रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तारीफ करून जगाला एक महत्त्वाचा संदेशच दिलेला आहे!
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन विनाकारण काही बोलत नाहीत, हे सगळे जग जाणते. ते जे बोलतात त्याच्याशी बांधील राहतात. सुज्ञपणे शब्द वापरतात; कारण एखाद्याविषयी आपण वापरलेला एक शब्दसुद्धा किती महत्त्वाचा असतो, हे त्यांना ठाऊक आहे. म्हणून पुतीन यांनी मॉस्कोमधील ‘वालदायी डिस्कशन क्लब’मध्ये नीतीविषयक जाणकारांच्या बैठकीत भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खुलेपणाने तारीफ केली, तेव्हा त्यांचे बोलणे संपूर्ण जगाने कान देऊन ऐकले. त्यांना काय म्हणायचे होते, हे समजून घ्यायला सुरुवात केली. पुतीन म्हणाले, ‘नरेंद्र मोदी जगातील निवडक, दुर्मीळ राजनेत्यांपैकी एक आहेत. अनेक प्रकारची दडपणे येऊनही ते आपल्या देशाचे हित डोळ्यांसमोर ठेवून स्वतंत्र परराष्ट्रनीती आखण्याची क्षमता बाळगतात!’ रशिया-भारताची ऐतिहासिक मैत्री आणि एकमेकांवरचा विश्वास यांचा उल्लेख करून पुतीन म्हणाले, ‘भारतावर आंतरराष्ट्रीय प्रतिबंध लावण्याचे अनेक प्रयत्न झाले; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यातून मार्ग काढत पुढची वाटचाल चालूच ठेवली.
भारताचा भविष्यकाळ सोनेरी आहे!’ भारत अमेरिकेच्या जास्त जवळ जाऊ नये आणि रशियाशी त्याची जवळीक टिकून राहावी, या संदर्भात पुतीन यांचे हे विधान पाहिले पाहिजे. जागतिक सत्ताकारणाच्या नव्या मांडणीत रशिया आणि अमेरिका या दोघांनाही भारताची सारखीच गरज आहे.
माझ्या मते, पुतीन यांच्या या विधानाला राजकारणापलीकडचा अर्थ आहे. अमेरिकेने रशियावर आर्थिक निर्बंध लावून फार काळ झालेला नाही. भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करतो आणि निर्बंधांचा अर्थ असा की, ही खरेदी बंद करावी. अन्य एखादा देश अमेरिकेच्या दबावापुढे नरमला असता; परंतु भारताने रशियाकडून तेल खरेदी चालू ठेवली. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी आकडे समोर ठेवून सांगितले की, रशियाकडून युरोप एका दिवसात जेवढे तेल खरेदी करतो, तेवढे तर भारत एका महिन्यामध्ये घेतो !
‘एस ४००’ या क्षेपणास्त्र प्रणालीची खरेदीही भारताने बिनधास्तपणे केली. अर्थात, भारताने अमेरिकेचे ऐकले नाही आणि दुसरीकडे, रशियाच्या नाराजीची पर्वा न करता अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपानबरोबर ‘क्वाड’मध्ये (क्वाड्रीलॅटरल सिक्युरिटी डायलॉग) भारत सामील झाला. तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केला तेव्हा रशियाच्या सुरक्षा परिषदेचे सचिव निकोलाई पेत्रुसेव आणि अमेरिकन गुप्तहेर संस्था ‘सीआयए’चे प्रमुख विल्यम बर्न्स यांना चर्चेसाठी दिल्लीमध्ये यावे लागले, हे जगाने पाहिले आहे.
रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्याच्या बाबतीतही भारताने आपला दृष्टिकोन अत्यंत स्पष्टपणे मांडला. डोळे झाकून रशियाची साथ केली नाही. त्याचबरोबर युरोप किंवा अमेरिकेच्या पारड्यातही भारताने आपले वजन टाकले नाही.
गरज पडली तेव्हा पुतीन यांच्या नजरेला नजर भिडवून मोदींनी ‘ही वेळ युद्धाची नाही,’ हेही ठणकावले. एका बाजूने भारताने इस्रायलशी असलेले संबंध घट्ट केले आणि दुसरीकडे अरब देशांशीही मैत्री वाढवली. अरब देशांमध्ये आता पाकिस्तानची नव्हे, तर भारताची दखल घेतली जाते. भारताचा दबदबा सगळ्या जगात वाढतो आहे. हा दबदबा वाढविण्यात पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मोठे योगदान आहे, यात शंका नाही. पंतप्रधानांच्या खांद्याला खांदा भिडवून परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर काम करीत आहेत.
पुतीन यांच्या आधी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनीही मोदींची स्तुती केली होती. बराक ओबामा यांनी तर ‘टाइम’ मॅगझिनमध्ये मोदींवर एक लेख लिहिला होता. जगातील सर्वांत प्रभावशाली लोकांची यादी ‘टाइम’ नियतकालिक प्रसिद्ध करीत असते. या यादीत पाचवेळा मोदींचा समावेश झालेला आहे. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर मोदी यांचे नाव भारताच्या तीन प्रभावशाली नेत्यांमध्ये घेतले जाते आहे. जवाहरलाल नेहरू यांनी स्वातंत्र्यानंतर अत्यंत कठीण परिस्थिती असताना भारताला कुठल्याही गटात सामील होण्यापासून वाचविले आणि विकासाचा नवा अध्याय लिहिला. इंदिरा गांधी यांनी भारताच्या दृढतेचा परिचय सगळ्या जगाला करून दिला. आता मोदीजींनी भारताची ताकद संपूर्ण जगात एका नव्या टप्प्यावर पोहोचवली आहे.
नेहरूंनी त्यांच्या काळात जगभरातील नेत्यांना आपल्याकडे आकर्षित केले होते. ते त्यांची गळामिठी घेत. खांद्यावर हात ठेवत. केवळ नेहरू आणि जॉन एफ. केनेडी या दोघांनीच ब्रिटनच्या महाराणीसमोर मस्तक न झुकवता हस्तांदोलन केले. नेहरूंच्या वेळी भारताकडे नैतिक आणि वैचारिक ताकद होती आणि आज मोदींच्या काळात नैतिक आणि वैचारिक ताकदीबरोबरच आर्थिक ताकदही जोडली गेली आहे. मोदी या ताकदीचे प्रदर्शन करण्याच्या कलेत प्रसिद्ध आहेत.
आज प्रत्येकच नेता मोदींना भेटण्याची इच्छा बाळगतो. मग ते बराक ओबामा असोत, जिनपिंग किंवा अन्य कोणी ! मोदी यांनी जगातील सामर्थ्यशील नेत्यांशी बरोबरीच्या पातळीवर संवाद साधला आहे. जगभरातील नेते मोदीजींची तारीफ करतात, त्यात ना आश्चर्य आहे, ना अतिशयोक्ती! महाशक्ती होण्याच्या शर्यतीत भारत सामील झाला आहे. सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा....!