शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking: तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात अखेर डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर गुन्हा दाखल
2
IPL 2025 Video: 'सुपरमॅन' कॅच! विपराजला हवा होता चौकार, पण जोस बलटरने हवेत उडत घेतला भन्नाट झेल
3
राज ठाकरेंशी युती झाल्यास उद्धव ठाकरे महाविकास आघाडीतून बाहेर पडणार का?; संजय राऊत म्हणाले...
4
Video - अग्निकल्लोळ! एका ठिणगीमुळे बोटीला भीषण आग; १४८ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
“मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमुळे राज ठाकरेंची उपयुक्तता सर्वांना वाटत आहे”: छगन भुजबळ
6
“राहुल गांधींचा ‘डरो मत’ संदेश अमलात आणू, एकता, अखंडतेची मशाल घेऊन वाटचाल करू”: सपकाळ
7
Maharashtra Politics : राज ठाकरे अन् उद्धव ठाकरे एकत्र येणार का? संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
8
“इथले मीठ खाता अन् मराठीला विरोध करता? हिंदीची सक्ती होऊ देणार नाही”; उद्धव ठाकरेंनी ठणकावले
9
मुंबईविरुद्धच्या सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का, दुखापतीमुळे आणखी एक खेळाडू स्पर्धेबाहेर!
10
“कार्यकर्त्यांनी कठोर मेहनत घ्यावी, ५ वर्षांनंतर काँग्रेस पुन्हा सत्तेत येईल”: नाना पटोले
11
"मी ज्या झोपडपट्टीतून आलोय...", दिसण्यावरून ट्रोल करणाऱ्यांना सिद्धार्थ जाधवची सणसणीत चपराक
12
गुजरातविरुद्ध केएल राहुलचा विक्रमी षटकार; रोहित, विराट आणि धोनीच्या पंक्तीत झाला सामील
13
'तो' प्रवास ठरला शेवटचा! गायीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार कालव्यात पडली, एअर होस्टेसचा मृत्यू
14
'हिंदू आहोत हा आमचा गुन्हा आहे का?', पश्चिम बंगाल हिंसाचार बाधित महिलांचा भावनिक सवाल
15
“आम्ही कुटुंब फोडणारे नाही, राज अन् उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर स्वागतच”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांना गती; शिंदे गटातील नेत्यांची प्रतिक्रिया म्हणाले...
17
Vastu Tips: पायपुसण्याखाली ठेवा कापराच्या दोन वड्या, होतील चमत्कारिक फायदे!
18
"किती दिवस स्वप्नीलसाठी फक्त टाळ्या वाजवायच्या?"; सोनाली कुलकर्णीचं वक्तव्य चर्चेत
19
संतापजनक! ज्ञानाच्या मंदिरात शिक्षकानं विद्यार्थ्यांना पाजली दारू, पाहा व्हिडिओ

खरी परीक्षा आता अल्प संख्याबळाच्या विरोधी पक्षांची, महाविकास आघाडीचे काय होईल?

By नंदकिशोर पाटील | Updated: December 9, 2024 19:49 IST

शेकाप आणि डाव्या पक्षांचे मूठभर आमदार सरकारला दमवायचे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना हे जमेल का ते बघू….

- नंदकिशोर पाटील, संपादक, छत्रपती संभाजीनगरविधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड असे बहुमत मिळाले आहे. भाजपने तर १३२ जागा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. २०१४ आणि २०१९ च्या मोदी लाटेत देखील एवढे यश मिळाले नव्हते. सर्वार्थाने सक्षम असलेले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी आहेत. राज्याच्या तिजोरीच्या चाव्या अजितदादांकडे असतील. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या आमदारांना काही कमी पडू देणार नाहीत. या सरकारला पुढील पाच वर्ष कसलाही धोका नाही. अजितदादा, एकनाथ शिंदे सत्तेबाहेर पडणार नाहीत. तेव्हा खरी परीक्षा आता विरोधी पक्षांची असेल. २३८ विरुद्ध ५० असे सभागृहातील चित्र असेल. सरकारला धारेवर धरणे संख्याबळावर शक्य नाही, तेव्हा युक्ती, सजगता आणि अभ्यास यावरच ते शक्य आहे. १९५२ ते ७८ पर्यंत अशीच परस्थिती असायची. मात्र शेकाप आणि डाव्या पक्षांचे मूठभर आमदार सरकारला दमवायचे. महाविकास आघाडीच्या नेत्यांना हे जमेल का ते बघू….

विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आता महाविकास आघाडीचे काय होईल, अशी चर्चा सुरू झाली आहे. निवडणूक निकालाचे विश्लेषण करण्यासाठी काँग्रेस आणि शिवसेना (उबाठा) या दोन पक्षांनी आयोजित केलेल्या बैठकीत एकमेकांवर आगपाखड करण्यात आली. काँग्रेस पक्षाने अट्टाहासाने शंभरावर जागा लढविल्या. मात्र, पन्नास टक्के जागांवरही त्यांना यश मिळाले नाही. शिवाय, काही मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी महायुतीच्या उमेदवारांना मदत केली, असा आरोप उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला, तर असाच आरोप काँग्रेसकडूनदेखील करण्यात आला. यापुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढवाव्यात, असा सूर दोन्ही पक्षातून निघाला. कोणत्याही निवडणुकीतील विजयाचे श्रेय घेण्यासाठी चढाओढ असते. मात्र, पराभवाचे खापर नेहमीच दुसऱ्याच्या माथी मारले जाते. मग ती निवडणूक आघाडीकडून लढवली असो की स्वतंत्रपणे. निवडणुकीचे निकाल पाहता काँग्रेसमध्ये घमासान होईल, असा अंदाज होता. मात्र, पक्षाच्या राज्य नेतृत्त्वाविषयी उघडपणे कोणी नाराजी व्यक्त केली नसली तरी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि मुंबई प्रदेशच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड यांनी केलेल्या चुकीच्या तिकीट वाटपाबाबत कुजबुज सुरू झाली आहे. विशेषत: विदर्भ आणि मुंबईतील उमेदवारांची निवड योग्य नव्हती, असा सूर आहे. औरंगाबाद पूर्व आणि कोल्हापूर येथील उमेदवार बदलण्यावरून या पक्षाची किती शोभा झाली, हे सर्वांनीच पाहिले आहे. लोकसभेला तीन खासदार निवडून देणाऱ्या मराठवाड्यात काँग्रेस पक्षाचे अमित देशमुख हे एकमेव उमेदवार (तेही काठावर) निवडून आले आहेत. २०१९ साली आठ आमदार होते. धुळे, अमरावती, बुलढाणा, वर्धा आणि सोलापूर या जिल्ह्यात इतिहासात पहिल्यांदाच काँग्रेसचा एकही आमदार नाही. राज्यात असे १३ जिल्हे आहेत!

या निवडणुकीत सर्वाधिक मेहनत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी घेतली. वय आणि दुर्धर आजाराची पर्वा न करता त्यांनी महाराष्ट्र पिंजून काढला. अवघ्या पंधरा दिवसात सत्तरहून अधिक सभा घेतल्या. मात्र, तरीही त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला केवळ दहा जागा मिळाल्या. आठ खासदार आणि दहा आमदार! शरद पवारांना मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात चांगले यश मिळेल, असे अंदाज वर्तविण्यात येत होते. परंतु, केवळ सोलापूर आणि सांगली, जिल्ह्याने त्यांना चांगली साथ दिली. कोल्हापूरसह १५ जिल्ह्यात पवारांच्या पक्षाचा एकही आमदार नाही. विधानसभेच्या या निकालात येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे भवितव्य दडले आहे. महाविकास आघाडीने एकसंघपणे या निवडणुकांना सामोरे जायचे आहे की, स्वतंत्रपणे, याचा निर्णय घेण्यासाठी या निकालाचे विश्लेषण महत्त्वाचे ठरणार आहे.

गेल्या रविवारी (१ डिसेंबर) याच सदरात काँग्रेस पक्षाच्या विधानसभेतील पराभवाची चिकित्सा करताना नेते कसे गाफील राहिले, असा मुद्दा मांडला होता. यावर काही ज्येष्ठ काँग्रेसजनांचे म्हणणे असे की, सत्ताधारी पक्षांकडून ‘वोट जिहाद’, ‘बटेंगे तो कटेंगे’ यासारखे नारे देऊन धर्माचे मोठे वादळ उभे करण्यात आले. प्रचाराच्या ऐन टप्प्यावर भाजपने तयार केलेल्या या हिंदुत्वाच्या ‘नरेटिव’ला प्रतिवाद कसा करायचा, या संभ्रमात आम्ही होतो. ‘बटेंगे तो कटेंगे’ला आम्ही ‘एक है तो सेफ है!’ असे उत्तर देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा परिणाम झाला नाही.

विधानसभेला मिळालेला हा धडा लक्षात घेऊन शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी पुन्हा हिंदुत्वाचा नारा दिला आहे. येत्या महापालिका निवडणुकीत यश मिळवायचे असेल तर घरोघरी हिंदुत्व पोहोचवा, असे फर्मान त्यांनी शिवसैनिकांना सोडले आहे. यापुढे उद्धव ठाकरे याच मुद्द्यावर अधिक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता दिसते. कदाचित मुंबई महापालिका ताब्यात घेण्यासाठी हिंदुत्वाचा पुरस्कार केल्याखेरीज त्यांना दुसरा पर्याय दिसत नसावा. विधानसभा निवडणुकीत ठाकरे यांचे वीस उमेदवार निवडून आले आहेत. पैकी दहा जण मुंबईतील आहेत. आजवर मराठी माणूस आणि हिंदुत्व याच मुद्द्यांवर त्यांनी मुंबई मनपावर भगवा फडकावला आहे. पाच वर्षांपूर्वी भाजपने सर्वतोपरी प्रयत्न करून पाहिले, परंतु तरीही मुंबईकरांनी शिवसेनेच्याच हाती मनपाची सूत्रे दिली होती. मात्र, गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. शिवसेनेत फूट पडली आहे. शिवाय, राज्याची सत्ता भाजपच्या हाती आली आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजपसोबत आहेत.

ठाकरे यांनी जर हिंदुत्वाचा जोरकसपणे पुरस्कार केला तर महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय राहील, हाही प्रश्न आहे. कारण, काँग्रेस आणि पवार हे पुरोगामी विचारांची पाठराखण करणारे आहेत. महाविकास आघाडीत आल्यापासून ठाकरे यांनी आपली कट्टर हिंदुत्ववादी प्रतिमा थोडी मवाळ केली आहे. याचा फायदा त्यांना निवडणुकीत झाला. कधी नव्हे ते अल्पसंख्याकांची मते ठाकरे यांच्या उमेदवारांना मिळाली. उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्यावरून ते मुंबई महापालिकेची निवडणूक स्वतंत्रपणे लढण्याच्या मूडमध्ये दिसतात. परंतु, लगेच ते महाविकास आघाडीतून बाहेर पडतील, ही शक्यता कमी दिसते. कारण २५ जिल्ह्यात ठाकरे यांचा एकही आमदार निवडून आलेला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्रपणे लढविल्या तरी महापौर अथवा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष निवडताना मित्रपक्षांची मदत लागते.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीPoliticsराजकारण