अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या या ज्येष्ठ नेत्याच्या नेतृत्वाची ही अविश्वासार्हता वेदना देणारी आहे.शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल सर्वच राजकीय पक्षांत आदर आहे. गडकरी-फडणवीसांपासून तर राज-उद्धवपर्यंत सारेच नेते सणा-समारंभात तसा आदरही व्यक्त करीत असतात. परंतु पवारांच्या राजकारणाचा विषय आला की ही मंडळी सावध होतात. काँग्रेस नेत्यांना तर पवारांबद्दल वाटणाºया शंका-कुशंकांचा इतिहास तसा जुना आहे. गांधी घराण्याला ही गोष्ट वारशातून मिळालेली आहे. त्यामुळे पवारांबद्दल इंदिरा गांधी जेवढ्या साशंक राहायच्या तेवढेच राहुल गांधीसुद्धा असतात. त्यातूनच अन्य काँग्रेस नेत्यांना असलेले पवारांचे वावडे हे त्यांच्या राजकीय संस्काराचे अभिन्न अंग बनले आहे. हे संस्कारही पिढ्यान्पिढ्या सुरू असतात, अगदी शंकरराव चव्हांणापासून ते अशोक चव्हाणांपर्यंत.हा विषय इथे पुन्हा आठवण्याचे कारण म्हणजे, येत्या १२ डिसेंबरला विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात आयोजित केलेला काँग्रेस आणि राष्टÑवादी काँग्रेसचा संयुक्त मोर्चा. या मोर्चाचे नेतृत्व एकट्या पवारांकडे राहू नये म्हणून सध्या काँग्रेस नेत्यांचे प्रयत्न सुरूआहेत. त्यासाठी त्यांनी ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना पुढे केले आहे. या मोर्चाच्या माध्यमातून पवार आपल्या पक्षाची ताकद वाढवतील व ती भविष्यात आपल्यालाच नामोहरम करण्यासाठी वापरली जाईल, ही काँग्रेस नेत्यांना असलेली भीती पूर्वेतिहास बघता अनाठायी नाही पण अमृतमहोत्सवी वर्ष साजरे करीत असलेल्या या ज्येष्ठ नेत्याच्या नेतृत्वाची ही अविश्वासार्हता त्याच्या चाहत्यांना वेदना देणारी आहे. पवारांबद्दल आदर आहे, पण विश्वास नाही. त्यांचे बोट धरावेसे वाटते पण ते कुठे नेतील याचा नेम नाही, या व अशा अनेक संभ्रमांमुळेच त्यांचे नेतृत्व सर्वमान्य, देशव्यापी होऊ शकलेले नाही. कधीकाळी वैचारिक निष्ठेपोटी आपले राजकीय आयुष्य पणास लावणारे पवार अलीकडच्या काळात भाजपाला मदत करतानाही या देशाने बघितले आहे. केंद्रात भाजपाचे सरकार आल्यानंतर पवार सुरुवातीच्या काळात मोदींच्या प्रेमात आकंठ बुडालेले असतात. त्याच काळात त्यांच्या मनात राहुल गांधींच्या नेतृत्वाबद्दल असंख्य प्रश्न निर्माण होतात. पण नंतर ते मोदींवर टीका करतात आणि राहुल त्यांना अचानक परिपक्वही वाटू लागतात. मध्येच ते मुख्यमंत्री फडणवीसांच्या जातीला टोचून बोलतात, त्यांना ‘बालिश’ ठरवतात. मनात प्रश्न येतो, ‘सुसंस्कृत मूल्ये कटाक्षाने पाळणारे पवार असे विखारी का वागतात’?पवारांनंतर त्यांच्या पक्षाचे काय? त्यांचा वारसदार कोण? हे दोन प्रश्न राजकीय क्षेत्रात जसे चर्चिले जातात तसेच ते पवारांनाही अस्वस्थ करीत असतात. अजूनही ते आपला उत्तराधिकारी ठरवू शकलेले नाहीत. दुसºया फळीचे नेतृत्व नाही, ज्यांच्याकडून आशा होत्या त्यातील काही जण तुरुंगात तर काही त्याच वाटेने आणि उर्वरित भाजपाच्या वाटेवर... अशा वातावरणात पक्षाचे अस्तित्व दाखविण्यासाठी पवारांना असे डावपेच खेळावे लागतात. आपल्याला ते राजकारण वाटते. पण खरे तर ते त्यांच्या मनातील द्वंद्व आहे. मुलांच्या भवितव्याची चिंता असली की बापाच्या मनात असे द्वंद्व निर्माण होत असते. या जाणत्या राजाच्या वर्तमान धरसोडीकडे काँग्रेस नेत्यांनी याच करुणेतून बघितले तर विधिमंडळ अधिवेशनातील मोर्चाच्या नेतृत्वाचा वाद मग शिल्लकच राहात नाही.
पवारांच्या नेतृत्वाबद्दल ही अविश्वासार्हता का?
By गजानन जानभोर | Published: December 05, 2017 6:36 AM