- श्रीमंत माने ( संपादक, लोकमत, नागपूर)
गुरुवारी दुपारी सुनीता विल्यम्स व बच विलमोर या दोघांनी त्यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (आयएसएस) घेऊन गेलेल्या बोईंग स्टारलायनर यानाचा दरवाजा अंतिमत: बंद केला. शुक्रवारी रात्री उशिरा अंतराळ स्थानकापासून स्टारलायनर वेगळे केले जाईल आणि साधारणपणे सहा तासांत ते पृथ्वीवर पोहोचेल.
अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा आणि बोईंग ही एअरोस्पेस कंपनी या दोघांची मिळून ‘स्टारलायनर’ ही पहिली व्यावसायिक चाचणी मोहीम होती. ती यशस्वी व्हावी म्हणूनच तब्बल ५० तास ४० मिनिटांचे अशा सात स्पेसवाॅकचा विक्रम नावावर असलेल्या सुनिता विल्यम्स व तिच्यासोबत बेरी ऊर्फ बच विलमोर या अनुभवी अंतराळवीरांची निवड करण्यात आली होती. परंतु, गेल्या ५ जूनच्या उड्डाणावेळीच स्टारलायनरमध्ये काहीसा बिघाड झाला. हेलियमची गळती होऊ लागली. पृथ्वीपासून साडेतीनशे किलोमीटर उंचीवर ताशी अंदाजे २८ हजार किलोमीटर वेगाने घिरट्या घालणाऱ्या स्थानकावर पोहोचण्यावेळी ती लक्षात आली. परिणामी, आठ दिवसांत परत येणारे हे दोघे गेले तीन महिने अंतराळात अडकले आहेत.
स्टारलायनरमधील बिघाड ‘नासा’ व ‘बोईंग’ या दोन्ही संस्थांमध्ये तणातणीचे कारण बनला आहे. परवा, अंतराळवीरांशिवाय यान परत पृथ्वीवर आणण्याचा निर्णय झाला तेव्हा ही तणातणी स्पष्टपणे जाणवली. आपल्या यानाच्या दर्जाबद्दल बोईंग कंपनी काही ऐकून घ्यायलाच तयार नव्हती. बऱ्याच वादावादीनंतर अंतराळवीरांशिवाय यान परत पृथ्वीवर आणण्यास ती तयार झाली. स्टारलायनरचा परतीचा प्रवास पूर्णपणे स्वयंचलित असेल. अंतराळ स्थानकापासून ते विलग होताच त्याला गती देणारी उपकरणे प्रज्वलित केली जातील. वेगाने गिरक्या घेत ते हळूहळू पृथ्वीच्या कक्षेजवळ येईल. एका क्षणी त्याच्या भोवतीचे तापमान तीन हजार फॅरनहीट असेल. त्यामुळे कदाचित यानाशी असलेला संपर्क तुटेल.
पृथ्वीपासून तीस हजार फुटांवर असताना त्याचे पुढच्या बाजूचे हिटशिल्ड आणि तीन हजार फुटांवर असताना बेस हीटशिल्ड उघडेल. पृथ्वीच्या पृष्ठभागाला स्पर्श करतेवेळी कुपीचा वेग ताशी चार मैल इतका असेल. अमेरिकेतील न्यू मेक्सिको, अरिझोना, उटाह किंवा कॅलिफाेर्नियातील एडवर्डस एअर फोर्स बेस यापैकी एका ठिकाणी हे यान उतरविण्याचे नियोजन आहे.
सुनीता विल्यम्स कधी परत येणार, कशा परत येणार याबद्दल जगभरात - खासकरून भारतीयांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. थोडी चिंताही आहे. कारण, एकवीस वर्षांपूर्वी एका अंतराळ अपघातात आपण कल्पना चावला यांना गमावले आहे. त्यामुळेच अधिक काळ अंतराळात राहण्याचा यात्रींच्या शरीरावर, मनावर काय परिणाम होतो, याची खूप चर्चा सुरू आहे. अंतराळात उंची वाढते, केस वेगाने वाढतात इथपासून ते किरणोत्सर्गामुळे रक्तातील लालपेशींचा कित्येक पट अधिक वेगाने क्षय होणे, हृदयावर परिणाम आदी दुष्परिणामांची भीतीही सध्या चर्चेत आहे. सर्वाधिक चिंता आहे ती प्रचंड आवाजाची आणि त्यामुळे कर्णपटलावर होणाऱ्या परिणामाची. अंतराळवीरांना अंतराळस्थानकावरच्या मुक्कामात सतत ६० डेसिबलपेक्षा मोठ्या आवाजात राहावे लागते. या पृष्ठभूमीवर, स्टारलायनर रिकामेच परत येत असल्याने उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. पण, फार चिंता करण्याचे कारण नाही. एकतर अंतराळात सुनीता विल्यम्स या एकट्या नाहीत. त्यांच्यासोबत विविध देशांचे, विविध मोहिमांवर असलेले असे आणखी अकराजण अंतराळात आहेत. त्यापैकी सुनीता यांच्यासह नऊजण तर इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरच आहेत. चीनच्या तिआंगाँग अंतराळ स्थानकावर तिघेजण आहेत. त्या स्थानकाची क्षमताच तिघांची आहे. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाची क्षमता मात्र एकावेळी सोळा अंतराळवीरांची आहे.
महत्त्वाचे म्हणजे, सुनीता व बच यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी आता स्पेसएक्स ड्रॅगन हे अंतराळयान तयार होत आहे. त्या यानाद्वारे स्पेसएक्सची नववी तुकडी अंतराळ स्थानकावर पोहोचविणे आणि त्यांचे नियोजित काम झाले की, सुनीता व बच या दोघांना घेऊन परत येणे शक्य व्हावे यासाठी स्पेसएक्सच्या कार्यक्रमात बदल करण्यात आला आहे. दोन पुरुष व दोन महिला अशा चार अंतराळवीरांची या मोहिमेसाठी निवड झाली होती. परंतु, परतीच्या प्रवासात सुनीता व बच यांना जागा मिळावी म्हणून झेना कार्डमन व स्टेफनी विल्सन या दोन महिलांना माेहिमेतून वगळण्यात आले आहे. तिसऱ्यांदा अंतराळवारीवर निघालेले अनुभवी असे अमेरिकेचे निक हेग आणि त्यांच्यासोबत रशियाचे अलेक्झांडर गाेर्बुनोव्ह हे दोघेच स्पेसएक्स-९ मोहिमेत सहभागी होतील.
येत्या दि. २५ सप्टेंबरला स्पेसएक्स ड्रॅगन अंतराळात झेपावेल आणि फेब्रुवारी २०२५ मध्ये अंतराळातल्या ‘सासरी’ गेलेल्या भारताच्या लेकीचा सक्तीचा सासुरवास संपेल. सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बच विलमोर या दोघांसह चाैघेही जण पृथ्वीवर परत येतील. shrimant.mane@lokmat.com