डिजिटलच्या जमान्यात केवळ ग्रामपंचायत ‘पेपरलेस’ करून समाधान मानणे चुकीचे ठरेल. गटारमुक्त व डासमुक्त गाव ही प्रत्येक खेड्याची गरज आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात डासमुक्तीचे ‘भारुड’ चांगलेच रंगात आले आहे...एखादा कामाने झपाटलेला अधिकारी लोकप्रतिनिधींची साथ लाभल्यास किती चांगले काम करू शकतो याचा अनुभव सध्या सोलापूर जिल्हा घेतोय ! कार्यालयीन स्वच्छतेपासून सुरू होणारा प्रवास पेपरलेस ग्रामपंचायतीमार्गे डासमुक्तीच्या गतिमान चळवळीपर्यंत कसा पोहोचू शकतो, याचे उदाहरण म्हणून सोलापूर जिल्हा परिषेदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड यांच्या कामाकडे पहायला हवे.ग्रामविकास आणि खेड्यांवर प्रेम करण्याचा संदेश देणाऱ्या माणिक बंडोजी इंगळे ऊर्फ राष्टÑसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतून त्यांनी खूप मोठा संदेश दिला. विचाराला कृतीची जोड देणारे राष्टÑसंत तुकडोजी महाराज म्हणतात, ‘माझा देव साधनारूपाने देवळात व वनात असला, अनुभव रूपाने तो मनात व चिंतनात असला तरी कार्यरूपाने तो जनात आहे. विस्तीर्ण स्वरूपात पसरलेली गावे, हीच माझी दैवते आहेत. ग्रामसेवा हीच माझी पूजा आहे.’ तुकडोजी महाराजांना अभिप्रेत असलेली पूजा ही प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थेत बांधली जावी, याच उद्देशाने महाराष्टÑाचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची मुहूर्तमेढ राज्यात रोवली. त्याच संस्थांमधील महत्त्वाचे केंद्र म्हणून आपण जिल्हा परिषदांकडे पाहतो. संत तुकडोजी महाराजांना अभिप्रेत असलेली पूजा बांधण्याचे काम जिल्हा परिषदेतील लोकप्रतिनिधी व अधिकारी करू शकतात. त्याच अपेक्षांच्या पूर्तीच्या दिशेने डॉ.राजेंद्र भारुड आणि त्यांची टीम आपली पावले टाकत असताना दिसतात. जि.प.चे अध्यक्ष संजय शिंदे यांच्या मदतीने त्यांनी जिल्ह्यात अनेक उपक्रमामध्ये लोकांचा सक्रिय सहभाग मिळविला. त्यामुळे स्वच्छता मोहिमांपासून डिजिटल शाळांपर्यंतचे अनेक उपक्रम साकार झाले. नुकत्याच पार पडलेल्या आषाढी वारीतील ‘मोबाईल हँडवॉश स्टेशन’सारख्या उपक्रमाचे कौतुक झाले. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालख्यांच्या मार्गावर स्वच्छतागृहांच्याजवळ एक हजार लिटर पाणी क्षमता असलेले मोबाईल हँडवॉश स्टेशन कार्यरत राहिले. आरोग्य व स्वच्छतेच्यादृष्टीने या उपक्रमाचा फायदा वारकºयांना झाला.शुद्ध व स्वच्छ पाण्याबरोबरच आरोग्यासाठी सांडपाण्याचे व्यवस्थापन होणे गरजेचे असल्याचे डॉ.भारुड यांनी जाणले. त्याला कृतीची जोड देताना जिल्ह्यातील १०२९ ग्रामपंचायतीचा सांडपाणी व डासमुक्ती नियोजनाचा आराखडा तयार केला. कोणत्याही गावातील गटारे ही डास निर्मितीची प्रमुख ठिकाणे असतात. गावातील सांडपाणी शोषखड्ड्याद्वारे जिरविल्यास त्या गावातील भू-गर्भांतर्गत पाणीपातळीदेखील वाढू शकते. याचा विचार करून त्यांनी जिल्ह्यात ७४ हजार ६०१ शोषखड्डे घेण्याचा निर्णय घेतला. त्यात जिल्ह्यातील ४ लाख ४९ हजार ४३१ कुटुंबांचा सहभागही मिळविला. त्याला ११ तालुक्यातील ७७ प्राथमिक आरोग्य केंद्र, ४३० आरोग्य उपकेंद्र आणि ४ हजार २१४ अंगणवाड्याच्या नियोजनाची जोड दिली. एक मॉडेल म्हणून उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा या गावात ९५० शोषखड्डे घेऊन ते गाव डासमुक्त केले. आज जिल्ह्यातील ५९ गावे गटारमुक्त झालेली दिसतात. आजच्या डिजिटल जमान्यात ११८ ग्रामपंचायती ‘पेपरलेस’ करणाºया डॉ. राजेंद्र भारुड यांचे डासमुक्तीचे ‘भारुड’ सध्या जिल्ह्यात चांगलेच रंगात आले आहे. ते जिल्ह्यातील प्रत्येक गावाची चळवळ बनल्यास आश्चर्य वाटू नये.- राजा माने
डासमुक्तीचे ‘भारुड’ रंगते तेव्हा...
By राजा माने | Published: August 01, 2018 3:38 AM