प्रिय २०१८सप्रेम नमस्कार. मुंबईत हॉटेलच्या आगीमुळे तुझे स्वागत थंडे झाले. पण तू वाईट वाटून घेऊ नकोस. अशा गोेष्टींची तुला सवय नसेल पण आम्हाला आहे. अरे, रोजच काहीतरी घडतंच आमच्याकडे. नाही घडलं तर नवल...! जाऊदे. हे महत्त्वाचं नाही. तू येणार म्हणून कामांची यादी करून ठेवलीय आम्ही. तू आहेस तोपर्यंत ही सगळी कामं तुला करायची आहेत. तेव्हा वेळ वाया घालवू नकोस.पहिलेच काम अत्यंत तातडीचे. आमच्या नारायणरावांचा काय तो सोक्षमोक्ष लावून टाक. तुझ्या भावाने, म्हणजे २०१७ ने; फाट्यावर मारले. करतो, करतो नावाचे चॉकलेट देत गेला. केलं काहीच नाही. अगदी शेवटच्या आठवड्यात करतो असंही म्हणाला पण न करताच निघून गेला. आता तूही टाळाटाळ केलीस तर त्यांना कोकणात तोंड दाखवायला जागा राहणार नाही. तुझा वर्षभराचा मुक्काम चांगला जावा म्हणून आंगणेवाडीच्या देवीला हिरे, मोती सोन्याच्या दागिन्यांनी मढवून टाकतील ते... आणि हो, त्या केसरकरांवर करणी करता येते का बघ. तेही कुणाला तरी विचारत होते म्हणे...दुसरं काम, जळगावच्या नाथाभाऊंचे. आताचे सत्ताधारी विरोधात असताना ज्या माणसाने पक्ष सांभाळला. सगळ्यांचा सगळा खर्च भागवला. तेव्हा नाही कुणाला त्यात चुकीचं वाटलं. पण आता खड्यासारखा बाजूला केलाय त्यांना. मोपलवारांचा चौकशी अहवाल येतो, सुभाष देसाई, प्रकाश मेहता चौकशी चालू असतानाही मंत्री म्हणून काम करतात मग नाथाभाऊंनीच तुझ्या भावाचं काय वाईट केलं कोणास ठावूक? तू तरी त्यांच्यासाठी काही करता येते का पाहा. तुला सद्बुध्दी सुचावी म्हणून ते मुक्ताईच्या मंदिराला सोन्याचा कळस बनवायला मागे पुढे पाहणार नाहीत... तेवढे दिलदार आहेत.तिसरं काम सुनील तटकरे आणि अजित पवारांचे. गप्पा मारताना जरी एरिगेशनचा विषय निघाला तरी या दोघांवर गुन्हे दाखल झाले का? असे विचारतात लोक. नागपुरात राष्टÑवादीने मोर्चा काढला तर त्याच दिवशी एरिगेशनवरून गुन्हे दाखल झाल्याची चर्चा सुरू झाली. या भानगडीचा तू तरी काय तो सोक्षमोक्ष लावून टाक बाबा... तटकरे तुझ्यासाठी राधाकृष्णाच्या मंदिराला रुप्याचे तोरण बांधतील... अजित पवार मात्र काही तुझ्यासाठी कोण्या देवाला काही देण्याच्या भानगडीत नाही पडणार... ‘एकदाच सांगून टाकतो... कुणाला काय बोलायच्चं ते बोल्लू दे... तसलं काय जमण्णार नाही...’ असं ठसक्यात सांगून मोकळे होतील ते. तरी पण त्यांच्या बाबतीत तुला काही करता येतं का पाहा. हल्ली त्यांचा मुलगा पार्थ पण लोकांना बोलावून घेत असतो म्हणे... चर्चा आहे तशी लोकांमध्ये... पण तू वाट्टेल तो अर्थ काढू नकोस...कामं सांगायला बोलावत नाही तो. अरे, महाराष्टÑ समजून घ्यायला बोलावतो म्हणे. तरुण पिढी आली पाहिजे ना राजकारणात. तेव्हा त्याचाही विचार कर, तू आहेस तोपर्यंत... यादी बरीच मोठी आहे. पण तुझ्या भावाने, २०१७ ने प्रसाद लाडांना खूप काही दिलं. तू पण तसंच वाग. आमच्या मुख्यमंत्र्यांची त्यांच्यावर विशेष मर्जी आहे हे विसरू नकोस. तेव्हा कोणतेही नवीन काम निघाले की त्यांचा विचार आधी कर... बाकीची कामं खासगीत सांगेन. तसाही वर्षभर आहेसच तू, तेव्हा बोलू निवांत...
हे नववर्षा, राणे, खडसेंचे काय?
By अतुल कुलकर्णी | Published: January 03, 2018 12:14 AM