-मेघना ढोके, संपादक, लोकमत, सखी डॉट कॉम‘बॉलिंग करा, मार खा, पुन्हा बॉलिंग करा, पुन्हा मार खा आणि स्वत:ला सांगत राहा की तू काही वाईट बॉलर नाही, खेळत राहा!’ - भारताचा यशस्वी तेज गोलंदाज मोहंमद सिराज भर पत्रकार परिषदेत असं मोकळेपणानं बोलला तेव्हा अनेकांचे कान टवकारले असतील. आयपीएल २०२४ च्या या मौसमात प्रत्येकच संघाच्या बॉलर्सना इतका मार बसतो आहे की आता लोक त्यांना हसतात. बॅटर्स जेमतेम ४० चेंडूंत सहज शतक मारून मोकळे होतात. शेवटच्या ओव्हरमध्ये २०-२२ धावा तर सहज करतात. आकडेवारीच्याच भाषेत बोलायचं तर २० षटकांत २५० धावा तर कुठलाही संघ सहज करतो आणि पुढचा संघ तेवढ्याच धावांचा पाठलाग करून जिंकूनही दाखवतो.
आयपीएल २०२४ सुरू झाल्यापासून साधारण हा लेख लिहून होईपर्यंत ३२ सामन्यांत २०० हून अधिक धावा विविध संघांनी सहज केल्या आहेत. आयपीएल २०२२ मध्ये संपूर्ण हंगाम संपेपर्यंत जेमतेम १८ वेळा २०० च्या पुढे धावा गेल्या होत्या. २० षटकांत २००-२५० धावा सहज करणं ही या आयपीएलची एक नवीन नोंद आहे. वरवर पाहता धावांचा हा पाऊस प्रेक्षकांना आनंददायी वाटतो. पण, त्यामुळे सामने थरारक होतात का? पाहताना प्राण कंठाशी येतात का? तर नाही. अजिबातच नाही. क्रिकेट म्हणजे फक्त बॅटिंग, क्रिकेट हा फक्त बॅटर्सचा खेळ आहे असा एक नवाच पायंडा आयपीएल २०२४ पाडत आहे आणि ते घातक आहे. फक्त बॉलर्ससाठीच नाही तर प्रेक्षकांसाठी आणि क्रिकेटसाठी. आणि त्याहूनही वाईट म्हणजे पुढ्यात टी-२० वर्ल्ड कप उभा असताना भारतीय गोलंदाजांच्या मनोवृत्तीसह फॉर्म म्हणूनही ते अत्यंत मारक आहे.
पुन्हा आकडेवारीच्या हिशेबात सांगायचे तर येत्या टी-२० वर्ल्डकपसाठी निवड झालेले अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्या या बॉलर्सची सरासरी आयपीएलमध्ये १० पेक्षा अधिक आहे. बुमराहसारखा बॉलर षटकाला ७ धावा देतो आहे आणि सिराजला तर धरणी फाटून आपल्याला पोटात घेईल का असं वाटावं इतका मार बसतो आहे. अनेकदा त्याची सरासरी १२ च्या पुढे जाते आहे. म्हणून तर मोहंमद सिराज उघडपणे पत्रकार परिषदेत म्हणाला की, ४ षटकांमध्ये पूर्वी एखाद्या बॉलरने ४० धावा दिल्या तर लोकांनाही अजब वाटे. आता त्याचे कुणालाच काही वाटत नाही. ४०/४ हे नवीन नॉर्मल आहे. चांगला बॉल टाकला तरी मार खावा लागतो, कारण आपल्या सगळ्या विकेट्स फ्लॅट आहेत. नवीन बॉलही स्विंग होत नाही. बॉलर फक्त मार खात असतो. मी आजवर जगण्याचे इतके चढ-उतार पाहिले की मी प्रत्येक सामन्यानंतरही स्वत:ला तेच सांगतो, बसला मार. पुढच्या सामन्यात चांगलं खेळ!’
सिराज हे बोलतो तेव्हा त्याच्यावर असा आरोप कुणीही करेल की तूच धड फॉर्ममध्ये नाही, पण वास्तव तसं नाही. अगदी बुमराहही तेच सांगतो की हा टी-२० फॉरमॅट बॉलरसाठी अवघड आहे. विशिष्ट वेळातच बॉलिंग करण्याची मुदत, इम्पॅक्ट प्लेअरसारख्या नियमामुळेही बॉलरला आपला करिश्मा दाखवणच सोपं नाही! आणि हे फक्त भारतीय बॉलर्सचं झालं आहे का? - तर अजिबात नाही. ज्या ऑस्ट्रेलिअन तेज गोलंदाजांसाठी फ्रँचाईजी लिलावात जीव काढत होत्या, जो २४ कोटी रुपये घेत सर्वांत महागडा खेळाडू ठरला, त्याच्या बॉलिंगचं काय झालं? तोच मिशेल स्टार्क सरासरी १२.५ धावा प्रत्येक षटकात मोजतो आहे. अलीकडेच एका सामन्यात त्यानं ४ षटकांत ५३ धावा मोजल्या!.
तात्पर्य हेच की, बॉलर कुणीही घ्या अगदी स्टार्क-कमिन्स ते बुमराह-नरेनपर्यंत. कथा तीच. त्यांनी फक्त मार खायचा आहे. खेळ कुणाचा तर फक्त बॅटर्सचा. प्रेक्षकही लांब लांबपर्यंत मारलेले षटकार पाहून आनंदाने नाचतात. मोठा स्कोअर केला म्हणून खुश होतात. पण, मूलभूत प्रश्न हाच आहे की हे क्रिकेट आहे का?
बॅटर्सही तंत्राबिंत्राचा हात सोडून फक्त मारझोड करतात. खेळातलं तंत्र, त्यातलं साैंदर्य, बॉलर्सचा दबदबा, बॉलची उसळी- जादूई चेंडू या कालबाह्य गोष्टी झाल्या आहेत. एक चित्र तर अगदी स्पष्ट आहे की आयपीएल हा बॅट्समनचा खेळ बनला आहे. जो सर्वांत जलद धावा करेल तोच उत्तम बॅट्समन आणि त्याचंच टेम्परामेण्ट टी-२० साठी उपयुक्त असा नवा पायंडा पाडला जातो आहे. त्याचाच परिणाम म्हणून जलद खेळणारा विराट कोहलीही अन्य खेळाडूंच्या तुलनेत धिम्या गतीने खेळतो, अशी टीका होते आहे. कोहलीसारखा फलंदाज आता या फॉरमॅटच्याच उपयोगाचा नाही इथपर्यंत चर्चा गेली.
कोहलीला त्या चर्चेला शेवटी उत्तर द्यावं लागलं. पण, त्या उत्तरातही कुणाला रस नाही. त्याच्याही तोंडावर अन्य बॅटर्सची आकडेवारी फेकून त्यालाही आता सांगण्यात येतंय की तू इथे कामाचा नाही. या साऱ्यात खेळाची मजा कमी होते आहे याचा विचार कोण करतं? आणि समोर विश्वचषक उभा असताना? एक विश्वचषक भारतीय संघाने नुकताच गमावला आहे आणि आयपीएलमध्ये प्रचंड मार खाल्लेले बॉलर्स घेऊन संघ पुढच्या विश्वचषकासाठी जाणार आहे. त्या विश्वचषकाचं स्वप्न पाहायचं तरी कशाच्या जिवावर?meghana.dhoke@lokmat.com