राष्ट्रीय ख्यातीचे राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर ऊर्फ “पीके” काँग्रेस पक्षात चालले असल्याची चर्चा देशभर सुरू झाली आहे. किशोर अलीकडे काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी यांना भेटले. राष्ट्रीय नेत्यांच्या टीमसमोर प्रशांत किशोर यांनी रोडमॅप सादर केला. काँग्रेसला देशभर ऊर्जितावस्था देण्यासाठी हा रोडमॅप आहे. दिग्विजय सिंग यांच्यासारखा नेता प्रशांत किशोर यांच्या सादरीकरणाने प्रभावित झालेला आहे; मात्र किशोर यांना काँग्रेसमध्ये केवढे मोठे पद किंवा स्थान द्यावे याविषयी दिग्विजय सिंग यांची काही मते आहेत. प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल करण्याचे अधिकार प्राप्त होतील एवढे मोठे पद सोपविले जाऊ नये या बाजूने दिग्विजय सिंग यांचा कल दिसतो. प्रशांत किशोर हे विविध पक्षांशी निगडित काम करून आलेले असल्याने काँग्रेसच्या तत्त्वज्ञानावर त्यांची पूर्ण निष्ठा असेल असे दिग्विजय सिंग यांना वाटत नाही.
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना मात्र प्रशांत किशोर यांच्या संभाव्य आगमनाविषयी खूप आनंद झालेला आहे. किशोर यांच्याकडे निवडणूकविषयक कामाचा खूप अनुभव असल्याने काँग्रेस पक्षाने त्या अनुभवाचा फायदा करून घ्यायला हवा असे कमलनाथ यांना वाटते. प्रशांत किशोर यांना अचानक काँग्रेसचे आकर्षण का वाटले हे किशोरच सांगू शकतात; पण देशातील मोदी सरकारला हटवायचे असेल तर सर्व विरोधी पक्षांना काँग्रेसच्याच झेंड्याखाली एकत्र यावे लागेल हा मुद्दा किशोर यांना पटलेला दिसतो. काँग्रेस पक्ष अजूनही निवडणुकांवेळी पंचवीस वर्षांपूर्वीचेच फॉर्म्युले वापरतो. भारतीय जनता पक्ष मात्र पूर्ण प्रोफेशनल व हायटेक झालेला आहे. निवडणुकीपूर्वी प्रत्येक मतदारसंघात तटस्थ यंत्रणेकडून सर्वेक्षण करून घ्यायचे व मग उमेदवार निश्चित करायचे ही भाजपची पद्धत आहे. या उलट काँग्रेस पक्षात अजूनही तिकीट वाटपाचे जुनेच “मार्ग” अवलंबले जातात. त्यामुळेच काँग्रेसला मागे टाकत भाजप विविध राज्यांमध्ये आज सत्तेवर पोहोचला आहे.
काँग्रेसकडे प्रबळ संघटनात्मक व्यवस्था नाही. प्रशांत किशोर यांनी निश्चितच हे सगळे कच्चे दुवे हेरलेले असतील. त्यांना काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल अपेक्षित आहेत. काँग्रेसमधील गांधीविरोधी नेत्यांच्या गटालाही संघटनात्मक बदलांची अपेक्षा आहे. प्रशांत किशोर यांनी यापूर्वीही काँग्रेसला काही शिफारशी केल्या होत्या. काँग्रेसमध्ये कार्याध्यक्षपद किंवा उपाध्यक्षपदाची निर्मिती केली जावी व या पदावर गांधी कुटुंबातील कुणी असू नये असे किशोर यांना अपेक्षित आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षपद सोनिया गांधी किंवा राहुल गांधींकडे असू द्या; पण उपाध्यक्षपद किंवा कार्याध्यक्षपद मात्र दुसऱ्या एखाद्या नेत्याकडे असायला हवे ही किशोर यांची अपेक्षा गैर नाही; मात्र याबाबत अंतिम निर्णय शेवटी सोनिया गांधीच घेतील. काँग्रेसने लोकसभेच्या सर्वच जागा न लढवता काही राज्यांमध्ये तेथील प्रबळ अशा पक्षांसोबत युती करून त्या पक्षांना जागा सोडाव्यात ही सूचनाही योग्यच वाटते. २०२४ साली काँग्रेसने लोकसभेच्या ३७० जागा लढवाव्यात, तसेच महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू या राज्यांमध्ये काँग्रेसने युतीचा मार्ग स्वीकारावा आणि उत्तर प्रदेश, बिहार व ओडिशामध्ये मात्र काँग्रेसने स्वबळावर लढावे असे किशोर सुचवतात.
पंजाबमध्ये काँग्रेसने मार खाल्ला. गोव्यातही काँग्रेसचा पराभव झाला. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशांत किशोर यांच्या अनुभवातून काँग्रेस पक्ष जर काही चांगले शिकला तर त्यातून काँग्रेसचे कल्याण होऊ शकते; मात्र प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये आले म्हणजे काँग्रेसला विजय प्राप्त झाला अशा भ्रमात कुणीच राहू नये. हात लावील तिथे सोने अशी प्रशांत किशोर यांची प्रतिमा काही घटकांनी करून ठेवलेली आहे. ती प्रतिमा म्हणजे अर्धसत्य आहे. गेल्या फेब्रुवारीत गोव्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीवेळी किशोर आणि त्यांची आयपेक संस्था तृणमूल काँग्रेसची मार्गदर्शक होती; पण ममता बॅनर्जींचा पक्ष गोव्यात एकदेखील जागा जिंकू शकला नाही. किशोर यांनी यापूर्वी कॅप्टन अमरिंदर, आपचे अरविंद केजरीवाल, बिहारचे नितीशकुमार आदींसोबत यशस्वीपणे काम केलेले आहे. आजही ते आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डींसोबत व तामिळनाडूत डीएमकेसोबत आहेत. ते हे सगळे काम सोडून जर काँग्रेससाठी स्वत:ला वाहून घेऊ पाहत असतील तर ते स्वागतार्हच आहे; मात्र काँग्रेसला प्रतिमा संवर्धनासह प्रशांत किशोर यांच्या बऱ्याच शिफारशी अगोदर स्वीकाराव्या लागतील. अन्यथा किशोर हे काँग्रेसमध्ये प्राण फुंकू शकणार नाहीत.