देशभक्ती ही प्रदर्शन करण्याची बाब खचितच नाही. आपला देश आणि मातृभूमीबद्दलचे प्रेम, अभिमान या गोष्टी मनात सदैव चिरंजीव ठेवून कायम कृतज्ञ राहणे आणि देशाच्या ऐक्यासाठी आपापल्यापरीने खारीचा वाटा उचलणे हेच प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य असते. शेजारील शत्रू राष्ट्राला शिव्या घालून त्यातून आपणच खरे देशभक्त आहोत असा अर्थ काढणे चुकीचे आहे. देशाच्या स्वातंत्र्याच्या होमकुंडात ज्यांनी आपल्या सर्वस्वाची आहुती दिली, त्यांनी कधीच आपल्या देशभक्तीचा टेंभा मिरवला नव्हता. परंतु आता देशभक्तीची व्याख्या जो तो आपल्या सोयीने बदलू पाहत आहे. रविवारी झालेल्या चॅम्पियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातील अंतिम सामन्याच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांनी वादग्रस्त टिष्ट्वटस् करून ‘देशभक्ती’चे प्रदर्शन केले आहे. ‘तुम्ही अंतिम फेरीत पोहचलात, अभिनंदन. आमच्या निळ्या रंगात तुम्हाला रंगताना पाहताना आनंद होत आहे. आता निळे-पिवळे होण्यासाठी तयार राहा. आम्ही तुम्हाला पूर्ण निळे करून टाकू’...‘चला जाऊ द्या. तुम्ही जिंका, हजार वेळा जिंका फक्त दहशतवाद बंद करा. मला हार मान्य आहे. आम्हाला शांतता व प्रेम हवे आहे.’..‘तुम्हाला १८ ला कळेलच. त्यादिवशी फादर्स डे आहे. तुमच्याशी बाप खेळणार आहे.’ - वास्तविक क्रिकेट हा एक खेळ आहे आणि त्याकडे खिलाडूवृत्तीनेच पाहायला हवे. परंतु ऋषी कपूर यांचे टिष्ट्वटस् पाहिल्यावर कोठेतरी गल्लत होताना दिसत आहे. पाकिस्तानकडून दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत, ही गोष्ट काही आता लपून राहिलेली नाही. अमेरिकेतील ९/११ चा हल्ला आणि मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याने यास पुष्टी मिळालेली आहे. परंतु भारतीय संघासोबत क्रिकेट खेळणारे अतिरेकी नव्हेत, तर ते खेळाडू आहेत ही गोष्ट लक्षात घ्याला हवी. समोरचा कोणत्याही प्रतिस्पर्धी संघाशी चिवटपणे आणि जिद्दीने सामना करावाच, पण तो खिलाडूवृत्तीने. भारतीय खेळाडूदेखील पाकिस्तान असो की कोणताही संघ असो प्रत्येक वेळी खिलाडूवृत्तीचेच दर्शन घडवीत आले आहेत. असे नसते तर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने लंडनमधील एका हॉटेलमध्ये पाकिस्तानी कर्णधार सर्फराझच्या मुलाला कडेवर उचलून घेतलेच नसते. वारंवार अतिरेकी कारवाया करणाऱ्या पाकिस्तानबद्दल राग, द्वेष आणि चीड प्रत्येक भारतीयाच्या मनात असायलाच हवी व ती स्वाभाविकही; पण खेळ खेळताना ती आड येऊ नये, हे ऋषी कपूरसारख्या ज्येष्ठ अभिनेत्याला कोण समजावणार?
ही कसली देशभक्ती?
By admin | Published: June 19, 2017 12:57 AM