- मुक्ता चैतन्य(मुक्त पत्रकार)माझ्या पिढीने वीसेक वर्षांपूर्वी कामाला सुरुवात केली होती तेव्हा ‘कुत्र्यासारखं राबणं’ या वाक्याला विशेष ग्लॅमर होतं. आपण मान मोडून काम करतो, आपल्या ऑफिस टाइमपेक्षा जास्त वेळ थांबून काम करतो, अक्षरशः ऑफिसमध्येच राहतो, घरच्यांसाठी वेळच देऊ शकत नाही, या सगळ्या गोष्टी तुफान ग्लॅमरस आणि असे अखंड राबणारे लोक जाम भारी, असं एकूण वातावरण होतं. आजही भारतीय ‘वर्क कल्चर’चा चेहरामोहरा विशेष बदललेला नाही. एका माणसाकडून पाच माणसांचं काम करून घेणं, ही भारतीय ‘वर्क कल्चर’ची खरी मानसिकता आहे. त्यामुळे ‘हाएटस’ (haitus) सारखे शब्द कधीही इथल्या व्यावसायिक आयुष्यात कुणी ऐकलेले नसतात. नाही म्हणायला आपल्याकडे सॅबॅटिकलची पद्धत आहे. पण ती सुद्धा सर्वत्र नाही आणि बहुतेक वेळा फक्त शिक्षणासाठी दिली जाते. अपवाद आहेतच.
एखाद्या व्यक्तीला फक्त कुटुंबासाठी वेळ हवाय म्हणून अशी सुटी दिली जात नाही किंवा तसा ट्रेंड नाही. म्हणूनच आमीर खानने ‘वर्ष, दीड वर्षाची सुटी घेऊन मी कुटुंबाला वेळ देणार आहे’ असं जाहीर केल्यावर चर्चांना उधाण आलं. कुटुंबासाठी, स्वतःसाठी, नवं काहीतरी शिकण्यासाठी, फिरण्यासाठी किंवा आराम करण्यासाठी वेळ असला/घेतला पाहिजे हा विचार भारतीय व्यावसायिक विश्वात नसला तरी जगभरातले कलाकार, कॉर्पोरेट जगातले कर्मचारी किंवा इतर नोकरदार माणसं हाएटसवर जात असतात. म्हणजेच कामातून पूर्णपणे ब्रेक घेऊन वेगळं काहीतरी करतात.
नुकतंच BTS या के पॉप विश्वातल्या लाडक्या ग्रुपने हाएटसवर गेल्याचं जाहीर केलं आहे. BTS चे सात मेम्बर्स आता पुढे काही वर्ष एकत्र काम करणार नाहीत. त्यांच्यापैकी प्रत्येकाला आता काही वैयक्तिक प्रोजेक्ट्स करायचे आहेत. शुगाने साय बरोबर स्वतंत्र अल्बम केला आणि तो सुपरहिट झाला. जंग कुकने स्वतंत्र काम केलं आणि आता कतार येथील फिफाच्या सोहळ्यातही त्याचा सोलो परफॉर्मन्स असणार आहे. जेहोपने नुकतीच त्याची सोलो कॉन्सर्ट केली. प्रत्येकाचे काही ना काही वैयक्तिक प्लॅन्स आहेत आणि त्यासाठी ग्रुप म्हणून त्यांनी हाएटस जाहीर केला आहे. आपल्याकडे हिरोचे सिनेमे पडले आणि हिरोईनचं लग्न झालं की मगच काय ते ब्रेक्स.
प्रचंड राबण्याला अवाजवी महत्त्व देणाऱ्या आपल्या संस्कृतीत ‘कुत्र्यासारखं काम करण्याचा’ माणसांच्या एकूण मानसिक स्वास्थ्यावर काय परिणाम होतो, याचा विचार कुणीच करत नाही. खरंतर अशा ब्रेक्सची गरज प्रत्येकाला असते. मग काम आणि करिअर कुठलंही असो. जरा थांबून वेगळं काहीतरी करण्यासाठी वेळ काढणं अनेकदा मानसिक स्वास्थ्यासाठी गरजेचं असतं. त्यामुळे मनावरचा ताण कमी होऊ शकतो, आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक प्रवासावर चिंतन करण्याची संधी मिळू शकते आणि माणसं परत जोमाने कामाला लागू शकतात. स्वतःच्याच कामाकडे निराळ्या दृष्टीनेही बघू शकतात.
आर्थिक कारणांमुळे सगळ्यांना असे ब्रेक्स घेणं परवडू शकत नाही, म्हणूनच कंपन्या आणि संस्थांमध्ये अशी मूलतः सोय असली पाहिजे. अनेक देशांमध्ये अशी सोय असते. अमेरिकन विज्ञान लेखक आणि संस्थात्मक मानसशास्त्र यांचे अभ्यासक ॲडम ग्रॅण्ट म्हणतात त्याप्रमाणे- कर्मचारी म्हणजे फक्त काही कोरडं ‘साहित्य’ नाहीत, ज्याचं व्यवस्थापन करावं लागतं; ती माणसं आहेत. वाईट व्यवस्थापक फक्त रिझल्ट्स बघतात तर चांगले व्यवस्थापक ‘वेल बीइंग’.. आणि जे सर्वोत्कृष्ट व्यवस्थापक असतात ते आधी कर्मचाऱ्यांचं ‘वेल बीइंग’ बघतात मग रिझल्ट्स!
हाएटस हा वेल बीइंगचा खूप मोठा आणि महत्त्वाचा भाग आहे. माणसांवर वाढणारे ताण, नैराश्य, आत्महत्यांचं वाढतं प्रमाण, सामाजिक आणि कौटुंबिक अस्वस्थता, आजूबाजूला दिसणारा सामाजिक संताप, द्वेष या सगळ्या प्रचंड अस्वस्थतेचं आणि कोलाहलाचं उत्तर एकट्या हाएटसमध्ये नक्कीच नाही, पण ही अस्वस्थता कमी करण्याच्या दिशेने ते एक महत्त्वाचं पाऊल असू शकतं.
माणसांची मशिन्स झाली की काय होतं, हे आपण बघतोच आहोत ... आता माणसांकडे माणूस म्हणून बघण्याची वेळ आली आहे.muktaachaitanya@gmail.com