सरकारच शत्रू असेल तर?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 06:07 AM2018-11-01T06:07:18+5:302018-11-01T06:09:19+5:30

जगाच्या सर्व भागात धर्मांधता वाढीला लागली असताना अनेक प्रमुख देशांचे राज्यकर्ते एकतर तिला प्रोत्साहन देत आहेत किंवा तिच्याकडे कानाडोळा करीत आहेत

what people should do when the government is disturbing the communal harmony | सरकारच शत्रू असेल तर?

सरकारच शत्रू असेल तर?

Next

खुनी माणूस काही खून पाडतो. पण त्याला पाठबळ द्यायला सरकारच जेव्हा अधिकउण्या शक्तिनिशी पुढे होते तेव्हा नागरिकांनी काय करायचे असते? हा प्रकार अमेरिकेत घडला म्हणून नव्हेतर, तो प्रातिनिधिक आहे म्हणून चिंताजनक आहे.

जगाच्या सर्व भागात धर्मांधता वाढीला लागली असताना अनेक प्रमुख देशांचे राज्यकर्ते एकतर तिला प्रोत्साहन देत आहेत किंवा तिच्याकडे कानाडोळा करीत आहेत. धर्मांधतेने बेघर केलेल्या लोकांची संख्या एकट्या दक्षिण-मध्य आशियात दोन कोटींच्या आसपास आहे. त्यातच ज्यू आणि पॅलेस्टिनींची लढाई अनेक दशके चालूनही अद्याप संपलेली नाही. म्यानमारमधील बौद्धांना रोहिंगे चालत नाहीत. श्रीलंकेतील सिंहली बुद्धांना हिंदू-तामीळ नको असतात. अफगाणिस्तान ते सिरिया यातील कडव्या मुसलमानांना उदारमतवादी मुसलमानांएवढेच अन्य धर्माचे लोक मारायचे असतात. अमेरिकेसारख्या देशाला त्यांच्या गौरकाय लोकांखेरीज इतरांना जमेल तेवढे देशाबाहेर काढायचे असते. त्यांना ज्यू मारायचे असतात आणि ख्रिश्चन व ज्यू या दोन धर्मांतला अगदी चौथ्या शतकात सुरू झालेला संघर्ष अजूनही चालू ठेवायचा असतो. ख्रिश्चन आणि मुसलमान यांच्यातील युद्धांना सातशे वर्षांचा इतिहास आहे. भारतातला त्यांचा दुरावाही अद्याप जुना व मुरलेला आहे. ‘हा देश म्हणजे आम्ही आणि आम्ही फक्त’ अशी मानसिकता असणाऱ्या उठवळ धर्मांधांनी साºया जगाला वेठीला धरले असल्याचे सांगणारा हा प्रकार आहे. अमेरिकेतील ज्यू धर्माच्या एका पूजास्थानावर बेधुंद गोळीबार करून त्यात ११ जणांचे बळी घेण्याची तेथील गौरवर्णीय राष्ट्रवाद्याची भूमिका सध्या तेथे गाजत आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतरही ‘मला सारे ज्यू नाहिसे करायचे आहेत,’ असे तो मनोरुग्ण गुन्हेगार म्हणाला आहे. मात्र अमेरिकेतील सामान्य नागरिकांचा राग त्याच्याहूनही अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अधिक आहे. या हिंसाचाराचा करावा तेवढा तीव्र निषेध त्यांनी केला नाही. उलट हिंसाचार दोन्ही बाजूंनी होतो असे सांगून त्यांनी त्याची तीव्रता कमी करण्याचाच प्रयत्न केला हा लोकांचा संताप आहे. भारतातील ओडिशा, बिहार, गुजरात व उत्तर प्रदेश ही राज्ये धार्मिक हिंसाचाराच्या घटनांची साक्षीदार आहेत. चर्चेस जाळली जातात, मशिदी पाडल्या जातात, गुरुद्वारे उद्ध्वस्त होतात, पुतळ्यांची विटंबना होते आणि हे सारे एखाद्या विशिष्ट धर्माच्या वा वर्गाच्या लोकांना डिवचण्यासाठी असते. असे डिवचणे सत्तारूढ पक्षाला मते मिळवून देणार असेल तर तो पक्ष त्याकडे दुर्लक्ष करतो किंवा त्याला प्रोत्साहनही देतो. हा प्रकार केवळ धर्माबाबत व जातीबाबतच होतो असे नाही. तो स्त्रियांबद्दलही होतो. त्यामुळे व्यक्तिगत हिंसाचाराहून धार्मिक व राजकीय हिंसाचार अधिक भयावह होतो व आज सारे जग या हिंसाचाराच्या भीतीच्या छायेत राहणारे आहे. आपण वा आपल्या श्रद्धा सुरक्षित नाहीत ही बाब समाजातले भय वाढविणारी, माणसामाणसांत दुही उत्पन्न करणारी व समाजाची शकले करणारी आहे. पण अनेक राज्यकर्त्यांना व राजकीय पक्षांना ते त्यांच्या राजकीय वापराचे साधन वाटत असल्याने ते हा प्रकार चालू देतात व त्याला बळकटीही देतात. अशावेळी सरकारच अन्याय करीत असेल तर मग लोकांनी न्याय कुणाकडे मागायचा? डोनाल्ड ट्रम्पच ज्यूंच्या हिंसाचाराला बळ देत असतील तर अमेरिकेत काही शतके राहिलेल्या ज्यूंनी कुठे जायचे? श्रीलंकेतील सरकारच तामिळांना व म्यानमारचे सरकार रोहिंग्यांना मारत असेल तर त्या अल्पसंख्यकांनी कुणाचे संरक्षण मागायचे? आणि भारतातले महंत वा राज्यकर्ते अल्पसंख्यकांवर अत्याचार व अन्याय लादत असतील तर त्यांनी कुणाचा आश्रय घ्यायचा? धर्मांधतेला आळा घालायचा आणि सामान्य माणसाला स्वस्थ जीवन जगू द्यायचे तर समाजातील लोकमानसच त्यासाठी उभे करावे लागते. हे लोकमानस लोकशाही व मूलभूत अधिकार यांना मान्यता देणारे असावे लागते. मात्र ज्या समाजातील लोकमानसावरच धर्मांधतेचा, जात्यंधतेचा प्रभाव मोठा असतो त्या समाजातील दुबळ्या वर्गांना मग न्याय तरी कुणी द्यायचा? सारे जग सध्या या विवंचनेने ग्रासले व भ्यालेले आहे. भयमुक्तीशिवाय विकास नाही आणि स्वातंत्र्यही नाही. या मूल्यांच्या जपणुकीसाठी लोकशाहीचा विचार नव्याने जागविणे व तो साºया जगाला करायला लावणे आता गरजेचे झाले आहे.
 

Web Title: what people should do when the government is disturbing the communal harmony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.