- मेघना ढोके
जानेवारीच्या शेवटच्याच आठवड्यातली बातमी. त्यादिवशी गुगलने जाहीर केले, यापुढे ते आपल्या पुरुष कर्मचाऱ्यांना ६ महिन्यांची ‘पॅरेण्टल लिव्ह’ देतील. (म्हणजे स्त्री-पुरुष- थर्ड जेंडर अशा सर्वांनाच पालकत्व रजा.) ८ आठवड्यांची केअरगिव्हर रजा वेगळीच असेल आणि जे कुणी कुटुंबासह वेळ घालवतील त्यांना वर्षाकाठी एकदा १५ दिवस पगारी रजाही मिळेल,! रिमोट वर्किंग काळात कर्मचाऱ्यांना ऑफिसमध्ये येऊन काम करण्याचे फायदे मिळत नाहीत आणि लोक काम करून बर्नआऊट होऊ नयेत, उत्तम टॅलण्ट कंपनी सोडून जाऊ नये म्हणून गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी ‘गुणी माणसं टिकवून’ ठेवण्यासाठी ही योजना जाहीर केली, अशी चर्चाही झाली. यात एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो पुरुषांनी पालकत्व रजा घेण्याचा!
२०१५ आणि २०१७ मध्ये फेसबूकचे मार्क झुकरबर्ग यांनी दोन वेळेस पॅटर्निटी रजा घेतली होती. दोन महिने त्यांनी मुलं आणि घर सांभाळलं. त्याविषयीही बरीच चर्चा झाली. विनोद केले गेले, की झुकरबर्गला जर रजा मिळू शकते, तर बाकीचे बाप असे काय बिझी आणि करिअर ओरिएण्टेड असतात की त्यांना रजा मिळू नये? आता नवं निमित्त आहे, ट्विटरचे सीईओ पराग अग्रवाल! त्यांनी जाहीर केलं की माझ्या दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर मी तीन महिने पालकत्व रजा घेत आहे. ३७ वर्षांच्या या सीईओकडे नव्यानंच आलेली मोठी जबाबदारी असतानाही म्हणतो, की मला रजा घेणं गरजेचं आहे. कार्पोरेट्सच्या बड्या बड्या अनेकांनी त्यांना शुभेच्छा देत निर्णयाचं कौतुक करणारे ट्विट्स केले. मग पुन्हा चर्चा झाली की, मूल होणार म्हणून एवढी रजा?... आणि महत्त्वाची कामं सोडून ‘पुरुषाने’ घरी बसणं गरजेचं आहे का?
आठवत असेल तर हीच चर्चा आपल्याकडे विराट कोहलीने पितृत्व रजा घेत ऑस्ट्रेेलिया कसोटी मालिका सोडून भारतात येण्याचा निर्णय घेतला तेव्हाही झाली होती. आता हा भारतात जाऊन काय ‘डायपर बदलण्याचं प्रशिक्षण’ घेणार का?- असे विनोद सोशल मीडियावर फिरले. अजिंक्य राहणेने पुढची कसोटी जिंकल्यावर अनेकांनी विराटला सल्ले दिले, ‘आता घरीच बस, डायपर बदल, शी काढ बाळाची, तीच तुझी लायकी आहे.’
आपल्याला मूल होणार म्हणून त्या काळात आपण पत्नीसोबत रहावं, असं एखाद्या पुरुषाला वाटलं, घरकामात- बालसंगोपनात मदत करावी म्हणून त्यानं आपल्या कामातून ( ते राष्ट्रीय कर्तव्य असो, की फार मोठं पद की साधी ९ ते ५ नोकरी) सुटी घेतली तर त्यावर इतकी चर्चा, वाद, नाकं मुरडणं अजूनही आपल्या समाजात का व्हावं? बाईला मूल होतं, स्तनपान करावं लागतं म्हणून तिनं करिअरला ब्रेक देत वर्ष-दोन वर्षे रजा घेतली तर ते मातृत्व कर्तव्य आणि पित्याचं काय? सगळ्यांना मोठी रजा मिळत नसेलही; पण दहा-वीस दिवस रजा तर मिळणं शक्यच असतं आणि मुळात एक स्तनपान सोडलं तर बाळाला सांभाळण्याची सर्वच कामं नवा ‘बाबाही’ त्या काळात करूच शकतो.
अलीकडे मदतीला वडिलधारे नसतात तेव्हा नव्या आई-बाबांनी एकमेकांना सांभाळून घेत हा प्रवास करायचा असतो. मूल तितकंच बाबाचं असतं जितकं आईचं. त्यामुळे आई काही काळ ‘स्लो डाऊन’ करणार असेल तर बाबानेही काही दिवस सुटी घेणं हे काही जगावेगळं किंवा ‘बायकी’ नाही. मुळात ‘डायपर बदलणं’ हे काम पुरुषांचं नाहीच, या मानसिकतेतून आपण बाहेर पडत नाही, तोवर एकट्या बाईवर मुलांची जबाबदारी येणार आणि मग महिला दिनाला टिपिकल विषयाचे परिसंवाद भरवणं सोपं. घर की करिअर, बाईसाठी काय महत्त्वाचं? बाबासाठी आणि आईसाठीही जेव्हा दोन्ही महत्त्वाचं आणि सामायिक काम विभागणीसह जबाबदारीचं ठरेल तो सुदिन!meghana.dhoke@lokmat.com