- राजू नायक
दरवर्षी नाताळ ते नववर्ष या काळात गोव्यात पर्यटकांची विलक्षण गर्दी उडायची; परंतु यावर्षी देशी तसेच विदेशी पर्यटकांनी गोव्याकडे पाठ फिरविल्याची चर्चा चालू आहे. एक हॉटेल चालक म्हणाला, या काळात हॉटेल्स व किना-यांवरचे शॅक्स यात बसायला जागा नसायची. परंतु, यंदा पर्यटकांची संख्या बरीच रोडावली आहे. ट्रॅव्हल एजंटही डोक्याला हात लावून बसले आहेत. डॉमनिक डिसा या व्यावसायिकाच्या मते, गेल्या पाच वर्षाच्या तुलनेने यंदा पर्यटकांमध्ये खूपच घट झाली आहे. विदेशी पर्यटक खूपच कमी झालेत, इतकेच नव्हे तर देशी पर्यटकांचीही संख्या घटली. ट्रॅव्हल एजंटांच्या मते, यावर्षी पर्यटकांच्या संख्येत एकूण ४० टक्क्यांनी घट झाली आहे. यावर्षी रशियन चार्टर विमानांमध्ये ५५ टक्के व ब्रिटिश चार्टरमध्ये ३५ टक्के घट झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
पर्यटकांच्या संख्येत घट होण्याची कारणो समाजमाध्यमांमध्ये चर्चिली जात असून हमरस्त्यांची मोठय़ा प्रमाणात होत असलेली बांधकामे व त्यामुळे रस्त्यांवर वाहतुकीची होणारी प्रचंड कोंडी, त्याशिवाय हॉटेल्स व खानपानगृहांनी वाढविलेले दर हीसुद्धा पर्यटकांनी पाठ फिरविण्याची कारणे असल्याचे सांगण्यात येते. एक गोष्ट खरी आहेय की गेले सहा महिने दक्षिण व उत्तर गोव्याला जोडणा-या हमरस्त्यांवर पुलांची कामे सुरू असून वाहतुकीचा प्रचंड खोळंबा होतोय. कधी कधी पणजीहून दाबोळी विमानतळावर जायला दोन तासांपेक्षा जादा अवधी लागतो. त्यामुळे जे नियमित पर्यटक आहेत, त्यांनी गोव्यात येण्याचे टाळले. मुंबईतील काही प्रवाशांनी लिहिले आहे की यंदा त्यांनी गोव्यात येण्याचे टाळून अलिबागला जाणे पसंत केले. आणखी काही जण मानतात की ‘सनबर्न’सारखे महोत्सव गोव्यात आता भरत नाहीत. हे महोत्सव गोव्याचे एक आकर्षण होते. परंतु, त्यांनी अन्यत्र महोत्सव नेले व गोव्याचे आकर्षण कमी झाले. अशा महोत्सवात अमली पदार्थ मिळत व त्यांनी गोव्याचे करही थकविले, त्यामुळे राज्य सरकारने त्यांच्या आयोजनास आडकाठी आणली.
ही कारणे महत्त्वाची आहेतच; परंतु गोवा काही आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळांपेक्षाही महागडा बनत असल्याच्या वाढत्या तक्रारी असून टॅक्सी चालकांची लूटमार, व्यावसायिकांनी सरकारला वेठीस धरण्याचे चालविलेले प्रकार यामुळे पर्यटकांना सतावणुकीला तोंड द्यावे लागते. तज्ज्ञ म्हणतात की केवळ इलेक्ट्रॉनिक महोत्सव होत नाहीत म्हणून पर्यटक अन्य ठिकाणी निघून जातात यात तथ्य नाही. महत्त्वाचे कारण आहेय ते गोवा महागडा बनतोय. हॉटेलांवर बसविलेले जादा कर, टॅक्सीचालकांची अरेरावी व येथे ओला-उबेरसारख्या टॅक्सींना होत असलेला विरोध ही महत्त्वाची कारणे आहेत. गोवा पर्यटन संघटनेच्या मते, देशी पर्यटकांना २८ टक्के जीएसटीचा फटका बसतो. त्यात विमान सेवांचे दर वाढलेले आहेत. विमानतळानेही हाताळणी शुल्क वाढविले आहे.
या परिस्थितीवर राज्य सरकारनेही गंभीर चिंता व्यक्त केली आहे. हॉटेलांनी दर अव्वाच्या सव्वा वाढविले आहेत का, याची आम्ही तपासणी करू असे पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी जाहीर करून असे दर वाढविले असतील तर हॉटेलांवर आम्ही कारवाई करू, असेही त्यांनी म्हटले आहे. हॉटेलांच्या खोल्यांचे दरही नियंत्रित करण्यावर उपाय योजण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे.
आणखी एक महत्त्वाचे कारण पर्यटक घटण्याचे आहेय ते राज्याने किनारी पर्यटनावर दिलेला भर. गोव्याला पर्यटक पुन्हा पुन्हा यावेत असे वाटत असेल तर त्यांनी पर्यटकांना वेगवेगळी स्थळे दाखवायला हवीत. ग्रामीण गोव्याचे दर्शन त्यांना होत नाही. दुर्दैवाने गोव्याला आपल्या पर्यटनाची नवी वैशिष्टय़े तयार करता आलेली नाहीत. तज्ज्ञ मानतात की किना-याशिवाय येथे दुसरे काही दाखविण्यासारखे नसेल तर अवकळा आलेल्या काही पर्यटन केंद्रांची अवस्था गोव्याला प्राप्त होईल. दुर्दैवाने अभिनव, नावीन्यपूर्ण, कल्पक अशा उपायांची कास धरणे गोव्याला अद्याप शक्य झालेले नाही!
(लेखक गोवा आवृत्तीचे संपादक आहेत. )