- राजू नायकसध्या ब्रिटनमध्ये वास्तव्य करून असणा-या हजारो गोवेकरांना ब्रेक्झिटनंतर आपले काय होणार, या चिंतेने ग्रासले आहे. त्यांच्याकडे पोर्तुगीज पासपोर्ट आहे. परंतु ते युरोपात कुठेही जाऊ शकतात, या सवलतीचा फायदा घेऊन ब्रिटनमध्ये आले त्यांना तेथील मिळकत सोडून परत गोव्यात यायची इच्छा नाही. परंतु ब्रिटनमधील एक नेते व मूळचे गोवेकर असलेले किथ व्हाज यांनी त्यांना आशेचा एक नवीन किरण दाखवला आहे. किथ व्हाज म्हणतात, गोवेकर ब्रिटनचे नागरिकत्व मिळवू शकणार आहेत.व्हाज यांनी गोव्यातील माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, गोवेकरांनी जर ब्रिटनमध्ये आपल्या वास्तव्याची पाच वर्षे पूर्ण केली असतील तर ते ब्रिटनच्या नागरिकत्वासाठी पात्र ठरतात. ‘‘तेथे पाच वर्षे पूर्ण केल्यानंतर तेच ठरवू शकतात तेथे यापुढे वास्तव्य करायचे की नाही. ही अट- पूर्ण केल्यानंतर ब्रिटनचा ‘निवासी दर्जा’ मिळवायचा की भारत किंवा पोर्तुगालला परत जायचे हे त्यांनीच निश्चित करायचे आहे, असे व्हाज म्हणाले आहेत. व्हाज हे ब्रिटनच्या लेबर पक्षाचे नेते असून आपल्या निवृत्तीपूर्वी त्यांची लेसेस्टर पूर्व येथून 32 वर्षे सलग जिंकून येण्याचा विक्रम केला आहे.एका वृत्तांतानुसार ब्रेक्झिटसाठी ३१ डिसेंबर २०२० ही मर्यादा असून जे लोक या तारखेपूर्वी तेथे दाखल होतील, त्यांना अडचण भासणार नाही. या तारखेपूर्वी तुम्ही पाच वर्षे ब्रिटनमध्ये वास्तव्य केले असावे व त्यानंतर तुम्ही ‘निवासी दाखल्या’साठी अर्ज करणे आवश्यक आहे व त्यानंतर तुम्हाला ‘कायम निवासी दाखल्या’साठी अर्ज करता येतो, असा किथ यांचा दावा आहे. ज्यांनी पाच वर्षे पूर्ण केलेली नसतील त्यांनी ‘प्री सेटल्ड स्टेटस’साठी अर्ज करावा लागेल. असा अर्ज काही अटींवर मिळू शकतो. ‘‘सध्या ब्रिटनमध्ये पोर्तुगीज राष्ट्रीयत्वाचे १ लाख ४९ हजार लोक असून भारतात जन्मलेले आठ लाख ३७ हजार लोकही वास्तव्य करून आहेत. गोवेकरांना या दोन्ही विभागांपैकी एकात सामावून घेतले जाईल.’’गोव्यातून निघून पोर्तुगीज पासपोर्ट घेणा-यांची संख्या अलीकडे खूप वाढली आहे. पोर्तुगीज राजवट असेतोपर्यंत म्हणजे १९ डिसेंबर १९६१ पूर्वी जन्मलेल्यांना पोर्तुगीज नागरिकत्व मिळू शकते. परंतु असे नागरिकत्व मिळालेल्यांना पोर्तुगालमध्ये राहाण्यापेक्षा युरोपात श्रीमंत देशात वास्तव्य करायला आवडते. त्यात त्यांचे एक आवडीचे ठिकाण ब्रिटन असून ब्रेक्झिटमुळे त्यांच्या वास्तव्यावर मर्यादा आल्या आहेत. हे लोक आपल्या रोजगारावर गदा आणत असल्याचा ब्रिटिश नागरिकांचा आक्षेप असतो. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे ज्यांना ब्रिटिश नागरिकत्व हवे आहे तेच गोव्यात ‘भायल्यांनी’ येण्यावरून नाखुश असतात व त्यांनी उग्र आंदोलनेही चालविलेली आहेत. दुस-या एका वृत्तानुसार सध्या ब्रिटनमध्ये ३० लाख युरोपीय युनियनचे नागरिक वास्तव्य करून आहेत व त्यांना ब्रेक्झिटनंतर तेथेच वास्तव्य करायचे असेल तर वेगळे ‘वर्क परमिट’ मिळवावे लागेल.