रुपया मातीमोल झाला आणि तेलाचे भाव आकाशाला भिडले. अनेक धनवंत हजारो कोटींचा पैसा लंपास करून, हा देश सोडून पळाले आहेत आणि देशाचे अर्थमंत्री मात्र राहुल गांधींना शिवीगाळ करून आपला टीकेचा सूर बदलू पाहात आहेत. अरुण जेटली हे पंजाबच्या अमृतसर मतदारसंघात सपशेल आपटी खाल्लेले व केवळ मोदीकृपेने केंद्रात अर्थमंत्र्याच्या पदावर बसलेले गृहस्थ, राहुल गांधींना ‘विदूषक’ किंवा ‘विदूषकांचा राजपुत्र’ म्हणत असतील, तर तसे म्हणण्याएवढी त्यांची राजकीय औकात नाही आणि देशाला अर्थक्षेत्रातील प्रत्येक आघाडीवर अपयशी करणाऱ्या या माणसाचा तो अधिकारही नाही. राफेल विमानांच्या सौद्यात प्रचंड घोटाळा झाला असल्याचे व त्यात अनिल अंबानी या अपयशी उद्योगपतीला चाळीस हजार कोटींचा फायदा करून देण्याचे मोदी सरकारचे कृत्य, थेट फ्रान्सच्या सरकारनीच उघड केल्यानंतर, राहुल गांधींनी मोदींचे सरकार देशाचे चौकीदार नसून भागीदार आहेत आणि त्या भागीदारीत आता अंबानीही सामील आहेत, असे म्हटले. त्या प्रकरणाची दखल सर्वोच्च न्यायालयानेही आता घेतली आहे. तरीही त्या आरोपाला सरळ उत्तर देण्याऐवजी अरुण जेटली राहुल गांधींवर नुसतीच चिखलफेक करीत असतील, तर त्यांच्याजवळ या आरोपाचे उत्तर नाही, असेच म्हटले पाहिजे. जरा आक्रमक पवित्रा घेतला की, विरोधक थंड होतात, हा राजकारणाचा अनुभव आहे, पण जेटलींजवळ आक्रमक होता येण्याएवढा जनाधार नाही आणि ते ज्या सरकारात मंत्री आहेत, त्यातील कोणताही मंत्री, खुद्द पंतप्रधानांसह त्याविषयी बोलताना दिसत नाहीत. तरीही जेटलींचे बोलणे सुरू राहते, याचे कारण आर्थिक आघाडीवर त्यांना येत असलेले देशबुडवे अपयश हे आहे. रुपया मातीमोल झाला आणि तेलाचे भाव आकाशाला भिडले. महागाई थांबत नाही आणि रोजगार उपलब्ध होत नाहीत. देशातील अनेक धनवंत हजारो कोटींचा पैसा लंपास करून, हा देश सोडून पळाले आहेत आणि देशाचे अर्थमंत्री मात्र राहुल गांधींना शिवीगाळ करून आपला टीकेचा सूर बदलत आहेत. त्यांचे दुर्दैव हे की, त्यांच्या मंत्रालयाजवळ देशाला सांगण्यासारखे काही राहिले नाही. त्यांना महागाईविषयी बोलता येत नाही, रुपया राखता येत नाही, बँका तारता येत नाही आणि सरकारची आर्थिक घसरणही थांबविता येत नाही. अडचण ही आहे की, मोदी विरोधकांना उत्तरे देत नाहीत आणि बाकीच्या मंत्र्यांचे कुणी ऐकून घेत नाहीत. एके काळी सुषमा स्वराज बोलायच्या, पण आता त्यांचा आवाज गेला आहे. निर्मला सीतारामन राफेलमध्ये अडकल्या आहेत. राजनाथ सिंगांना माध्यमात भाव नाही आणि अमित शहा काय बोलतील, याचा आगाऊ अंदाज साºयांनाच आला आहे. मग ती जबाबदारी आपली आहे, असे वाटून जेटली बोलतात, पण त्यांच्याजवळ विधायक असे काही नसते. मग ते विदूषकी आरोप करून विरोधकांना उत्तरे देताना दिसतात. मात्र, हे किती काळ कोण ऐकून घेईल आणि ऐकले, तरी त्यावर विश्वास कोण ठेवील. ते संबित पात्रा बिचारे उत्तरे देण्याची शर्थ करतात, पण मुळातच उत्तर नसेल, तर त्यांचे तरी कसे निभावणार. मग बाकीचे नुसत्याच गमती करतात. ‘अलाहाबाद’चे ‘प्रयागराज’ करतात. उद्या ‘हैदराबाद’चे ‘भागानगरी’ केले जाईल. पण हा सारा लोकांचे लक्ष अन्यत्र वळविण्याचा बालिश प्रकार आहे. म्हणून जेटली अद्वातद्वा बोलतात. बँका बुडाल्याच्या बातम्यांहून त्यात थोड्यांना पकडले, त्यांच्या बातम्यांना महत्त्व देतात. मग एम. जे. अकबर प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतो. महिलांनी आक्रमक भूमिका घेतली की, मग मात्र आम्ही त्यापासून नामानिराळे आहोत, असे म्हटले जाते. मात्र, यातला खरा प्रश्न ज्या राहुल गांधींची आजवर ‘पप्पू’ म्हणून ज्या लोकांनी टिंगल केली, त्याची एवढी गंभीर दखल घेण्याची गरज या लोकांना तेव्हापासून वाटू लागली हा आहे. त्यांना गुजरातेत अपेक्षेहून मोठे यश मिळाले. शिलाँगचे बहुमत मिळाले. कर्नाटकात सरकार आणता आले आणि आता ते राजस्थानसह मध्य प्रदेश व छत्तीसगडही जिंकतील, असा अंदाज सर्वेक्षणांनी उघड केला आहे. जेटलींसह अनेकांना झालेला हा साक्षात्कार असे बोलायला लावीत असेल काय की, आता बोलण्याजोगे काही असेल, तर ते राहुल गांधींकडेच आहे आणि आपल्याजवळ त्यांना द्यायला उत्तरेही नाहीत, म्हणून हे बरळणे असे? काही का असेना, पण जेटलींसारख्या ज्येष्ठ वकिलाला व देशाच्या अर्थमंत्र्याला एवढ्या खालच्या पातळीवर येऊन बोलणे शोभत नाही, हे मात्र त्यांना सांगितलेच पाहिजे.
राहुल गांधींवर टीका करण्याशिवाय जेटलींनी काय करायचे?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2018 3:35 AM