प्रेम, परधर्माबद्दल 
आदर, अधर्माची उपेक्षा आणि विधर्माचा प्रतिकार.’ 
- परंतु एखाद्या देशाचा स्वधर्म असू शकतो काय? आज भारतात जे होत आहे ते आमच्या देशाच्या स्वधर्मावर हल्ला आहे असे आपण कसे म्हणू शकतो? या प्रश्नाचे उत्तर पुढच्या लेखात..
    yyopinion@gmail.com

Web Title: What is India's 'Swadharma'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.