मुंबई - भंडारा-गोंदियाचे भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘केंद्रातील मंत्री मोदींच्या दहशतीखाली आहेत’असे वक्तव्य करुन त्यांनी खळबळ माजविली आहे. थेट मोदी-फडणवीस यांना अंगावर घेऊन पटोले यांनी मोठी हिंमत दाखविली पण स्वत:च्या राजकीय भवितव्यावर प्रश्नचिन्हही लाऊन घेतले.पटोले काँग्रेसमधून भाजपात आले आणि प्रफुल्ल पटेल यांच्यासारख्या दिग्गज नेत्याला हरवून लोकसभेत पोहोचल्याने चर्चेत आले. पटोलेंना मानणारा एक वर्ग या मतदारसंघात आहेच पण भाजपाची मोठी परंपरागत व्होट बँक असलेला हा मतदारसंघ आहे. शिवाय मोदी लाट हा महत्त्वाचा फॅक्टर होता. त्यामुळे पटोेले केवळ स्वत:च्या भरवश्यवार जिंकले असे कुणीही म्हणणणार नाही. तसे असेल तर २०१९ मध्ये तेही दिसेलच.आधी सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्याविषयी आणि आता मोदी, फडणवीसांविषयी पटोलेंची वक्तव्ये बघता ते भाजपात फार दिवस राहतील, असे वाटत नाही. एकेकाळी बनवारीलाल पुरोहित यांनी त्यावेळचे भाजपातील सर्वेसर्वा प्रमोद महाजन यांच्यावर गंभीर आरोप केले आणि पुढे त्यांना भाजपातून जावे लागले. वर्तूळ पूर्ण करुन बनवारीलालजी भाजपात परतले. आता ते गुवाहाटीच्या राजभवनात आहेत.काँग्रेसमध्ये पक्षातील एखाद्या नेत्यावर टीका करणे कधीकधी फायद्याचे असते. राज्यातील एका नेत्याने दुसऱ्याला लक्ष्य केलेले कधीकधी दिल्लीला देखील आवडत असते. भाजपात तसे नाही. पक्षनेत्यांविरुद्धची भाषा खपवून घेतली जात नाही. पुरोहित यांना तेव्हा हे कळले नव्हते आज ते पटोले यांना कळत नाहीय.पटोेले वेगळ्या धाटणीचे राजकारणी आहेत. बहुजन राजकारण करीत आले आहेत. खैरलांजीच्या प्रकरणात त्यांची भूमिका त्यावेळी ते जिथे होते त्या काँग्रेस पक्षाला परवडणारी नव्हती. पुढे स्थानिक राजकारणाचा विचार करून अन् प्रफुल्ल पटेलांना अंगावर घेण्याच्या दृष्टीने ते भाजपात गेले. भाजपातील त्यांचा मुक्काम आता फार दिवस राहील, असे वाटत नाही. ते पुढे बहुजन आंदोलनाची मोट बांधतील, असा अंदाज आहे.ते स्वत: तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा.राजू शेट्टी, शेकापचे आ.जयंत पाटील, अपक्ष आ.बच्चू कडू, जदयूचे आ. कपिल पाटील अशा नेत्यांनी एकत्र येऊन पक्षविरहित बहुजन मंच स्थापन करावा, असा प्रयत्न सुरू झाला आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने आणि छगन भुजबळ तुरुंगात असल्याने राज्यात बहुजन दबाव गट आज दिसत नाही. ती उणीव भरून काढण्याचा पटोले यांच्या प्रयत्न असेल.सामाजिक आंदोलन एक वेगळा विषय आहे. राजकारणात टिकायचे तर पटोलेंना निवडणूक लढावीच लागेल. २०१९ मध्ये त्यांची खरी परीक्षा असेल. आज काँग्रेस हे बुडते जहाज आहे. कदाचित २०१९ मध्ये या पक्षाला बरे दिवस येताना दिसले तर नानाभाऊ आधीच्या घरट्यात परततील. तसेही राजकारणात स्थायी काही नसते.
पंतप्रधानांवर निशाणा साधणारं नानांचं बंड अन् पुढे काय?
By यदू जोशी | Published: September 02, 2017 5:00 PM
भंडारा-गोंदियाचे भाजपाचे खासदार नाना पटोले यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘केंद्रातील मंत्री मोदींच्या दहशतीखाली आहेत’असे वक्तव्य करुन त्यांनी खळबळ माजविली आहे.
ठळक मुद्देपटोलेंना मानणारा एक वर्ग या मतदारसंघात आहेच पण भाजपाची मोठी परंपरागत व्होट बँक असलेला हा मतदारसंघ आहेपक्षनेत्यांविरुद्धची भाषा खपवून घेतली जात नाही, आज ते पटोले यांना कळत नाहीय.