शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरणारे लाडके निर्णय, एकनाथ शिंदे अन् पुढे काय?

By यदू जोशी | Published: July 05, 2024 5:42 AM

शिंदे यांच्या मोठे होण्याला भाजपची कधीही हरकत नसेल; पण शिंदे भाजपपेक्षा मोठे होण्याचा क्षण आला तर मग हलके खटके सुरू होतील.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण, वर्षाला तीन मोफत सिलिंडर, शेतकऱ्यांना वीजबिल माफी या गोष्टी विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरतील, असे दिसते. लोकसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर विधानसभेतही धक्के बसू नयेत म्हणून केलेले हे उपाय आहेत हे खरेच आहे. जखम पायाला अन् पट्टी डोक्याला असे होऊ न देता लोकसभेला दुरावलेला मतदार जवळ करण्यासाठी नेमके काय करायचे याचा विचार महायुती सरकार करत आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडला जात आहे. ‘आमचे सरकार हे देणारे सरकार आहे’ या वाक्यामागील दातृत्व भावनेचा विस्तार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहेत. 

अजित पवार तसे शिस्तीचे, लोकांना खुश करण्यासाठी राज्याची तिजोरी अशी रिती करण्यासाठी ते फार आनंदाने तयार झाले असतील असे नाही; पण ‘मरता क्या न करता’? शेवटी विधानसभा जिंकायची तर हे सगळे करावेच लागणार आहे. एरवी वेगळी परिस्थिती असती तर ‘लोकांना काय सगळं फुकटच द्यायचं का? असे म्हणत त्यांनी त्रागा केला असता. ‘लाडकी बहीण’सह विविध योजनांना मुख्यमंत्र्यांचे नाव देण्यात आले आहे, याचा अर्थ स्पष्ट आहे की विधानसभा निवडणूक ही महायुती शिंदेंच्या नेतृत्वात लढेल. आपले नेतृत्व महायुतीत अधिक मजबूत करण्यासाठी शिंदे यांची ही रणनीती दिसते. 

गंमत बघा कशी आहे, अर्थसंकल्प मांडला अजित पवारांनी, पण त्याचे श्रेय मिळाले एकनाथ शिंदे यांना. अर्थसंकल्पातील लोकाभिमुख घोषणांचे श्रेय अजित पवारांना देत तसे प्रोजेक्शन करणे त्यांना आणि त्यांच्या पक्षालाही जमले नाही. आजूबाजूच्या लोकांकडे तो वकूब असावा लागतो, आपल्या नेत्याची प्रतिमा कशी उंचावत न्यायची याचे भान असलेली टीम शिंदेंकडे आहे, त्यांनी एका रात्रीतून, ‘मदतीचा हात एकनाथ’ असे पोस्टर झळकविले. एकाचवेळी अनेक आघाड्यांवर प्रसिद्धी दिली. अजित पवार त्याबाबत खूपच कच्चे वाटतात. त्यांच्या अवतीभोवतीच्या लोकांचा जादा वेळ हा इतरांचा राग करण्यात अन् नकारात्मकतेत जातो.

लोकसभेला प्रतिकूल परिस्थितीतही १५ पैकी ७ जागा जिंकून शिंदेंनी स्ट्राइक रेट राखला, आता एकामागून एक लोकप्रिय घोषणांचा सपाटा लावून ते मांड पक्की करत चालले आहेत. कोणालाही कधीही भेटणारा, बोलणारा अन् कोणाच्याही मदतीला धावून जाणारा नेता ही त्यांची प्रतिमा त्यांच्यासाठी धावून येईल असे दिसते. शिंदेंकरिता कसरत भारी आहे. मोठा भाऊ भाजपला मोठेपण देत देत स्वत: मोठे होत जाणे ही ती कसरत आहे. शिंदेंचे मोठे होणे याला भाजपची कधीही हरकत नसेल पण शिंदे हे भाजपपेक्षा मोठे होण्याचा क्षण आला तर मग हलके खटके सुरू होतील. अर्थात देवेंद्र फडणवीस हे या सरकारमधील शॉक ॲब्जाॅर्बर आहेत, ते तशी वेळ येऊ देणार नाहीत. फडणवीस यांची त्यांच्या पक्षातील मांड अजूनही तशीच पक्की असल्याचे परवा विधान परिषदेची नावे आली तेव्हा स्पष्ट झाले. पाचपैकी चारजण त्यांचे अत्यंत निकटचे आहेत, राहिल्या पंकजा मुंडे; तर त्यांचा आणि फडणवीस यांचा पूर्वीचा दुरावा आज अजिबात राहिलेला नाही. दुरावलेली बहीण पुन्हा लाडकी बहीण होण्याच्या मार्गावर आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरही प्रदेश भाजपमध्ये फडणवीस यांचेच चालेल असा मेसेज पक्षनेतृत्वाने दिला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना बदलणार अशी चर्चा होती, पण या चर्चेला अर्थ नाही.

आघाडीला झाले तरी काय? राहुल गांधी यांनी लोकसभेत मोदी सरकारवर एकच हल्लाबोल केला आहे. दीड तासांच्या भाषणात त्यांनी सरकारवर जोरदार टीकास्र सोडले. मोदींच्या भाषणाच्या वेळी विरोधकांनी हंगामा केला. दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच विरोधकांचे जबरदस्त अस्तित्व संसदेत दिसत आहे. महाराष्ट्र विधिमंडळात मात्र तसे काही दिसत नाही. सध्या विरोधी बाकांकडे पाहून प्रश्न पडतो की केवळ २५-३० दिवसांपूर्वी लोकसभेला ३१ जागा मिळविणारे हेच लोक आहेत का? या विजयाने मनोबल उंचावलेले विरोधक अधिवेशनात सत्तापक्षाला सळो की पळो करून सोडतील, असे माध्यमांनी म्हटले होते, प्रत्यक्षात तसे काहीही घडताना विधिमंडळात दिसत नाही. ५४३ पेैकी ९९ आले तरी राहुल गांधी प्रचंड आक्रमक झाले आहेत, ४८ पैकी ३१ जागा जिंकूनही महाविकास आघाडी आक्रमक दिसत नाही. विधानसभा निवडणुकीच्या आधी सरकारला सहकार्य करून आपापल्या मतदारसंघातील कामे काढून घेण्याचा हेतू तर नाही? 

सरकारची कोंडी करण्यापेक्षा विधानसभा विजयाची तयारी करण्याला विरोधकांनी प्राधान्य दिलेले दिसते. मात्र, यानिमित्ताने राहुल गांधींची भूमिका आणि महाविकास आघाडीची भूमिका यातील विसंगती प्रकर्षाने दिसत आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अध्यक्षांनी नाकारलेल्या स्थगन प्रस्तावावर अदानींच्या घशात मुंबईतील जमीन घातली जात असल्याचा मुद्दा उचलला; एवढाच काय तो अपवाद पण सरकारची कोंडी कुठे झाली? 

जाता जाता : सुधा मूर्ती या इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांच्या पत्नी. त्या स्वत: समाजसेवक, उत्तम लेखिका अन् अत्यंत संवेदनशील व्यक्ती आहेत. राज्यसभेतील त्यांच्या पहिल्या भाषणात महिलांच्या आरोग्यावर बोलताना  परवा त्या असे म्हणाल्या की महिलांचा जिथे सन्मान होतो तिथे देवाचे अस्तित्व असते. सुधा मूर्तींचे किती अप्रतिम वाक्य होते ते ! राज्यसभा हे ज्येष्ठांचे सभागृह. राज्याचा विचार केला तर विधान परिषद हे आपले ज्येष्ठांचे सभागृह. या सभागृहात जवळपास त्याचवेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे आई-बहिणीच्या शिव्या देत होते. पोर्शे दुर्घटनेतील दिवट्याला निबंध लिहिण्याची शिक्षा दिली म्हणून स्वाभाविक टीका झालेली होती. निलंबन तर विधान परिषदेने केले, पण यानिमित्ताने चार चांगल्या गोष्टी वाचाव्यात, जिभेच्या सद्विचारांचा व्यायाम करावा अशी शिक्षा दानवे यांनी स्वत:लाच द्यायला काय हरकत आहे?

yadu.joshi@lokmat.com

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवारBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी