पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी मुंबईत महायुतीच्या सर्व आमदार आणि मंत्र्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सर्वांची काळजी करणारा त्यांच्यातील एक माणूस तर जाणवलाच, पण त्याचवेळी लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार, मंत्र्यांनी काय करणे अपेक्षित आहे हे सांगताना त्यांच्यातील उत्तम आणि लोकाभिमुख व्यक्तिमत्त्वाचादेखील प्रत्यय आला. भाजपच्या परवाच्या शिर्डी येथील अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढील पाच वर्षांत राज्याला प्रामाणिक आणि पारदर्शक सरकार देण्याची ग्वाही दिली होती, त्याला जोडूनच मोदी यांच्या मार्गदर्शनाकडे पाहिले तर केंद्रात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र या सूत्रानुसार पुढील पाच वर्षे कशी वाटचाल असू शकेल याचा अंदाज येतो.
फडणवीस यांचा आधीचा कार्यकाळ बघता धोरणात्मक आणि राज्यावर चांगले, पण दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेण्याकडे त्यांचा कल राहिलेला होता. मोदी यांनीही सुशासनाच्या दृष्टीने व्यापक विचार करून निर्णय व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. हे लक्षात घेता पुढील पाच वर्षांत व्यक्तिकेंद्रित, कंत्राटदारधार्जिण्या विषयांपेक्षा राज्याच्या हिताचा विचार करून वाटचाल होईल, अशी अपेक्षा करायला हरकत नाही. केवळ रस्ते, पूल, नाल्यांचे बांधकाम म्हणजे विकास या संकुचिततेतून बाहेर पडण्यास मोदी यांनी सांगितले आहे. साधेपणाचा आग्रह धरताना त्यांनी प्रतिमा जपण्यास सांगितले आहे. मोदींसारखा नेता प्रतिमा जपण्याचा आग्रह धरतो तेव्हा केवळ प्रामाणिक राहणे एवढाच त्याचा अर्थ निघत नाही. साधे राहा आणि शिस्तीत राहा, असेही त्यांनी म्हटले आहे.
वैयिक्तक चारित्र्य जपण्यासह चांगल्या प्रतिमेसाठी जे जे करणे अपेक्षित असते ते ते सगळेच त्यांना अपेक्षित असते. पण, कोणीही सत्तेत आले तरी महाराष्ट्रात काय चित्र बघायला मिळते? सत्तेतून पैसा आणि पैशांमधून पुन्हा सत्ता ही प्रवृत्ती बळावतच चालल्याचे दिसते. मलई मिळवून देणारी कामे म्हणजे विकास हा सोयीचा अर्थ लोकप्रतिनिधी काढत आहेत. अशावेळी मोदी यांनी दिलेला सल्ला सत्तापक्षाच्या आमदारांनी आज पाळला नाही तर कदाचित त्यांना जादाचा धनलाभ होईलही, पण मोदींच्या डायरीत त्याची काय नोंद होईल आणि पुढे त्याचे काय दुष्परिणाम त्या आमदारांना भोगावे लागतील हे सांगता येत नाही. चित्रगुप्ताच्या डायरीत पाणपुण्याचा हिशेब असतो म्हणतात, मोदींचीही अशीच एक डायरी आहे. आमदार, खासदारकीची तिकिटे कापली जाण्यापासून हातातोंडाशी आलेले मंत्रिपद गमवावे लागलेल्यांना गतकाळात याच डायरीचा फटका बसला असे म्हणतात.
मोदी बोलले आणि निघून गेले, आता आपण आपली मनमानी करायला मोकळे असे जर कोण्या आमदार, मंत्र्यांना वाटत असेल तर ती त्यांची महाचूक ठरू शकते. मोदींचे सीसीटीव्ही कॅमेरे सगळीकडे लागलेले असतात, हे आजवर या कॅमेऱ्यात अडकल्याने ज्यांचे हात पोळले त्यांना चांगलेच ठाऊक आहे. मोदी यांनी त्यांच्या मार्गदर्शनात महायुतीच्या तिन्ही पक्षांनी एकमकांसोबत घट्ट राहून काम करण्याचा दिलेला सल्लादेखील महत्त्वाचा आहे. विधानसभेच्या एका विजयाने आत्मविश्वास वाढल्यामुळे आता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळावर लढायला हवे असा विचार राज्यातील भाजपचे जे नेते करू वा बोलू लागले आहेत, त्यांना योग्य तो संदेश मोदी यांनी दिला आहे. स्वबळाची बेटकुळी काढणाऱ्या भाजपमधील कथित पहेलवानांनी केंद्रातील राजकारण आधी समजून घेतले पाहिजे.
संसदेत भाजपला मित्रपक्षांची असलेली गरज लक्षात घेता मित्रांना सांभाळून घेणे ही भाजपची आजची अपरिहार्यता आहे आणि मोदी ते निश्चितपणे जाणतात. एकमेकांचा समन्वय वाढविण्याचा जो सल्ला मोदी यांनी महायुतीच्या तिन्ही पक्षांना दिला आहे, त्याची अंमलबजावणी नजीकच्या काळात कशी होते यावर सरकारमधील ताळमेळ आणि महायुतीचे संबंध अवलंबून असतील. देवेंद्र फडणवीस हे ‘मोदी स्कूल ऑफ पाॅलिटिक्स’मधील विद्यार्थी आहेत. मोदींना काय अपेक्षित आहे हे त्यांना चांगल्याप्रकारे ठाऊक आहे. फडणवीस यांनी शिर्डीच्या अधिवेशनात भाजपचे पदाधिकारी, नेते आणि मंत्री, आमदारांसाठी जी आचारसंहिता नमूद केली तिची रेष मोदी यांनी आता महायुतीच्या अन्य दोन पक्षांपर्यंत लांब आखली आहे. त्यामुळे ही आचारसंहिता आता तिन्ही पक्षांकडून अपेक्षित असेल.