हेवेदावे आणि विद्वेषाने काय साधेल?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2020 07:54 AM2020-10-24T07:54:07+5:302020-10-24T08:01:44+5:30
पक्षाच्या गाडीतून एक रामराव उतरले, तर दोन शामराव चढतात; राजकीय संस्कृतीचा आणखी किती चुथडा करणार?
यदू जोशी, वरिष्ठ सहाय्यक संपादक, लोकमत
एकनाथ खडसे शुक्रवारी वाजतगाजत राष्ट्रवादीत गेले. पाहुण्याच्या काठीने साप मारण्याची संधी राष्ट्रवादीला मिळाली. आता खडसे रोज देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करतील. ‘योग्यवेळी बोलेन’ असे म्हणत फडणवीस शांत राहतील. प्रत्येक आरोपाचं उत्तर देत बसणार नाहीत, कारण तो फडणवीसांचा स्वभाव नाही. एखाद दिवशी एक घाव दोन तुकडे करतील. खडसे पक्षात राहून फडणवीसांवर आरोप करायचे; त्याच्या मोठ्या बातम्या व्हायच्या; पण आता राष्ट्रवादीत बसून ते आरोप करतील तेव्हा धार हळूहळू बोथट होत जाईल. ‘तुमचाच माणूस तुमच्या अंगावर घातला’ हा आनंद मात्र राष्ट्रवादीला मिळेल.
भाजपकडून राजकीय पुनर्वसनाचा कोणताही शब्द मिळत नसल्याच्या अस्वस्थतेतून खडसे राष्ट्रवादीत गेले. फडणवीस-चंद्रकांत पाटील यांनी दिल्लीला विचारणा केली की खडसेंना काय शब्द द्यायचा?- दिल्लीहून निरोप आला की आतापर्यंत त्यांना खूप काही दिले, आता काहीही देण्याची गरज नाही. तिथेच भाजपमधील खडसेंचा विषय संपला. खा.रक्षा खडसे हुशार आहेत. त्या सासरेबुवांबरोबर गेल्या नाहीत. उद्या त्या खडसेंपेक्षा स्वत:ची रेषा मोठी करतील. खडसे सोडून गेल्याने भाजपचा ओबीसी जनाधार तुटला वगैरे विश्लेषणात फार अर्थ नाही. मोठ्या पक्षाच्या गाडीतून एक रामराव उतरले तर दोन शामराव चढतात!
यानिमित्ताने एक गोष्ट मात्र स्पष्ट होते. महाराष्ट्रात एकमेकांना पाण्यात पाहण्याचं राजकारण सुरू झालं आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्येची सीबीआय चौकशी, जलयुक्त शिवारची चौकशी असो की समृद्धी महामार्गालगतच्या जमिनींच्या व्यवहारांची चौकशी हे सगळं वैयक्तिक हेवेदावे आणि विद्वेषातून घडत आहे. कधी उद्धव ठाकरे-आदित्य ठाकरे तर कधी फडणवीस यांना टार्गेट करून हे चाललं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाची संस्कृती ही पक्षीय भेदांपलीकडे जाऊन मैत्र जपण्याची होती; पण आज ती राहिलेली दिसत नाही. कथित सेक्युलर लोकांनी काय काय म्हणून मोदींचा द्वेष केला! पण त्यातून काय झालं?- मोदी हिरो झाले. २०१९च्या निवडणुकीत, ‘समोर कोणी शत्रूच दिसत नाही’ अशा वल्गना केल्या गेल्या. शरद पवारांच्या अंगावर ईडी सोडली गेली, काय झालं?- पवार हिरो झाले. आता फडणवीसांबाबत तेच होत आहे. फडणवीसांबद्दलचा राग हा ‘किमान समान कार्यक्रम’ झाला आहे. त्यांना दिल्लीत पाठविण्याची घाई उद्धव ठाकरेंना झालेली दिसते. फडणवीस मुंबई, राज्याच्या राजकारणात नसल्याचे फायदे त्यांना माहिती असावेत. उद्या फडणवीस दिल्लीत गेले तर भाजपमधील आयाराम एकेक करून गयाराम होतील. फडणवीस कुठल्याही क्षणी पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात या एका जबरदस्त आशेनं सर्वांना बांधून ठेवलेलं आहे. ते दिल्लीकडे उडाले की राष्ट्रवादी भाजपवर जाळं टाकेल.
नॉनस्टॉप अजितदादा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा सपाटा सगळ्यांनाच ठाऊक आहे. सकाळी ७ पासून ते लोकांना भेटतात. वेळेचे फार पक्के आहेत. गुरुवारी आधी बातमी पसरली की त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. पण नंतर पार्थ पवारांनी खुलासा केला की ते कोरोना पॉझिटिव्ह नाहीत तर त्यांनी स्वत:ला क्वाॅरण्टाइन करून घेतले आहे.
एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावेळी अजितदादा हजर राहू शकले नाहीत. मात्र, त्याचवेळी ते घरी बसून सर्व कार्यालयीन काम करीत होतेच. बरोबर खडसेंच्या प्रवेशावेळीच दादा क्वॉरंटाइन झाले हा योगायोग समजावा, त्यात बातमी शोधू नये.
अजितदादांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं वाढदिवसानिमित्त अभीष्टचिंतन करणारं ट्विट केलं. मागे पंडित दीनदयाल उपाध्यायना आदरांजली वाहणारं ट्विट त्यांनी नंतर डिलीट केलं होतं, अमितभाईंच्या अभिनंदनाचं ट्विट मात्र तसंच ठेवलं. दादा सध्या अशी भाजपशी जवळीक का दाखवत असावेत?
थांबा-भेटा-नियुक्ती घ्या!
गृह विभागात सध्या थांबा-भेटा-नियुक्ती घ्या अशी काही योजना लागू झाली आहे का? या योजनेंतर्गत विशिष्ट जागेवर विशिष्ट अधिकाऱ्याची बदली केली जाते; पण जो बदलून जातो त्याच्या नवीन बदलीचं ठिकाण न दाखवता त्याच्या नावासमोर ‘बदली आदेशाधिन’ असं दाखविण्यात येतं. निम्म्या अधिकाऱ्यांच्या नावांसमोर कसलाच उल्लेख नसतो. नियुक्तीविना कासावीस झालेले अधिकारी चातकाप्रमाणे बदलीची प्रतीक्षा करतात आणि गाठीभेटी संस्कृती सुरू होते. पोलिसांच्या बदल्यांना पाचवेळा मुदतवाढ मिळूनही हे सुरू आहे. ज्याचं पारडं (पलांडे नाही बरं) भारी त्याला इच्छित जागा मिळते. राजकीय दबाव आणि हस्तक्षेपाला कंटाळलेले पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल हे दिल्लीत प्रतिनियुक्तीवर जाण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती आहे.