पुनीत बालन
ॐ नमो जी आद्या । वेद प्रतिपाद्या।।जयजय स्वसंवेद्या । आत्मरूपा।।
अशा शब्दांत ज्ञानेश्वर माउली गणेशवंदनेची सुरुवात करतात. हे विश्वाच्या आदिरुपाला, अनादि स्वरुपाला केलेले नमन आहे. माऊली या आत्मरुपाला स्वसंवेद्य म्हणतात. स्वत:च स्वत:च्या चेतनेने जागृत, सजग असलेल्या स्वसंवेद्यतेचे हे वर्णन समाजालाही लागू पडते. गणेशोत्सव हे याच सामाजिक चेतनेचे जागृत उदाहरण. लौकिकार्थाने विचार केला तर वाजतगाजत मिरवणुकीने गणेशाची मूर्ती स्थापन करायची. दहा दिवस मूर्तीची नित्यनेमाने पूजा-अर्चा, आरती करायची आणि त्यानंतर पुन्हा वाजतगाजत मूर्तीचे विसर्जन करायचे, असा हा उत्सव. त्यातली मिरवणूक हे उत्साहाचे, सामुदायिक जल्लोषाचे प्रतीक. परंतु, या उत्सवाशी अनेक सामाजिक, सांस्कृतिक, गोष्टी जोडलेल्या आहेत. या गोष्टीच या उत्सवाचे वेगळेपण अधोरेखित करतात. सन १८९२ मध्ये पहिल्यांदा सार्वजनिक गणेशोत्सव श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांनी सुरू केला. त्यानंतरच्या काळात लोकमान्य टिळकांनी याला सार्वजनिक रूप देऊन त्याचा मोठा प्रसार केला. ब्रिटिशांच्या राजवटीविरूद्ध लोकसंघटन व जनमत तयार करण्याच्या कामी या उत्सवाने मोलाचे योगदान दिले. तिथपासून आजपर्यंत या उत्सवाने आणि उत्सवाशी जोडलेल्या अनेक घटकांनी मोठे सामाजिक योगदान दिले आहे.
कोविडच्या काळात उत्सव बंद पडणार का? असा प्रश्न उपस्थित झाला होता खरा पण विघ्नहर्त्यानेच ‘ऑनलाइन उत्सवा’ची वाट दाखवत त्यावर उपाय सुचवला. देशातला पहिला ऑनलाइन गणेशोत्सव २०२० आणि दुसरा २०२१ या वर्षात आम्ही साजरा केला. पं. विजय घाटे, पं. राकेश चौरसिया, शंकर महादेवन, जावेद अली, नंदेश उमप आदी कलाकारांच्या कार्यक्रमांसह ऑनलाइन दर्शनाचीही सोय केली. यु-ट्यूब आणि इतर समाजमाध्यमांद्वारे अक्षरश: करोडो लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो.
दुसरीकडे कोविडच्या काळात लोकांना आवश्यक ती वैद्यकीय मदत, अन्नधान्याचा पुरवण्यातही गणेशोत्सव मंडळांनी पुढाकार घेतला. या-ना त्या रुपात गणेशोत्सव मंडळांचे कार्यकर्ते कोविड काळात मदतीसाठी सज्ज होते. अनेक गणेश मंडळे आपापल्या परीने विविध सामाजिक कार्यात मदत देत असतात. कुणी वैद्यकीय कारणासाठी अर्थसाहाय्य करते, तर कुणी शैक्षणिक उपक्रमाद्वारे गरजू विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहते. काही मंडळे रक्तदान, आरोग्य तपासणीची शिबिरे भरवतात, तर काही मंडळे प्रबोधनात्मक कार्यक्रम घेतात. मंडळाचा कार्यकर्ता त्या-त्या परिसरातल्या नागरिकांसाठी अडीअडचणीच्या काळात मदतीसाठी सतत सज्ज असतो. गणेशोत्सव, गणेश मंडळे आणि त्यांचे कार्यकर्ते यांची हीच खरी ताकद आहे.
दरम्यानच्या काळात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांच्या ऐतिहासिक वाड्याच्या पुनरुज्जीवनाचे काम झाले. मी मंडळात आलो तेव्हा भवन खूप जुने झाले होते. इंद्राणी बालन फाउंडेशनतर्फे वाड्याच्या जुन्या रचनेला धक्का न लावता या वाड्याचे पुनरूज्जीवन केले गेले. यंदा काश्मीरमध्येही गणेशोत्सव साजरा होत आहे. काश्मीरमध्ये २०२४च्या गणेशोत्सवापूर्वी एक भव्य गणेश मंदिर बांधण्याचा मानस आहे. गणेशोत्सवाच्या ‘ग्लोबल’ प्रसाराची ही नांदी आहे. कोणत्याही सार्वजनिक कामाला चिकटून दुष्प्रवृत्ती शिरकाव करण्याची शक्यता असते. परंतु, अशा दुष्प्रवृत्तींपासून मंडळांना अबाधित ठेवण्याबाबत सगळीच मंडळे आग्रही आहेत. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टने तर धांगडधिंगा, कर्कश आतषबाजी याला पहिल्यापासूनच फाटा दिला आहे.नव्या युगात डिजिटल आव्हाने स्वीकारताना उत्सवाचे मांगल्य आणि पावित्र्य जपण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर आहे, याचे भान प्रत्येक गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याने राखले पाहिजे. हा उत्सव सुरू झाला त्यावेळचे त्याचे उद्दिष्ट वेगळे होते. पण, आजही लोकसंघटन, लोकप्रबोधन व लोकशासनासाठी याचा प्रभावीपणे वापर करणे शक्य आहे. त्यादृष्टीने योग्य कार्यक्रम आखले तर हा उत्सव कालबाह्य न होता कालातीत आणि प्रेरणादायी ठरू शकेल!
(लेखक श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे उत्सवप्रमुख, आहेत)